‘सूर्या ब्रिगेड’ आज​ बांंगला टायगर्सशी भिडणार

ग्वाल्हेर येथे आज पहिला टी-२० सामना : मयंंक यादवला संंधी मिळण्याची शक्यता

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
05th October, 11:53 pm
‘सूर्या ब्रिगेड’ आज​ बांंगला टायगर्सशी भिडणार

ग्वाल्हेर : भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-२० मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ग्वाल्हेरमध्ये पहिला सामना खेळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही संघ ग्वाल्हेरमध्ये पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध टी-२० सामना खेळणार आहेत. ग्वाल्हेरमध्ये नवीन स्टेडियम बांधण्यात आले आहे. जिथे हा सामना होणार आहे. प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाले, तर प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसनला यष्टिरक्षक म्हणून संधी मिळू शकते.
बांगलादेशला टीम इंडियाविरुद्ध विजय मिळवणे सोपे नसेल. कारण टीम इंडिया खूप मजबूत स्थितीत आहे. पहिल्या टी-२० सामन्यासाठी भारत अभिषेक शर्मा आणि सॅमसनला सलामीची संधी देऊ शकतो. रियन पराग आणि हार्दिक पंड्याची जागा जवळपास निश्चित झाली आहे. रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनाही संधी मिळू शकते. या दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे.भारत अनुभवी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवू शकतो. अर्शदीपने अनेक प्रसंगी चांगली कामगिरी केली आहे. त्याच्यासोबत मयंक यादवलाही संधी मिळू शकते. इंडियन प्रीमियर लीगच्या शेवटच्या सत्रात मयंकने आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे चर्चेत आला होता. फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईची जागा जवळपास निश्चित झाली आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-२० मालिकेतील सामने मोबाईलवर जिओ सिनेमा आणि टीव्हीवरील स्पोर्ट्स १८ चॅनलवर पाहता येणार आहेत. खास गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे स्मार्ट टीव्ही असेल तर तुम्ही जिओ सिनेमा ॲपच्या माध्यमातून टीव्हीवरही सामना पाहू शकता. यासोबतच तुम्ही डीडी स्पोर्ट्सवर लाइव्ह सामन्याचा आनंद घेऊ शकता. मात्र यासाठी तुमच्याकडे डीडी फ्री डिश असणे आवश्यक आहे. याशिवाय इतर कोणत्याही चॅनलवर तुम्हाला सामना पाहता येणार नाही.
खेळपट्टीचा अहवाल
भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यापूर्वी श्रीमंत माधवराव सिंधिया स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप चांगली असेल अशी अपेक्षा आहे. खेळपट्टी पाहता ती ४० षटकांपर्यंतच्या सामन्यांसाठी योग्य असेल असे वाटते. या स्टेडियममधील सरळ सीमा लहान आहे. अशा स्थितीत वेगवान गोलंदाजांची योजना बिघडू शकते. ग्वाल्हेरची खेळपट्टी सुरुवातीला संथ राहू शकते. मात्र, येथील खेळपट्टीवर अद्याप एकही सामना खेळला गेला नाही. त्यामुळे आत्ताच काही सांगणे घाईचे ठरेल.
भारत विरुद्ध बांगलादेश टी-२० मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहेत, तर दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी अर्धा तास आधी मैदानात उतरतील.

शिवम दुबे मालिकेतून बाहेर
टी २० मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार ऑलराऊंडर शिवम दुबे याने मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी मुंबई इंडियन्सचा दमदार फलंदाज तिलक वर्मा याला संघात स्थान मिळाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शिवम दुबेबाबत माहिती दिली आहे. मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे हा तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. भारताच्या संघ निवड समितीने शिवम दुबेच्या जागी मुंबई इंडियन्सकडून खेळणारा तिलक वर्मा याला संघात समाविष्ट केले आहे. तिलक वर्मा रविवारी सकाळी ग्वाल्हेरमध्ये येऊन संघात दाखल होईल.
भारत : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रियान पराग, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मयंक यादव.
बांगलादेश : लिटन दास (यष्टीरक्षक), तन्झीद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हृदयो, महमुदुल्लाह, जेकर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, तन्झीम हसन साकिब.
भारत विरुद्ध बांगलादेश टी-२० मालिकेचे वेळापत्रक –
६ ऑक्टोबर, पहिली टी-२०: श्री माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियम, ग्वाल्हेर
९ ऑक्टोबर, दुसरी टी-२०: अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
१२ ऑक्टोबर, तिसरी टी-२०: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
आजचा सामना
भारत विरुद्ध बांगलादेश

वेळ : सायं. ७.३० वा.
स्थळ : श्रीमंत माधवराव सिंधिया स्टेडियम, ग्वाल्हेर
थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ नेटवर्क, जीओ सिनेमा अॅप, डीडी स्पोर्ट्स