मुंबईने पटकावला २७ वर्षांनी इराणी चषक

सामना अनिर्णित : सरफराज खान ठरला सामनावीर

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
06th October, 12:00 am
मुंबईने पटकावला २७ वर्षांनी इराणी चषक

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

लखनौ : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने रविवारी इराणी कप २०२४ ची ट्रॉफी जिंकली. मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडियाविरुद्ध सामना अनिर्णित राहिला. लखनौच्या इकना स्टेडियमवर झालेल्या इराणी चषक स्पर्धेत मुंबईने पहिल्या डावात ५३७ धावा केल्या. प्रत्युत्तरात रेस्ट ऑफ इंडिया ४१६ धावांवर गडगडला. सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी दुसऱ्या डावात मुंबईची धावसंख्या ८ बाद ३२९ अशी पोहोचली तेव्हा सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. मुंबईचा २७ वर्षांनंतर इराणी चषक स्पर्धेचा दुष्काळ संपला आहे.
मुंबईने यापूर्वी १९९७-९८ मध्ये विजेतेपद पटकावले होते. मात्र, सामना अनिर्णित असतानाही मुंबईला चॅम्पियन घोषित करण्यात आले.
इराणी चषकातील नियम असा आहे की सामना अनिर्णित राहिला तर पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे विजेता ठरविला जाईल. अशा स्थितीत पहिल्या डावानंतर आघाडीवर असलेल्या संघाला चॅम्पियन घोषित केले जाते. त्यामुळे उर्वरित भारताविरुद्ध पहिल्या डावात १२१ धावांची आघाडी घेतल्याने मुंबईला इराणी चषक ट्रॉफीवर कब्जा करण्यात यश आले.
मुंबईचा फलंदाज सरफराज खानला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. त्याने पहिल्या डावात द्विशतक झळकावले. सरफराजने २८६ चेंडूंचा सामना करत नाबाद २२२ धावा जोडल्या. त्याने २५ चौकार आणि चार षटकार मारले. त्याचवेळी दुसऱ्या डावात सरफराजला केवळ १७ धावा करता आल्या.
रेस्ट ऑफ इंडियाकडून सरांश जैनने एकूण सात विकेट घेतल्या. त्याने दुसऱ्या डावात सहा आणि पहिल्या डावात एक बळी घेतला. रेस्ट ऑफ इंडियाकडून अभिमन्यू ईश्वरने १९१ धावांची शानदार खेळी केली. ध्रुव जुरेल (९३) शिवाय त्याला दुसऱ्या टोकाकडून विशेष साथ मिळाली नाही. दोघांनी पाचव्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारी केली. शम्स मुलानीने ४० षटकांत १२२ धावांत तीन तर कोटियनने २७ षटकांत १०१ धावांत तीन बळी घेतले.

हेही वाचा