महिला टी २० विश्वचषक : टीम इंडियाला विजय आवश्यक
दुबई : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाचा पहिला सामना न्यूझीलंडसोबत होता. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा मुकाबला पाकिस्तानशी शनिवारी होणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाला आपली मोहीम पुन्हा रुळावर आणायची असेल, तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांना आपल्या चुका सुधाराव्या लागतील. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे भारतीय संघाची धावगतीही खालावली आहे.
टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानविरुद्ध केवळ विजय नोंदवावा लागणार नाही तर धावगती सुधारण्याचीही गरज आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसोबतच फलंदाजांसाठीही उपयुक्त आहे. टीम इंडियाचा न्यूझीलंडशी सामना याच मैदानावर झाला. खेळपट्टी फलंदाजीसाठी अतिशय सपाट होती. त्यामुळे न्यूझीलंडने १६० धावा केल्या. मात्र, दुसऱ्या डावात टीम इंडियाची फलंदाजी सामान्य होती अन्यथा ही धावसंख्या गाठणे कठीण गेले नसते.
टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात, दुबईत प्रथम खेळणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या १४१ आहे आणि दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या १२५ धावा आहे. टीम इंडियाने आपला पहिला सामना या मैदानावर खेळला, त्यामुळे हरमनप्रीत कौरला आता खेळपट्टीची ओळख झाली आहे. अशा परिस्थितीत जो संघ नाणेफेक जिंकेल, तो प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेईल आणि धावफलकावर मोठी धावसंख्या उभारेल. मात्र, दुसऱ्या डावात दव पडल्याने गोलंदाजांना थोडे अवघड जाऊ शकते.
भारताचे पारडे जड
टी २० क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान महिला संघ एकूण १३ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी टीम इंडियाने १० सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला केवळ ३ वेळा यश मिळाले आहे. टी २० विश्वचषकात बोलायचे झाले तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात ६ सामने झाले आहेत, त्यापैकी ४ भारताने जिंकले आहेत आणि २ पाकिस्तानने जिंकले आहेत.
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव. श्रेयंका पाटील, सजना सजीवन.
पाकिस्तान : फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, गुल फिरोज, इरम जावेद, मुनिबा अली, नशरा सुंधू, निदा दार, ओमामा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सय्यदा अरुब शाह. तस्मिया रुबाब, तुबा हसन
आजचा सामना
भारत वि. पाकिस्तान
वेळ दु. ३.३० वा.
स्थळ : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिझ्ने+हॉटस्टार अॅप