गोवा : महिला सुरक्षेसाठी महिला पोलिसांनी वाढवावा महिलांशी संवाद

मुख्यमंत्र्यांनी घेतली महिला पोलिसांची बैठक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th October, 12:37 am
गोवा : महिला सुरक्षेसाठी महिला पोलिसांनी वाढवावा महिलांशी संवाद

महिला पोलिसांशी संवाद साधताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.

पणजी : महिला पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांच्याशी संवाद साधून शैक्षणिक संस्था तसेच पंचायत क्षेत्रात जनजागृती करावी, असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महिला पोलिसांना दिला. याबाबत त्यांनी गुरुवारी महिला पोलिसांची बैठक घेतली.
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. तसेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही वाढत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महिला पोलिसांची बैठक घेतली. या बैठकीला पोलीस महासंचालक आलोक कुमार, पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस अधिकारी उपस्थित होते. महिलांवरील गुन्ह्यांच्या तपासात महिला पोलीस महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच अत्याचारग्रस्त महिलांना मदत करण्यासाठी महिला पोलीसही चांगले काम करू शकतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पंचायती, शैक्षणिक संस्थांमध्ये जागृती करा !
महिला पोलिसांनी महिलांसह समाजाशी संवाद वाढवण्याची गरज आहे. महिलांनी सावधगिरी कशी घ्यावी आणि सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे याचे मार्गदर्शन केले पाहिजे. महिला पोलीसांनी शाळांमध्ये जाऊन कायदा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत जागृती करणे आवश्यक आहे. त्यामुळे मुलांबरोबरच विद्यार्थ्यांमध्येही जागरूकता वाढेल. तसेच पंच व नगरसेवकांच्या मदतीने लोकांमध्ये जनजागृती करावी. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महिला पोलिसांना पोलीस ठाण्यातही पीडित महिलांचे समुपदेशन करण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा