विविध भारती व झुमरी तलैया

विविध भारतीने संगीत कार्यक्रम व हिंदी फिल्म संगीत यानिशी खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता साध्य केली व असंख्य लोकांच्या जीवनात मनोरंजन करत समृध्दी आणली, असं म्हणणं उचित ठरतं!

Story: ये आकाशवाणी है |
25 mins ago
विविध भारती व झुमरी तलैया

आमच्या घरात तीन पिढ्यांची संगीत परंपरा आहे. लहानपणापासून घरंदाज सांगितीक संस्कारितेला जोड म्हणून अभिजात शास्त्रीय संगीताचा कान धारदार, समजदार व्हावा म्हणून जी धडपड मी केली त्यात विविध भारतीच्या श्रवणभक्तीचा फार मोठा आधार आहे. संगीत सरीता हा कार्यक्रम सकाळी यायचा. साडेसात वाजता. दुपारी अनुरंजनी व संध्याकाळी पावणेसातला स्वर-सुधा असे हे तीन कार्यक्रम म्हणजे सामान्यांना शास्त्रीय संगीताच्या बुनयादी धड्यांचे रंजक पध्दतीने ट्यूशन होते. संगीत सरिता या माध्यमातून विविध भारतीने आपल्या देशव्यापी श्रोत्यांना, रसिकांना संगीताची मूलभूत समज देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या कार्यक्रमात आमंत्रित तज्ञ, संगीताचे बारकावे, राग, आरोह, अवरोह, ताल अगदी सोप्या शब्दात समजावत. उदाहरण द्यायचे, गायनाचा ढंग समजवायचे आणि एका संगीत रागावर आधारित फिल्‍मी गीत ऐकवून लोकांना राग ओळखायची खुबी समजावून द्यायचे. कैक वर्षांपासून हा विविध भारतीचा एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून गाजला. संगीत आणि फिल्‍म विश्वातील दिग्गज या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. रागाचा स्वभाव, प्रकृती ऐकण्याची कला, मला या कार्यक्रमातून सहजपणे अवगत होत गेली.   

“यह आकाशवाणी का पंचरंगी कार्यक्रम है विविध भारती...” या आवाजातील निवेदकाची घोषणा मोहक असायची. आवाज bass and baritone. सुंदर खर्ज. मनचाहे गीत कार्यक्रम विविध भारतीवर गाजला. लोक आपली फर्माईश पाठवत. त्यांची नावे वाचली जात. बिहार सारख्या राज्यात वगैरे रेडीयो हे मोठे मनोरंजनाचे साधन होते. फर्माईश केलेल्यांची नावे वाचताना निवेदक वा निवेदिका वाचायची – “रामगड से विनिता शर्मा, डेहराडून से बिपीन शर्मा, रीया शर्मा और झुमरी तलैय्या से...” झुमरी तिलैय्या (तलैया) या गावांची ओळख आम्हा देशवासियांना विविध भारतीने घडवली. हा गाव प्रत्यक्षात बिहारात नाहीच, उगाच काही तरी कल्पित ठोकून देतात असे म्हणण्याचा प्रघात होता. गोव्यात नव्हे तर देशात. कालांतराने तो गाव आहे हे समजलं. ही नोंद हिंदी विकीपिडीयाने सुध्दा केली आहे. एफएम रेडीयो वा टीवी चॅनल नव्हते, तेव्हा झुमरी तलैयातून विविध भारतीला जास्तीतजास्त फर्माईश पत्रांचे खच जायचे. तिकडचे श्रोता,  रामेश्वर बर्णवाल आणि नन्दलाल सिन्हा यांनी आपले नाव सरासरी दर दिवशी या कार्यक्रमात समाविष्ट करण्याचा विक्रम केला. १९५७ पासून विविध भारतीच्या असंख्य चाहत्यांनी झुमरी तलैया गावाला एक झळाळी, चकाकी आणून दिली. हे नाव आमच्या ओठावर असायचं. मला आठवतं की १९८० साली मी मडगांव चौगुले कॉलेजात शिकताना एका मुलाला इतरांनी झुमरी तलैया हे नाव ठेवले होते. ते का ठेवले होते हे समजले नाही. त्याची शहानिशा कोण करणार?

विविध भारतीवर रात्री एक कार्यक्रम यायचा. दहा वाजता असेल. ‘छायागीत’. त्यात फर्माईशी गाणी नसायची पण सुंदर निवेदनाने नटवून, सजवून कार्यक्रम सादर व्हायचा. दर दिवशी वेगवेगळे निवेदक असायचे. कमालीचे वजनदार. त्यांनी “यह विविध भारती...” म्हटल्याबरोबर आम्ही त्यांचं नाव ओळखत असू. त्यांच्या मधुर कंठाचे आवाज घरगुती झाले होते. एक दिवस आम्ही मित्र कॉलेजात कॅंटिनमध्ये बसून या निवेदकांविषयी बोलत होतो. तुला कोण आवडतो, तुला कुणाचं निवेदन व आवाज आवडतो रे... अशी ही चर्चा चालली होती. एकटा म्हणाला - “मला कांता गुप्ताचा आवाज फार आवडतो.” मी हळूच जवळच्या मित्राच्या कानात बोललो, “याला आणखीन निदान एक तरी निवेदकाचं नाव विचार.” त्यानं ते ऐकलं. खवळला. तिथंच वाद वगैरे झाला. गंमतीशीर प्रसंग. 

आज विविध भारती एफएमवर ऐकायला मिळतं. हा आवाज अतीव गोड असतो. शास्त्रीय व फिल्मी संगीत लोकप्रिय करण्याचं, घरोघरी नेण्याचं महान कार्य आकाशवाणीच्या ‘विविध भारती’ कार्यक्रमाने केलं. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, मुलांपासून वृध्दापर्यंत गाण्याचं चांगलं वेड लावण्याचं व खुमारी आणण्याचं काम विविध भारतीने केलं. आम्ही एकदा काश्मीरात गेलो होतो. तिथं यजमान होते त्यांचा तरूण ड्रायव्हर सुवर्ण काळातील अजरामर हिंदी फिल्म गाणी गुणगुणत गाडी चालवत होता. गाडीतही गाणी लावली होती. ‘छोड दो आंचल जमाना क्या कहेगा’, ‘जो वादा किया वो’, ‘अभी ना जाओ छोड के...’ अनेक गाणी त्याला पाठ होती. या हिंदी गाण्यातील मूळ उर्दू शब्दांची समज त्याला होती. विविध भारतीने संगीत कार्यक्रम व हिंदी फिल्म संगीत यानिशी खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता साध्य केली व असंख्य लोकांच्या जीवनात मनोरंजन करत समृध्दी आणली, असं म्हणणं उचित ठरतं!


मुकेश थळी 

(लेखक बहुभाषी साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत)