पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचा ४ महिन्यांपासून पगार रखडला

महिला क्रिकेट संघही विश्वचषक फुकटात खेळतोय

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
04th October, 11:50 pm
पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचा ४ महिन्यांपासून पगार रखडला

कराची : गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलथापालट होताना दिसत आहे. एकीकडे खेळाडू आणि व्यवस्थापन राजीनामा देत असताना दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेटकडे पैसेच शिल्लक नसल्याचे उघड झाले आहे.
पाकिस्तानी मीडियामधून समोर आलेल्या माहितीने सध्या खळबळ उडाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून १ ऑगस्ट २०२३ पासून बोर्डाशी २३ महिन्यांच्या करारावर असलेल्या खेळाडूंना जून २०२४ पासून वेतन दिले गेलेले नाही, अशी माहिती समोर येत आहे. बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी यांच्यासारख्या खेळाडूंना देखील पैसे मिळाले नाहीत, असेही समोर येत आहे.
पाकिस्तान क्रिकेटमध्ये सुरू असलेल्या सावळ्यागोंधळामुळे पाकिस्तानचा माजी कॅप्टन बाबर आझम याने कर्णधारपद सोडले आहे, तर त्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात निवड समितीचे सदस्य असलेल्या मोहम्मद युसूफने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दोघांनी देखील खासगी कारणास्तव राजीनामा देत असल्याचे सांगितले, परंतु आतली परिस्थिती आता सर्वांसमोर येत आहे.
दरम्यान, एकीकडे पाकिस्तान क्रिकेटकडे खेळाडूंचे पगार देण्यासाठी पैसे नाहीत, पण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पूर्ण तयारी करताना दिसत आहे.