जुने गोव्यात दररोज दोन ते अडीच लाख भाविक

आतापर्यंत ७० लाख जणांनी घेतले सेंट फ्रान्सिस झेवियरांच्या पवित्र अवशेषांचे दर्शन


30th December 2024, 11:24 pm
जुने गोव्यात दररोज दोन ते अडीच लाख भाविक

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेष दर्शनासाठी जुने गोवे येथे आलेले भाविक. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेष दर्शनाचा सोहळा २१ नोव्हेंबरपासून सुरू आहे. ५ जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या सोहळ्यात दररोज सुमारे दोन ते अडीच लाख भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत. आतापर्यंत ७० लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे, अशी माहिती अवशेष दर्शन सोहळा समितीचे समन्वयक फा. हेन्री फाल्काव यांनी दिली.
दर दहा वर्षांनी जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांच्या दर्शनाचा सोहळा आयोजित केला जातो. ५ जानेवारी रोजी सोहळ्याचा समारोप होणार आहे. ४ जानेवारीला दर्शन बंद केले जाईल. समारोपाच्या दिवशी दर्शन घेता येणार नाही, असेही फा. फाल्काव यांनी सांगितले.
गर्दी वाढल्याने दर्शनासाठीचा वेळ वाढवला
दररोज सकाळी ७ ते सायं. ६ या वेळेत दर्शन सुरू होते; मात्र गर्दी वाढत असल्याने दर्शनासाठीचा वेळ दोन तासांनी वाढवला आहे. आता सकाळी ६ ते सायं. ७ पर्यंत दर्शन सुरू ठेवले आहे. नाताळपर्यंत दररोज ३० ते ४० हजार भाविक दर्शन घेत होते. त्यानंतर गर्दी वाढू लागली आहे. यामध्ये विदेशी पर्यटकांची संख्याही मोठी आहे. नववर्ष स्वागतासाठी देशी-विदेशी पर्यटक राज्यात येत आहेत. बहुतांश पर्यटक जुने गोवे चर्चला आवर्जून भेट देतात. युरोपातून आलेले पर्यटक मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येत आहेत, असे फा. फाल्काव यांनी सांगितले.