पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून ५८ धावांनी मात
दुबई : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारतीय महिला संघाची सुरुवात खराब झाली. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने आपल्या पहिल्या सामन्यात ५८ धावांनी पराभव स्वीकारला. या सामन्यात भारतीय महिला संघाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्यांची पूर्ण निराशा झाली आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टीम इंडियाला हा पराभव जड जाऊ शकतो.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारून २० षटकांत १६० धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाचा महिला संघ १९ षटकांत १०२ धावा करू शकला. त्यामुळे भारतीय महिला संघ पिछाडीवर गेला. आता टीम इंडियाचा दुसरा सामना रविवारी पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाणार आहे.
न्यूझीलंडच्या १६१ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेली टीम इंडिया पॉवर प्लेमध्ये सलामीच्या फलंदाज शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांच्या विकेट गमावून बसली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरही काही आकर्षक फटके लगावून बाद झाली. हरमनप्रीत कौर बाद झाल्यानंतर टीम इंडियावर ताण वाढला आणि मधल्या फळीतील खेळाडू तो दबाव पेलू शकल्या नाहीत. शेफाली वर्माने फक्त दोनच धावा केल्या. त्याशिवाय मंधानाने १२ धावा, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने फक्त १५ धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्ज, ऋचा घोष आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी १३-१३ धावा केल्या. न्यूझीलंडच्या रोजमेरी मेयरने चार गडी बाद केले. त्याशिवाय ताहुहूने दोन, तर एडन कार्सनने दोन गडी गारद केले. एमेली करने एक विकेट मिळवली.
तत्पूर्वी न्यूझीलंडच्या संघाने नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजी घेत पहिल्या षटकात ९ धावा करत आपले इरादे स्पष्ट केले होते. न्यूझीलंडला यावेळी ६७ धावांची दमदार सलामी मिळाली. भारताला सुरुवातीला ७ षटकांत एकही विकेट मिळवता आली नव्हती. पण त्यानंतर अरुंधती रेड्डीने आठव्या षटकात सुझी बेट्सला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतरच्याच षटकात आशा शोभनाने न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. त्यामुळे न्यूझीलंडची बिनबाद ६७ वरून २ बाद ६७ अशी अवस्था झाली.
या सामन्यात टीम इंडियाची गोलंदाजीही निष्प्रभ ठरली. भारतीय संघ पाॅवर प्लेमध्ये एकाही फलंदाजाला बाद करू शकला नाही. न्यूझीलंडच्या सलामीच्या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागिदारी केली. त्यानंतर सोफी डिवाइनने जोरदार फलंदाजी केली. सोफी आपल्या संघासाठी ५७ धावा करून नाबाद राहिली. टीम इंडियाच्या रेणुका सिंहने दोन गडी बाद केले, तर अरुंधती रेड्डी और आशा शोभना यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. खराब गोलंदाजीसह टीम इंडियाने खराब क्षेत्ररक्षण केले.
न्यूझीलंडसाठी नाबाद अर्धशतकी खेळी केलेल्या कर्णधार सोफी डिवाइनना प्लेयर ऑफ द मॅचचे बक्षीस देण्यात आले.
वादामुळे खेळ थांबला...
महिला टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारत वि न्यूझीलंड सामन्यात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या सामन्यातील १४व्या षटकात मोठा गोंधळ झाला, यामुळे सामना काही वेळ थांबला होता. भारताच्या गोलंदाजीदरम्यान मोठा वाद झाला. अंपायरच्या चुकीमुळे टीम इंडियाच्या हातातून एक विकेट निसटली. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर बराच वेळ वाद घालत राहिली, तर संघाचे प्रशिक्षक अमोल मुजूमदारही पंचांशी वाद घालताना दिसले.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड - २० षटकांत ४ बाद १६० धावा
भारत - १९ षटकांत सर्व गडी बाद १०२ धावा
टीम इंडिया ५८ धावांनी पराभूत