भंगार गोळा करणाऱ्या ५ महिलांना अटक
पणजी : चिवार-हणजूण येथील बंद घर फोडून आतील लाखो रुपयांचे रत्न व सुवर्णलंकार लंपास झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी म्हापशातील भंगार गोळा करणाऱ्या पाच महिलांना अटक केली.
अटक केलेल्या संशयितांमध्ये ललिता लमाणी (३०), लक्ष्मी लमाणी (३३), रेणूका पवार (४०), पारू पुजारी (४७) व निलवा लमाणी यांचा समावेश आहे. संशयित आरोपी मूळ कर्नाटकमधील असून सध्या त्या म्हापशातील करासवाडा-कुचेलीमध्ये वास्तव्यास आहेत.
सदर चोरीची घटना १९ डिसेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान घडली होती. याकाळात हे घर बंद होते. फिर्यादी डॉ. फेन्टन डिसोझा यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील्स तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील सुवर्ण आणि रत्नाचे दागिने आणि इतर पुरातन वस्तू मिळून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
हा प्रकार सोमवारी २३ डिसेंबर रोजी फिर्यादींच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. चौकशीनंतर पोलिसांनी शनिवारी २८ रोजी रात्री संशयित महिलांना पकडून ताब्यात घेतले. या चोरीमध्ये संशयित महिलांचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी रविवारी दि. २९ रोजी त्यांना रितसर अटक केली. पोलिसांनी संशयित महिलांकडून या चोरीतील काही वस्तू जप्त केल्या असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.