महिला टी-२० विश्वचषक : लॉरा वोल्वार्ड आणि तझमिनची अर्धशतके
दुबई : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील तिसरा सामना दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात रंगला. या सामन्यावर पूर्णपणे दक्षिण अफ्रिकेचे वर्चस्व दिसले. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजला दहा गड्यांनी पराभूत करून स्पर्धेतील आपली सुरुवात धडाक्यात केली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड आणि तझमिन ब्रिट्स यांनी अर्धशतके झळकावली.
नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दक्षिण अफ्रिकेने खेळपट्टीचा अंदाज घेतला आणि धावांचा पाठलाग करणे पसंत केले. खरेतर या खेळपट्टीवर वेस्ट इंडिजकडून जास्त धावांची अपेक्षा होती. पण फिरकीपटू नॉनकुलुलेको म्लाबाने डोकेच वर काढू दिले नाही. ४ षटकात २९ धावा देत ४ गडी बाद केले. तर मारिजाने कॅपने दोन गडी बाद करण्यात यश मिळवले. त्यामुळे वेस्ट इंडिजला २० षटकात ६ गडी गमवून ११८ धावांपर्यंत मजल मारता आली. दक्षिण अफ्रिकेसाठी हे आव्हान कठीण जाईल असे वाटत होते. पण लॉरा वोल्वार्ड आणि तझमिन ब्रिट्स या जोडीने विजय सोपा केला. पहिल्या विकेटसाठी त्यांनी विजयी धावांची भागीदारी केली. दोघांनी आपले अर्धशतक झळकावले. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेले ११९ धावांचे आव्हान दक्षिण अप्रिकेने १८ षटकातच पूर्ण केले.
कर्णधार लॉरा वोल्वार्डने ४५ चेंडूत ५० धावा केल्या. या खेळीत लॉराने ७ चौकार मारले. तझमिन ब्रिट्सनेही ४५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांच्या खेळीमुळे दक्षिण अफ्रिकेचा विजय पक्का झाला होता. वेस्ट इंडिजचे गोलंदाज या दोघांच्या खेळीपुढे पुरते हतबल झाल्याचे दिसून आले. काही चमत्कार होईल अशी आशा बाळगून चाहते होते. पण तसे काहीच झाले नाही. दक्षिण अफ्रिकेने सहज विजय मिळवला. साखळी फेरीत प्रत्येक सामन्याचे महत्व आहे. कारण प्रत्येक संघाच्या वाटेला ४ सामने आहेत. त्यामुळे उपांत्य फेरी गाठायची तर तीन सामने जिंकणे आवश्यक आहे.
दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजला कमी षटकात पराभूत केल्याने नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. ब गटात दक्षिण अफ्रिकेने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. तर बांगलादेशचा संघ दुसऱ्या क्रमांकावर ढकलला गेला आहे. दक्षिण अफ्रिकेचा पुढचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना ७ ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेची कसोटी लागणार आहे. वेस्ट इंडिजचा पुढचा सामना ६ ऑक्टोबरला स्कॉटलंडशी होणार आहे.