मंडळ अध्यक्षपदावरून भाजपात ‘आतले-बाहेरचे’ संघर्ष सुरू

फुटीर आमदारांकडून मर्जीतील व्यक्तींच्या नेमणुकीसाठी ‘फिल्डिंग’


31st December 2024, 05:19 am
मंडळ अध्यक्षपदावरून भाजपात ‘आतले-बाहेरचे’ संघर्ष सुरू

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : प्रदेश भाजपच्या मंडळ अध्यक्षपदावरून सध्या पक्षातच ‘आतले-बाहेरचे’ असा संघर्ष उभा राहिला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आमदारांनी मंडळ अध्यक्षपदांवर आपापल्या मर्जीतील व्यक्तींची नेमणूक करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे भाजपचे केडर नेते असल्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात झाली आहे.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये दाखल झालेल्या दहापैकी बाबूश मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात आणि नीळकंठ हळर्णकर २०२२ च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले. त्यापूर्वी विश्वजीत राणे यांनी भाजपची वाट धरली होती. २०१७ च्या निवडणुकीनंतर दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल झाले. त्यातील शिरोडकर सध्या भाजपचे आमदार आहेत. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा काँग्रेसचे आठ आमदार भाजपात आले. सध्या भाजपकडे असलेल्या २८ आमदारांपैकी १४ आमदार काँग्रेसमधून आलेले असून, त्यातील अनेकांनी मंडळ अध्यक्षपदांवर आपापल्या मर्जीतील व्यक्तींची नेमणूक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांच्याकडून भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांमार्फत लॉबिंगही सुरू केली आहे. त्यामुळे पक्षासाठी अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम केलेल्यांवर अन्याय होण्याची शक्यता असल्याने त्यांच्याकडून अंतर्गत नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात झाल्याची माहिती मंडळ अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या एका भाजप नेत्याने सोमवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
वयाच्या अटीचाही अनेकांना फटका
भाजपने यावेळी मंडळ अध्यक्षपदासाठी वयाची कमाल मर्यादा ४५ वर्षे इतकी निश्चित केली आहे. त्यामुळे ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांनाच मंडळ अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येणार आहे. त्याचाही मोठा फटका विविध मतदारसंघांतील मूळ भाजप नेत्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाने वयाच्या अटीबाबत फेरविचार करावा आणि केडर नेत्यांचीच मंडळ अध्यक्षपदी नेमणूक करावी, अशी मागणीही काही जणांकडून केली जात आहे.