नवी दिल्ली : अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू राशीद खान लग्नबंधनात अडकला आहे. राशीद खानच्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या स्टार क्रिकेटरने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये पश्तून रितीरिवाजानुसार लग्न केले, ज्यामध्ये अफगाणिस्तान संघातील अनेक मोठे खेळाडू सहभागी झाले होते. विशेष म्हणजे राशिदबरोबर त्याच्या इतर तीन भावांनीही लग्न केले आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू राशिद खानने वयाच्या २६ व्या वर्षी लग्न केले. रशीदने ३ ऑक्टोबरला काबूलच्या एका हॉटेलमध्ये एका शानदार सोहळ्यात लग्नगाठ बांधली. मोहम्मद नबी आणि मुजीब उर रहमान सारखे स्टार क्रिकेटर्स या खास प्रसंगी रशीदच्या आनंदात सहभागी होण्यासाठी पोहोचले. याशिवाय अजमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झादरन आणि रहमत शाह यांनीही राशिदच्या लग्नाला हजेरी लावली होती. अफगाणिस्तानातील अनेक क्रिकेटपटूंनी रशीदबरोबरचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आणि लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. राशीदने त्याच्याच नात्यातील एका मुलीशी लग्न केल्याचा दावा केला जात आहे.
या लग्नात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. तालिबानी सैनिक एके-४७ घेऊन लग्न समारंभात फिरताना दिसत होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. राशिदचा विवाह काबुलमधील इम्पीरियल कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये पार पडला, ज्यात सहकारी क्रिकेटपटू, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डचे अधिकारी आणि तालिबान सरकारमधील अनेक लोक उपस्थित होते.
राशिद खान गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळला होता. तीन सामन्यांच्या या मालिकेत अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २-१ असा विजय मिळवून इतिहास घडवला होता. अफगाणिस्तानला प्रथमच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकण्यात यश आले.