शरिराचे तीन अवयव निकामी झाल्याने करणचा मृत्यू!

सनबर्न महोत्सवात सहभागी झालेल्या युवकाच्या मृत्यूमुळे यंदाही खळबळ


30th December 2024, 11:37 pm
शरिराचे तीन अवयव निकामी झाल्याने करणचा मृत्यू!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : धारगळमध्ये आयोजित सनबर्न महोत्सवात सहभागी​ झाल्यानंतर शरिरातील तीन अवयव निकामी झाल्यामुळे दिल्ली येथील करण राजू कश्यप या २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. त्याचा व्हिसेरा पुढील चाचण्यांसाठी वेर्णा येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला आहे.
राज्यात दरवर्षी आयोजित होणारा सनबर्न महोत्सव यंदा धारगळमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात सहभागी झालेल्या करण कश्यप या तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे राज्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. करण कश्यप हा या महोत्सवात सहभागी झाल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याला तत्काळ म्हापसा येथील खासगी इस्पितळात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचे निधन झाल्यानंतर त्याचा मृत्यू हा किडनीला झालेली इजा तसेच फुफ्फुसाला आलेली सूज यामुळेच झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे.
दरम्यान, यंदाचा सनबर्न महोत्सव सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पर्यटन हंगामात दरवर्षी उत्तर गोव्यात आयोजित होणारा हा महोत्सव यंदा दक्षिण गोव्यात आयोजित करण्याचे प्रयत्न आयोजकांकडून सुरू होते. परंतु, दक्षिण गोव्यात महोत्सव आयोजित करण्यास स्थानिकांनी कडाडून विरोध दर्शवला. काही पंचायतींनी ग्रामसभांमध्येही तसा ठराव घेतला. त्यामुळे यंदाचा महोत्सव नेमका कुठे आयोजित होणार, असा प्रश्न असतानाच अखेर यंदाचा महोत्सव पेडणे तालुक्यातील धारगळमध्ये आयोजित करण्याचे आयोजकांनी निश्चित केले. स्थानिक जनतेने सुरुवातीला याला तीव्र विरोध दर्शवला होता. परंतु, आयोजकांना महोत्सव धारगळमध्ये आयोजित करण्यात यश आले.
सनबर्न आयोजकांचे म्हणणे काय ?
सनबर्न महोत्सवात सहभागी झालेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याबाबत शोक व्यक्त करतो.
संबंधित तरुणाची प्रकृती बिघडल्याचे समजताच आमच्या वैद्यकीय पथकाने त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू केले आणि त्याला म्हापसा येथील खासगी इस्पितळात दाखल केले.
म्हापसा येथील इस्पितळात त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले.
सनबर्न महोत्सवात अमलीपदार्थांचे सेवन होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. याशिवाय महोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही आमचे प्रयत्न सुरू असतात. गोवा पोलीसही त्यासाठी प्रयत्नरत असतात.
सनबर्न महोत्सवात सहभागी होणाऱ्यांनी आपले आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे आणि या महोत्सवाचा आनंद लुटावा.
आतापर्यंत झालेल्या मृतांच्या आठवणी जाग्या
गेल्या अनेक वर्षांपासून सनबर्न महोत्सवात सहभागी झालेल्यांचा मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आहेत. यापूर्वी २००९ मध्ये मेहा बहुगुणा, २०१४ मध्ये ईशा मंत्री, २०१९ मध्ये साई प्रसाद, व्यंकट सत्यनारायण, संदीप कोटा यांचा मृत्यू झाला होता. मात्र कुठल्याच प्रकरणात ड्रग्जच्या ओव्हरडोसची बाब समोर आली नाही.