मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास अपघात : दुचाकीस्वार जखमी :
फोंडा : फोंडा परिसरातील गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरूच असून रविवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास शिरोडा येथे एका दुचाकीची धडक चुकविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण गेल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या संदेश नाईक यांच्या घराच्या अंगणात कोसळला. त्यावेळी संदेश नाईक यांच्या मालकीची स्कुटर ट्रक खाली चिरडली आहे. अपघातात दुचाकी चालक जखमी झाला आहे. जखमीवर गोमेकॉत उपचार सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, जीए-०९-क्यू-९२०७ क्रमांकाची दुचाकी बोरीहून सावर्डे येथे जात होती. त्यावेळी अचानक जीए-०५-टी-५७३० क्रमांकाचा ट्रक मुख्य रस्त्यावर आला. त्यावेळी ट्रक चालकाने दुचाकीची धडक चुकविण्यासाठी ट्रक डावीकडे वळवला असताना चालकाचे नियंत्रण गेले. त्यामुळे ट्रकला दुचाकीची धडक बसल्यानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या संदेश नाईक यांच्या घरासमोरील अंगणात कोसळला. त्यावेळी अंगणात पार्क केलेली जीए-०५-के-२७९८ क्रमांकाची स्कुटर ट्रक खाली चिरडली. अपघातात दुचाकी चालक जखमी झाला. जखमीला सर्व प्रथम शिरोडा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारसाठी गोमेकॉत नेण्यात आले. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.
दरम्यान, बरकटे-मोले येथील उतरणीवर सोमवारी सकाळी ब्रेक निकामी झाल्याने कारची धडक रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला बसली. अपघातवेळी कार चालक एकटाच होता. अपघातात चालक सुखरूप बचावला असून सदर कार कळंगुटहुन कर्नाटक राज्यात जात होती. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.
वाहतुकीवर परिणाम
शिरोडा येथील कामाक्षी मंदिरात सोमवारी अमावास्या असल्याने भाविकांनी गर्दी केली. त्यात वाजे येथे ट्रक घराच्या समोरील अंगणात कोसळल्याने वाहतुकीवर गंभीर परिणाम दिसून आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी लांबलचक वाहनांच्या रांगा दिसून आल्या. फोंडा वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.