श्रीनगर : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या कारवायांशी संबंधित प्रकरणात जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, यूपी, आसाम आणि दिल्ली येथे छापे टाकत आहे. एकूण २२ ठिकाणी हे छापे टाकण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, NIA महाराष्ट्रातील मालेगाव शहरातही छापे टाकत आहे. शहरातील मशरकी इक्बाल रोडवरील अब्दुल्ला नगर येथील डॉक्टरांच्या होमिओपॅथी क्लिनिकवर शुक्रवारी रात्री उशिरापासून छापा टाकण्याचे काम सुरू आहे.
पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या चौकशीचा एक भाग म्हणून राष्ट्रीय तपास संस्थेने शनिवारी अनेक राज्यांमधील २२ ठिकाणी शोध घेतला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्ली येथे शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान नुकतेच एनआयएने पश्चिम बंगालमधील विविध जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले होते. एनआयएच्या पथकाने दक्षिण २४ परगणा, आसनसोल, हावडा, नादिया आणि कोलकाता जिल्ह्यातील ११ ठिकाणी संशयितांच्या निवासस्थानांची व्यापक झडती घेतली. संशयित सीपीआय (माओवादी) चे सक्रिय कार्यकर्ते होते आणि त्यांनी संघटनेच्या कमांडरना नक्षलवादी कारवाया करण्यात मदत केली होती, असे एनआयएने म्हटले आहे.
एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, झडतीदरम्यान अनेक कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पॅम्प्लेट्स, मासिके आणि हस्तलिखित पत्रे जप्त करण्यात आली आहेत. हे प्रकरण पॉलिट ब्युरो, केंद्रीय समिती सदस्य, कामगार आणि बंदी घातलेल्या संघटनेच्या समर्थकांच्या कटाशी संबंधित आहे.