इराणी चषक क्रिकेट : दिवसअखेर २७४ धावांची आघाडी
मुंबई : इराणी चषक क्रिकेट स्पर्धेतील चौथ्या दिवशी मुंबईने दुसऱ्या डावात ६ गडी गमावून १५३ धावा केल्या आहेत. मुंबईकडे पहिल्या डावातील १२१ धावांची आघाडी आहे. मुंबई संघाने या आघाडीच्या जोरावर दिवसाचा खेळ संपेपर्यंत २७४ धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे.
रेस्ट ऑफ इंडियाच्या गोलंदाजांसमोर मुंबईची दुसऱ्या डावात आज घसरगुंडी झालेली पाहायला मिळाली. रेस्ट ऑफ इंडियाने पहिल्या विकेटचा अपवाद वगळता मुंबईला ठराविक अंतराने झटके देत दिवसअखेर १६० धावांच्या आत रोखले. त्यामुळे आता सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी निकाल लागण्याची शक्यता आहे.
दिवसअखेर सर्फराज खान आणि तनुष कोटीयन हे दोघे ९ आणि २० धावा करून नाबाद परतले. तर त्यापूर्वी पृथ्वी शॉ आणि आयुष म्हात्रे या सलामी जोडीचा अपवाद वगळता टॉप आणि मिडल ऑर्डरमधील एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. पृथ्वी शॉ याने सर्वाधिक ७६ धावांचे योगदान दिले, तर आयुष म्हात्रेला १४ धावा करून माघारी परतावे लागले. हार्दिक तामोरे, कॅप्टन अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि शम्स मुलानी या चौकडीने निराशा केली. शम्सला भोपळाही फोडता आला नाही. हार्दिक, श्रेयस आणि अजिंक्य या तिघांनी अनुक्रमे ७, ८ आणि ९ अशा धावा केल्या. रेस्ट ऑफ इंडियाकडून सारांश जैन याने या चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला, तर मानव सुथारने २ गडी बाद केले.
रेस्ट ऑफ इंडियाने चौथ्या दिवसाची सुरुवात ४ बाद २८९ धावांपासून सुरुवात केली. मात्र रेस्ट ऑफ इंडियाला चौथ्या दिवशी ६ गड्यांच्या मोबदल्यात १२७ धावाच करता आल्या. त्यामुळे रेस्ट ऑफ इंडियाचा पहिला डाव ४१६ धावांवर आटोपल्याने मुंबईला १२१ धावांची आघाडी मिळाली. रेस्ट ऑफ इंडियाकडून अभिमन्यू ईश्वरनने सर्वाधिक १९१ धावांची खेळी केली. ध्रुव जुरेलने ९३ धावांचे योगदान दिले. इशान किशनने ३८, तर साई सुदर्शनने ३२ धावा केल्या. शेवटच्या दोन फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. तिघांनी दुहेरी आकडा गाठण्याआधीच मैदानाबाहेरचा रस्ता धरला, तर सारांश जैन ९ धावांवर नाबाद परतला. मुंबईकडून तनुष कोटीयन आणि शार्दूल ठाकूर या दोघांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. मोहित अवस्थीने दोघांना मैदानाबाहेर पाठवले, तर एम. खान याने १ बळी मिळवला.