भारतीय महिलांसमोर न्यूझीलंडचे कडवे आव्हान

महिला टी २० विश्वचषक २०२४ : शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौरचा फॉर्म चिंतेचा विषय

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
04th October, 12:07 am
भारतीय महिलांसमोर न्यूझीलंडचे कडवे आव्हान

दुबई : महिला टी २० विश्वचषक २०२४ सुरू झाला आहे. शुक्रवारी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारतासमोर न्यूझीलंडचे कडवे आव्हान असेल.दोन्ही संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. भारतीय संघ आपल्या पहिल्या टी २० विश्वचषकाच्या ट्रॉफीच्या शोधात आहे. आतापर्यंत टीम इंडियाने दोनवेळा फायनल गाठूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे, मात्र यावेळी टीम इंडिया विजेतेपदाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी सलामीवीर शेफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौरचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी तणाव वाढवणार आहे. या दोन दिग्गजांचा अलीकडचा फॉर्म निराशाजनक आहे. याशिवाय स्मृती मानधना खराब फॉर्मशी झगडत आहे. आकडेवारी दर्शवते की शेफाली वर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये केवळ २५ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याचवेळी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सराव सामन्यात शेफाली वर्मा ७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. तसेच भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चांगला संकेत नाही.आकडेवारी दर्शवते की २०१९ नंतर, हरमनप्रीत कौर ही टी २० फॉरमॅटमध्ये १२० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा करणारी एकमेव फलंदाज आहे. तर, नुकतीच हरमनप्रीत कौर द वुमेन्स हंड्रेड आणि महिला बिग बॅशमध्ये अनसोल्ड राहिली. संघांनी भारतीय कर्णधारात रस दाखवला नाही. याशिवाय महिला प्रीमियर लीगमध्ये हरमनप्रीत कौरचा फॉर्म निराशाजनक होता. मात्र, भारतीय चाहत्यांना न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्या कर्णधाराकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. आता हे पाहणे रंजक ठरणार आहे की, हरमनप्रीत कौर अपेक्षांवर कितपत खरी उतरते.
दरम्यान, या सामन्यापूर्वी भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी त्यांनी आपले दोन्ही सराव सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंडचा संघही विशेष फॉर्ममध्ये नाही. अलीकडेच त्यांना ऑस्ट्रेलियन महिला संघाने क्लीन स्वीप केले. भारत आणि न्यूझीलंड संघ २००९ पासून टी-२० सामने खेळत आहेत. भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकूण १३ टी-२० सामने खेळले गेले आहेत. जिथे न्यूझीलंड संघाचा वरचष्मा दिसतो. न्यूझीलंडने या १३ टी २० पैकी ९ सामने जिंकले आहेत. तर भारतीय संघाने केवळ ४ सामने जिंकले आहेत. भारत आणि न्यूझीलंडच्या महिला संघाने २०२२ मध्ये शेवटचा टी-२० सामना खेळला होता. तिथे न्यूझीलंडने टीम इंडियाचा १८ धावांनी पराभव केला. मात्र, तेव्हापासून टीम इंडिया खूप बदलली आहे आणि भारतीय संघ न्यूझीलंडलाही हरवेल अशी आशा खूप आहे. मात्र, टीम इंडिया न्यूझीलंडला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही.
महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडशिवाय टीम इंडियाचा सामना पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्धचा सामना ६ ऑक्टोबरला होणार आहे. टीम इंडिया ९ ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्ध सामना खेळणार आहे. याशिवाय भारतीय संघ १३ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये टॉप २ मध्ये आलेला संघच सेमीफायनलमध्ये पोहोचेल.
भारतीय महिलांचा संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मानधाना, शैफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन
न्यूझीलंड महिलांचा संघ : सोफी डिवाइन (कर्णधार), सूजी बेट्स, ईडन कार्सन, इजी गेज, मॅडी ग्रीन, ब्रुक हॉलिडे, फ्रान जोनास, लेघ कास्पेरेक, मेली केर, जेस केर, रोजमेरी मेयर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हन्ना रोवे, ली ताहुहु
आजचा सामना
भारत विरुद्ध न्यूझीलंड (महिला)
वेळ : सायं. ७.३०
स्थळ : दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, दुबई
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिझ्ने+हॉट स्टार अॅप