सासष्टी : वेलिंगकरांच्या अटकेसाठी मडगावात पुन्हा रास्तारोको

आंदोलकांनी ओल्ड मार्केट ते कदंब बसस्थानकापर्यंत वाहतूक थोपवून धरली

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
सासष्टी : वेलिंगकरांच्या अटकेसाठी मडगावात पुन्हा रास्तारोको

मडगाव : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सुभाष वेलिंगकर यांच्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतरही शनिवारी सकाळी  ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत मडगाव पोलीस मुख्यालयाबाहेर गर्दी केली. त्यानंतर ओल्ड मार्केट सर्कलकडे जात वाहतूक रोखत अटक होईपर्यंत आंदोलन करण्याचे ठरवले. या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यात अडकलेल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.

सेंट फ्रान्सिस झेविअर यांच्याबाबत सुभाष वेलिंगकर यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. राज्यभरात विविध पोलीस स्थानकांत ख्रिस्ती बांधवांनी तक्रार करुनही गुन्हा दाखल न झाल्याने शुक्रवारी सायंकाळी दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयावर सर्वधर्मीय नागरिकांनी मोर्चा काढला. यावेळी पोलीस मुख्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री उशिरा डिचोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर पोलिसांनी याची माहिती आंदोलकांना दिली. मात्र, त्यानंतरही रात्री एक वाजेपर्यंत काँग्रेसचे खासदार, आमदार, आपचे कार्यकर्ते ओल्ड मार्केट सर्कलवर थांबून आंदोलन करत होते.  शनिवारी सकाळपासून पुन्हा आंदोलन सुरु झाले. मडगाव पोलीस मुख्यालयावर गर्दी करत ख्रिस्ती बांधवांनी प्रा. वेलिंगकर यांना अटक करण्याची मागणी केली.

फातोर्डा, मायना कुडतरीत तक्रार दाखल

सुभाष वेलिंगकर यांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी फातोर्डा परिसरातील नागरिकांनी सकाळी पोलीस स्थानक गाठले. पोलिसांना निवेदन देत वेलिंगकर यांच्यावर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला असून पुढील कारवाई सुरु असल्याचे सांगितले. त्यानंतर आंदोलन मडगाव पोलीस स्थानकात आले. याशिवाय राशोल, लोटली, कामुर्ली येथील नागरिकांनी एकत्र येत मायना कुडतरी पोलिसांत तक्रार नोंद केलेली आहे.

वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

कोलवा सर्कलकडे आंदोलकांनी रस्ता बंद केल्यानंतर ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या मार्गाने पोलिसांनी वाहतूक वळवली. वाहतूक वळवण्यात येत असल्याचे दिसताच आंदोलकांनी सर्कलकडून मडगाव कदंब बसस्थानकापर्यंत येत त्याठिकाणी रास्तारोको केला. काही नागरिकांनी वाहने हटवत रस्ता मोकळा करण्याचा प्रकार होताच वादावादीचे व मारहाणीचे प्रसंग देखील ओढवले. पोलिसांकडून परिस्थिती शांतपणे हाताळण्याचे प्रयत्न केले जात आहेत.


पोलिस, मामलेदारांचे समजावण्याचे प्रयत्न फोल

आंदोलकांनी मडगावातील बहुतांशी रस्ते बंद केल्यानंतर नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांची समजूत काढताना वेलिंगकरांचा शोध सुरु आहे त्यांच्यावर कारवाई होईल, असे सांगितले पण आंदोलकांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. मामलेदार प्रताप गावकर यांनीही आंदोलकांशी चर्चा करताना नागरिकांना त्रास होत असून रस्ते खुले करण्याची मागणी केली. त्यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारला वेलिंगकरांना अटक करायला सांगा, दोन मिनिटात रस्ते खुले करु असे स्पष्ट केले. 

लाकडाचे ओंडके टाकून रस्ते बंद

मडगाव ओल्ड मार्केटकडे सुरु करण्यात आलेला रास्ता रोकोनंतर आंदोलकांनी कदंब बसस्थानकाकडे धाव घेतली. तसेच काहींनी रवींद्र भवन सर्कलकडील रस्ते बंद केले. प्रतिमा कुतिन्हो व वॉरेन आलेमाव यांनी कदंबच्या तिकीट खिडकीवरील कर्मचार्‍याला काम बंद करण्यास लावत प्रवाशांना जाण्यास सांगितले. बस लाकडे टाकून अडवण्यात आल्या. बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांना याचा मोठा त्रास झाला.

पर्यटक, विद्यार्थी पायी चालत रवाना

कदंब बसस्थानकानजीक गाड्या अडवून ठेवण्यात आल्यानंतर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना बसमधून उतरुन पायी प्रवास करत पुढे जावे लागले. याशिवाय शाळा, महाविद्यायलये सुटल्यानंतर मुलांनाही पालकांच्या गाड्या पुढे येत नसल्याने पालकांपर्यंत पायी चालत जावे लागले. ज्यांच्याकडे मोबाइल नव्हते त्यांना आणखी त्रास सहन करावा लागला. खासगी बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांनाही गाडी अडवून खाली उतरवण्याचे प्रकार घडले.


फातोर्डा, मडगावातील रहिवाशांना जास्त त्रास

फातोर्डा कदंब बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय व मडगावच्या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरी जाण्यासाठी किंवा कामासाठी जाण्यासाठी या आंदोलनामुळे त्रास झाला. त्यांना गाड्या पुढे नेउ दिल्या गेल्या नाहीत व माघारी जाण्यास सांगितले. काहींशी वादावादीही झाली. तर कदंब बसस्थानकानजीक दुचाकीचालकाने विचारणा केल्याने मारहाणीचा प्रकारही घडला. 

हतबल पोलिसांची बघ्याची भूमिका

आंदोलकांनी एकेक करत मडगाव परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यास सुरुवात केली. आंदोलकांनी पोलिस किंवा जिल्हा प्रशासनाची कोणतीही गोष्ट ऐकण्यास नकार दिला. राज्य सरकारकडूनही यावर तत्काळ निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे सायंकाळपर्यंत नागरिकांना आंदोलकांपासून वाचवण्याचा प्रयत्न करत पोलिसही हतबल झाल्याचे दिसून आले.


हेही वाचा