पहिली ते तिसरी, सहावीचा अभ्यासक्रमही बदलणार
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पुढील शैक्षणिक वर्षात नव्या शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) पहिली ते तिसरी आणि सहावी या वर्गांचा अभ्यासक्रम बदलण्यात येईल. तसेच दहावीसाठीही या धोरणाची अंमलबजावणी करून नववी आणि दहावीसाठी दोन अतिरिक्त विषय लागू करण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘एससीईआरटी’च्या संचालक मेघना शेटगावकर यांनी सोमवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
पहिली ते तिसरी आणि सहावीसाठी अभ्यासक्रम सुरू करण्याचे काम याबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून अंतिम टप्प्यात आले आहे. त्यासंदर्भात सर्वच शाळांकडून त्यांना लागणाऱ्या पुस्तकांची माहितीही मागवण्यात आली आहे. जानेवारी अखेरपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रयत्न ‘एससीईआरटी’कडून सुरू आहेत, असे शेटगावकर म्हणाल्या.
राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांत फाऊंडेशनसह इतर पातळींवरील काही वर्गांसाठी ‘एनईपी’ अंमलबजावणी केली आहे. पुढील वर्षी नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या सर्वच वर्गांना ‘एनईपी’ लागू करण्याचे निश्चित करून ‘एससीईआरटी’ने त्याअनुषंगाने कामही सुरू केले आहे. ‘एनईपी’अंतर्गत पुढील वर्षी पहिली ते तिसरी तसेच सहावीचा अभ्यासक्रम बदलण्याचे निश्चित झाले आहे. दहावीसाठीही हे धोरण लागू करून नववी आणि दहावीसाठी गोव्यातील विषयांचा समावेश असलेले दोन अतिरिक्त अभ्यासक्रम सुरू करण्याचे निश्चित झाले आहे. ‘एनईपी’संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून या अभ्यासक्रमांचा आढावा घेतला जात आहे. जानेवारी अखेरपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल, असेही त्यांनी नमूद केले.
शिक्षकांसाठी प्रशिक्षण सुरू
‘एनईपी’अंतर्गत अभ्यासक्रम बदलल्यानंतर त्यांचे अध्यापन करण्यासाठी शिक्षकांना राज्यात तसेच राज्याबाहेर नेऊन वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात आले आहे. काही शिक्षकांना प्रशिक्षण देणे सुरू आहे, अशी माहितीही मेघना शेटगावकर यांनी दिली.