पणजी : जमीन हडप घोटाळ्यातील आरोपी सिद्दिकी उर्फ सुलेमान खान याला केरळातून अटक करून गोवा पोलिसांनी २३ रोजी गोव्यात आणले होते. त्यावेळी त्याच्या सोबत त्याची पत्नी अफसाना उर्फ सारिका सुलेमान खान होती. तिला जमीन हडप प्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केली होती. दरम्यान, संशयित अफसाना सुलेमान खान हिने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले आहे.
चार वर्षांपासून फरार असलेल्या संशयित सिद्दिकी (सुलेमान) खान याला १२ नोव्हेंबर रोजी एसआयटीने हुबळीमधून अटक केली होती. त्याच्यावर जमीन हडप, खून, खुनी हल्ला व फसवणूक यांसारखे देशभरात एकूण १५ गुन्हे नोंद आहेत. गोव्यात ७, दिल्लीत १, हैदराबादमध्ये ४ व पुणे येथे ३ गुन्हे दाखल आहेत. एकतानगर-म्हापसा येथील १, गवळीमळ तिसवाडी येथील ३ व थिवी येथील २, अशा एकूण सहा मालमत्ता त्याने हडप केल्या.
दरम्यान, सिद्दिकीने १३ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास गुन्ह्या शाखेच्या कोठडीतून पलायन केले होते. त्यासाठी त्याने बडतर्फ आयआरबी कॉन्स्टेबल संशयित अमित नाईक याची मदत घेतली होती. त्यानंतर गुन्हा शाखेच्या पथकाने एर्नाकुलम-केरळ पोलिसांच्या मदतीने संशयित सिद्दिकीला २१ रोजी अटक केली होती. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी अफसाना उर्फ सारिका सुलेमान खान होती. तिचाही जमीन हडप प्रकरणात सहभाग असल्यामुळे एसआयटीने तिला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने तिला प्रथम एसआयटीची कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर तिला न्यायालयीन कोठडी रवानगी केली. याच दरम्यान संशयित अफसाना सुलेमान खान हिने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले आहे.