कळंगुटमध्ये अस्वच्छतेमुळे रेस्टॉरन्ट बंद

एफडीएची बिर्याणी स्टॉलवर कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st December 2024, 12:32 am
कळंगुटमध्ये अस्वच्छतेमुळे रेस्टॉरन्ट बंद

कळंगुटमध्ये एफडीएकडून जप्त करण्यात आलेली शिजवलेली बिर्याणी.

म्हापसा : कळंगुट व बागा मधील अस्वच्छ तसेच विनापरवाना बिर्याणीची विक्री करणाऱ्या आस्थापनावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. या कारवाईवेळी अस्वच्छमुळे साई पंजाब हे रेस्टॉरंट बंद केले तर ८० किलो शिजवलेली बिर्याणी जप्त करण्यात आली.
अन्न व औषधे प्रशासनाने सोमवार, दि. ३० रोजी ही कारवाई केली. बिर्याणी विक्री स्टॉल्स तसेच हॉटेल्सवर छापेमारी केली. आरोग्य संबंधी नियमांचे उल्लंघन करून थाटलेल्या बिर्याणी विक्री स्टॉल यावेळी आढळून आले.
गेल्या काही दिवसांपासून एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून कळंगुटमधील किनारी भागात भेसळयुक्त पदार्थांविरुद्ध कारवाई मोहीम राबवली आहे. यामध्ये काजूगर, फरसाण आणि बिर्याणी विक्री दुकानांची झाडझडती सुरू आहे. अस्वच्छ परिसरात जेवण करून स्थानिकांसह पर्यटकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या विक्रीला आळा घालण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून ही मोहीम राबवण्यात आली आहे.
ई-सिगारेट जप्त
अन्न व औषध प्रशासनाच्या या छाप्यावेळी एका स्टॉलवर प्रतिबंधित ई-सिगारेट देखील सापडल्या. त्या सिगारेट जप्त करण्यात आल्या. दरम्यान, या कारवाईवेळी जप्त केलेली बिर्याणीची कळंगुट पंचायतीच्या सहाय्याने विल्हेवाट लावण्यात आली. अन्न व औषधे प्रशासनाचे वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी राजाराम पाटील, माधव कवळेकर, भक्ती वाळके व सुजाता शेटगांवकर यांनी ही कारवाई केली.