बार्देश : मास्कधारी टोळीने फोडली सात महिन्यांत ७०हून अधिक घरे

फेब्रुवारी ते सप्टेंबर या काळात कोट्यवधी रुपयांचा ऐवज लुटला

Story: उमेश झर्मेकर |
14 hours ago
बार्देश : मास्कधारी टोळीने फोडली सात महिन्यांत ७०हून अधिक घरे



गोवन वार्ता
म्हापसा : पर्वरी पोलिसांनी पकडलेल्या मास्कधारी टोळीने ७ महिन्यांत सुमारे ७०हून अधिक घरांत चोरी केली आहे. फेब्रुवारी ते सप्टेंबर या काळात या टोळीने कोट्यवधी रुपयांचा ऐवज लुटला. बार्देश, तिसवाडी, फोंडा व मुरगाव तालुक्यांतील बंगले आणि फ्लॅटना त्यांनी लक्ष्य बनवले. चोरी प्रकरणी आणखी दोघांना अटक झाली आहे. मडगावमधील एका सोनाराची चौकशी सुरू आहे. चोरीचे दागिने त्याने खरेदी केल्याचा संशय आहे. सोनाराची अटक टाळण्यासाठी काही जण पोलिसांवर दबाव टाकत आहेत.

पोलिसांनी २ ऑक्टोबर रोजी मास्कधारी संघटित टोळीचा पदार्फाश करत मुख्य सूत्रधार मारियो सांताना बाप्तिस्ता ऊर्फ सांतान (४४, रा. ग्रॅण्ड पेडे, बाणावली) आणि मोहम्मद सुफियान शेखमिया (२०, रा. कालकोंडा-मडगाव) यांना अटक केली होती. गुरुवारी रात्री समर पाल (रा. दवर्ली व मूळ हुगली-पश्चिम बंगाल) आणि फिलिप राटो (रा. बाणावली) यांना अटक केली. म्हापसा न्यायालयाने बाप्तिस्ता व शेखमिया यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. समर पाल व फिलिप राटो यांना ७ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. समर पाल हा दागिने बनवणारा कारागीर आहे. फिलिप राटो हा मारियोकडून चोरीचे दागिने घेऊन ते विकण्याची दलाल म्हणून कामगिरी बजावत होता.
सुमारे आठ वर्षांनी, फेब्रुवारी २०२४ पासून बाप्तिस्ता आणि महाविद्यालयीन युवक शेखमिया यांनी घरफोडीचे सत्र आरंभले होते. बंगले, मोठी घरे आणि आलिशान फ्लॅटना या टोळीने लक्ष्य केले होते. पर्वरी पोलिसांच्या प्रयत्नामुळे ही टोळी गजाआड झाली. या चोरांना कुठे-कुठे चोऱ्या केल्या, याची आठवणही नाही. मोठ्या प्रमाणात घरे फोडल्याने त्यांच्याकडून माहिती मिळवणे पर्वरी पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
पॉश एरियांनाच टोळीने केले लक्ष्य
पर्वरी, म्हापसा, शिवोली, साळगाव, नागाळी, दोनापावला, मेरशी, बांबोळी, वेळसांव-पाळी व फोंडा या गावातील पॉश एरियांमधील घरांनाच या टोळीने आपले लक्ष्य बनवले होते. बार्देश, तिसवाडी, फोंडा व मुरगाव तालुक्यांत या टोळीने उच्छाद मांडला होता. घरे फोडून कोट्यवधींचा ऐवज लंपास करणाऱ्या या टोळीने गोवा पोलिसांसमोर आव्हान उभे केले होते.          

हेही वाचा