अप्रेंटिसशीप : नोकऱ्या मिळालेल्यांचा डेटा सरकारकडे नाही!

राज्यभर‍ातील सुमारे आठ हजार तरुण-तरुणींनी घेतला योजनेचा लाभ


30th December 2024, 11:28 pm
अप्रेंटिसशीप : नोकऱ्या मिळालेल्यांचा डेटा सरकारकडे नाही!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री अप्रेंटिसशीप योजनेचा अ‍ातापर्यंत राज्यातील हजारो तरुण-तरुणींनी लाभ घेऊन, एका वर्षाचे प्रशिक्षणही पूर्ण केले. परंतु, त्यातील किती जणांना संबंधित कंपन्या, हॉटेल्सनी नोकरीची संधी दिली, याचा डेटा सरकारकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
राज्यातील वाढत्या बेरोजगारीवर नियंत्रण आणण्यासाठी, तसेच स्थानिक तरुण-तरुणींना खासगी क्षेत्रात नोकऱ्या मिळवून देण्यासाठी सरकारने गेल्यावर्षी मुख्यमंत्री अप्रेंटिसशीप योजना सुरू केली होती. कौशल्य विकास खात्यामार्फत योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. योजनेअंतर्गत राज्यात कार्यरत विविध कंपन्या, हॉटेल्सनी तरुण-तरुणींना एका वर्षाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील कौशल्य वाढवावे आणि प्रशिक्षण संपताच पात्र उमेदवारांना आपल्याच अास्थापनात नोकऱ्या द्याव्या, अशा सूचना सरकारने केल्या होत्या. त्यानंतर राज्यभर‍ातील सुमारे आठ हजार तरुण-तरुणींनी योजनेचा लाभ घेतला. त्यातील हजारो जणांनी एक‍ वर्षाचे प्रशिक्षणही पूर्ण केले. परंतु, सरकारच्या सूचनेनुसार त्यातील किती जणांना संबंधित आस्थापनांनी नोकर्‍या दिल्या, याचा डेटा मात्र सरकारने आतापर्यंत घेतलेला नाही. कौशल्य विकास खात्याचे संचालक एस. एस. गावकर यांनीही सोमवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना अशाप्रकारचा डेटा आम्ही कंपन्या, हॉटेल्सकडून घेतला नसल्याचे स्पष्ट केले.
पंचतारांकित हॉटेल्समध्ये अनेकांना मिळाल्या नोकऱ्या
मुख्यमंत्री अप्रेंटिसशीप योजनेअंतर्गत सद्यस्थितीतही सरकारी खात्यांत पाच हजारांहून अधिक, तर खासगी क्षेत्रांत आठ हजारांहून अधिक तरुण-तरुणी प्रशिक्षण घेत आहेत. पंचतारांकित हॉटेल्स तसेच हॉस्पिटॅलिटी संदर्भातील अास्थापनांत प्रशिक्षण घेतलेल्या अनेकांना तेथेच नोकरीची संधी मिळालेली आहे. पण, त्यांचा अधिकृत आकडा आपल्याकडे नसल्याचे एस. एस. गावकर यांनी सांगितले.