नाताळनंतर पर्यटकांची संख्या वाढली : किनारी भागातील हॉटेल महागडे
कळंगुट येथे मोठ्या संख्येने दाखल झालेले पर्यटक. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी राज्यात दाखल होणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. राज्यातील बहुतांश हॉटेलमधील ९० टक्के खोल्या भरल्या आहेत. पणजीसह किनारी भागातील हॉटेलमध्ये खोल्या मिळणे कठीण झाले आहे. अन्य भागातील हॉटेलमधीलही सुमारे ८० ते ९० टक्के रूम्स फुल्ल झाल्या आहेत, अशी माहिती हॉटेल तसेच पर्यटन विभागातील सूत्रांनी दिली.
राज्यभरात सुमारे ७,५०० हॉटेलांमध्ये निवासासाठी खोल्या उपलब्ध आहेत. सर्व हॉटेलांमध्ये मिळून ७५ हजार ते ८० हजार खोल्या उपलब्ध आहेत. हॉटेलांमध्ये सर्वात जास्त गर्दी नववर्षाच्या प्रारंभी असते. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या दरम्यान खोली भाड्याचे दर चढे असतात. केळशीच्या सेंट रेजिन्स हॉटेलच्या डिलक्स रूमचे भाडे ३१ डिसेंबर काळात ७० ते ८० हजार रुपयांपर्यंत असते. फाईव्ह स्टार, थ्री स्टार हॉटेलमधील खोलीचे भाडे ३१ डिसेंबर दरम्यान ३० ते ४० हजारांच्या आसपास असते. पणजीपेक्षा कळंगुट, कोलवा, केळशी, उतोर्डा, बाणावली, सिकेरी येथील हॉटेलमधील खोल्यांचे भाडे अधिक असते.
हॉटेलमधील पर्यटकांच्या संख्येबाबत टीटीएजीचे अध्यक्ष जॅक सुखिजा म्हणाले, मागील वर्षी यंदापेक्षा खोलीचे भाडे अधिक होते. यंदा डिसेंबरच्या सुरुवातीला हॉटेलमधील बऱ्याच खोल्या रिकाम्या होत्या. त्यामुळे दर उतरले. नाताळानंतर गर्दी वाढू लागली आहे. बहुतांश हॉटेलमधील खोल्या ९० टक्के भरल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचे दर १० टक्क्यांनी कमी आहेत. त्यामुळे ऑक्युपन्सी वाढण्याला मदत झाली.
लहान हॉटेलमधील खोल्या पूर्ण भरण्याची शक्यता
विदेशी पर्यटक अधिक दिवस फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहतात. त्यामुळे हॉटेलबरोबरच टॅक्सीवाल्यांच्या व्यवसायही तेजीत आहे. देशी पर्यटक तुलनेत स्वस्त असलेल्या लहान हॉटेलांमध्ये राहतात. फाईव्ह स्टार आणि थ्री स्टार हॉटेलांपेक्षा लहान हॉटेलमधील ऑक्युपन्सी कमी आहे. वर्षअखेरच्या दिवशी देशी पर्यटकांची संख्या वाढल्यास लहान हॉटेलांमधील खोल्या भरण्याची शक्यता आहे, असे टीटीएजीचे अध्यक्ष जॅक सुखिजा यांनी सांगितले.
नववर्ष स्वागतासाठी व्हीआयपींचीही गोव्याला पसंती
सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत जोमाने करण्यासाठी सिने कलाकार, राजकारणी, सिलेब्रिटींनी गोव्याला पसंती दर्शवली आहे. यंदाही केंद्रीय मंत्री, राजकीय नेते, न्यायाधीश यांचे गोव्यात आगमन झाले आहे. केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियूश गोयल, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार बसवराज बोम्मई नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात दाखल झाले आहेत. त्यांची ही गोवा भेट खासगी स्वरूपाची आहे, अशी माहिती शिष्टाचार खात्याच्या सूत्रांनी दिली. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्यल न्यायाधीश (अॅक्टिंग) विभू बाक्रू, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनमोहन हे लवकरच गोव्यात येणार आहेत.