ऐका ना...

रत्नागिरी जिल्ह्यातील स्वानंदी कोकणातल्या अगदी लहान गावातल्या दैनंदिन आयुष्याचे ब्लॉग करते. तिचे वैशिष्टय असे की, ब्लॉग करायचा म्हणून काम न करता ती काम करताना अगदी सहज ब्लॉग करते

Story: आवडलेलं |
28th September, 05:30 pm
ऐका ना...

कोकणातील जीवनशैलीबद्दल शहरातील लोकांना कायमच अप्रूप वाटत आले आहे. हिरव्यागार झाडांच्या सान्निध्यात रंगीबेरंगी फुलांच्या, पक्ष्यांच्या सोबतीचे आयुष्य सुंदरच असते. आजकाल, समाजमाध्यमांवर कोकणातील बरेच लोक इथल्या जीवनशैलीबद्दल लिहित असतात. बाराही महिने हिरव्या रंगाच्या विविध छटा अंगावर मिरवणाऱ्या कोकणाची छायाचित्रेही या माध्यमांवर झळकत असतात. पर्यटनासाठी कोकण, गोवा प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथल्या प्रसिद्ध ठिकाणांबद्दल, पर्यटन स्थळांबद्दल, देवळांबद्दल लोकांना माहिती असतेच. या क्षेत्रातील लोकांशी त्यांचा नियमित संपर्कही असतो. पण, पर्यटन व्यवसायाशी निगडित नसणारीही अनेक माणसे असतात. अशा ठिकाणी राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांचा रोजचा दिनक्रम काय असेल? प्रत्येक ऋतूत होणाऱ्या बदलांचा दिनक्रमावर काय परिणाम होत असेल? रोजच्या जगण्यातील छोटे-छोटे आनंद, लहान-मोठ्या अडचणी, दुखणी-खुपणी काय असतील असे प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत असतील. ‘कोकणातली माणसे कधीही स्वस्थ बसत नाहीत, ती कायम काम करत असतात..’ असे मी माझ्या आजोबांकडून लहानपणापासून ऐकत आले असले तरी त्याचा प्रत्यक्ष अनुभव इथे, गोव्यात आल्यावरच घेतला. प्रत्येक ऋतूत होणाऱ्या बदलांची तयारी म्हणजे उन्हाळ्यात खळ्यात घालावा लागणारा मांडव, पावसाळ्यातील ताडपत्री. उन्हाळ्यात आंबा, काजू, रातांबे असले तर त्याची उस्तवार करण्यात दिवस पुरा पडत नाही तरीही जोडीला वाळवणे असतातच. मग पावसात भातलावणी, थंडीत आंबा-काजूंच्या बागांना खत देऊन साफसफाई करणे. जोडीला परसातल्या भाज्या, हळद, मिरच्या आणि अनेक बारीक बारीक उद्योग! हे सगळे कमी की काय म्हणताना वर्षभर उत्साहाने साजरे होणारे असंख्य सणवार! मी जेव्हा हे पहिल्यांदा जवळून बघितले तेव्हा अगदी चकित झाले होते. माझ्या शहरी अनुभवांपेक्षा हे सर्वार्थाने वेगळे होते. अनेकजण मला कुतूहलाने विचाराचे की काय गं? कसं असतं कोकणातलं आयुष्य? कशी जगतात गोव्यातली माणसं? या जीवनशैलीबद्दल सगळ्यांना किती काय काय आणि कसे सांगावे असे वाटायचे. माझ्याकडे माहिती असली तरीही प्रत्यक्ष अनुभवाचा अभावच आहे. मग 

“इथले आयुष्य कसे असते हे बघायचे असेल तर इथे येऊनच राहायला हवे.. ते असे सांगता येण्यासारखे नाही..” असे उत्तर द्यायचे. मग एके दिवशी अचानक मला अतिशय लाघवी स्वरात, ‘ऐका ना..’ म्हणत आपल्या ब्लॉगची सुरुवात करणारी स्वानंदी सरदेसाई युट्यूबवर दिसली आणि माझ्या लक्षात आले की नाही, कोकणातले जीवन कसे आहे हे जाणून घेण्यासाठी इथे यायची गरज नाही.. ही मुलगी ते तिच्या व्हिडिओमधून अतिशय साधेपणाने तरीही प्रभावीपणे दाखवते आहे. यामागचे कारण सोपे आहे, ती स्वतः ते आयुष्य जगते आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्वानंदी तिच्या घराचे, बागेचे, शेतीचे, पाळीव प्राण्यांचे, गुरांचे, सणवारांचे थोडक्यात कोकणातल्या अगदी लहान गावातल्या दैनंदिन आयुष्याचे ब्लॉग करते. तिचे वैशिष्टय असे की, ब्लॉग करायचा म्हणून काम न करता ती काम करताना अगदी सहज ब्लॉग करते. ती सराईतासारखी बागेत, शेतीत, गोठ्यात वावरते आणि तितक्याच आत्मविश्वासाने कॅमेऱ्यासमोर उभी राहून माहिती देते. कोकणातल्या आयुष्यातली अगदी लहानातली लहान गोष्टही ती लोकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या व्हिडिओवर एकही नकारात्मक कॉमेंट आढळत नाही. 

शहर किंवा गाव, प्रत्येक प्रकारच्या जीवनशैलीचे काही फायदे आहेत तर काही तोटे. अमुक एक पद्धत बरोबर किंवा अमुक एक जीवनशैली बरोबर असे आपण खातरीने सांगू शकत नाही. प्रसारमाध्यमांवर अनेक वेळा याबद्दल वाद, मतभेदही झाले आहेत, होत असतात. पण, आपल्या वाट्याला आलेल्या आयुष्यातून सकारात्मक गोष्टी वेचण्याचे आणि ते इतरांपर्यंत पोहचवण्याचे कसब स्वानंदीला जमले आहे. नवनवीन माहिती, निसर्गरम्य परिसर, घरगुती गोष्टी आणि हे सगळे दाखवणारी उत्साही कोकणकन्या अल्पावधीतच लोकप्रिय झाली. तिचे ब्लॉग कंटाळवाण्या दिवसांवर चैतन्याचे शिंपण करतात. ‘काय करायचे आहे आता गावात राहून?’ अशीही एक तक्रार सतत ऐकू येत असते. असे म्हणणाऱ्या लहान गावातल्या अनेक तरुण मुलामुलींनी तिच्याकडून प्रेरणा घ्यायला हरकत नाही असे तिचे ब्लॉग बघताना वाटल्याशिवाय राहत नाही. ऐका ना... 


मुग्धा मणेरीकर

फोंडा