तुला ते आठवेल का सारे?

स्मृति आणि विस्मृती हे दोन्हीही देवाने दिलेले वरदान आहेत. खूप प्रमाणापेक्षा जास्त स्मृति साचल्या गेल्या तरी वेड लागायची पाळी येईल त्याचा निचरा होण्यासाठी विस्मृती ही आवश्यक असते.

Story: मनातलं |
28th September, 05:17 pm
तुला ते आठवेल का सारे?

‘आठवणी’ हा चार अक्षरी शब्द आपल्याला जिवंत असेपर्यंत सोबत करतो. आठवणींवर माणूस जगत असतो. हल्लीच माझ्या पाहण्यात आलेल्या अगदी जवळच्या व्यक्ति ज्यांची आठवणींची पाटी पुसून कोरी करकरीत झाली आहे ती म्हणजे माझी मोठी जाऊ. तिला काहीच आठवत नाही. समोरच्या व्यक्तीला ती ओळखत देखील नाही. हल्लीच तिच्या जावयाचे निधन झाले. ती अगदी त्रयस्तपणे त्याच्या हार घातलेल्या फोटोच्या पाया पडत होती. कारण तिला तो कोण? हेच आठवत नव्हतं. त्यामुळे त्या सुख दुख:च्या पलीकडे ती गेली होती. मी त्यांना विचारलं मला ओळखलं का? यावर तिने माझ्या गालावर हात फिरवला आणि म्हणाली तू तर आपलीच की! पण मी कोण? माझं नाव, माझं तिचं नातं, याची तिला अजिबात जाणीव नव्हती. इतक्या वर्षांच्या साऱ्या तिच्या जीवनातल्या आठवणी पार पुसून गेल्या होत्या. दुसऱ्याचं नाही तर स्वत:चेही नाव, गाव, कुठे राहते या विषयी तिला काहीच  सांगता येत नाही.   

हल्ली बऱ्याचजणांकडून ऐकायला मिळणारा हा मानसिक आजार म्हणजे अल्झायमर आणि डिमेनशिया. स्मृतिभ्रंश ही एक व्यथित संवेदना, घरातली व्यक्ति आपल्याला ओळखत नाही ही भावना खूप मनाला त्रास देणारी असते. समोरच्या व्यक्तीची भावनिक आणि मानसिक अवस्थाही अगदी बिकट होऊन जाते. आजकाल समाजातल्या ज्येष्ठ वर्गातील लोकांमध्ये ही समस्या फारच वाढलेली दिसते. 

आठवण विसरण्याची ही घटना कधी कधी काही भागापुरती सीमित असते, तर कधी पूर्णपणे अनुभवाची आठवण हरवलेली असते. प्रत्येक निरोगी माणसात थोडा थोडा विसराळुपणा असतोच, पण याहीपेक्षा योग्य ती माहिती आवश्यक तेव्हा आठवत नसेल किंवा आठवण्यास त्रास होत असेल तर अशा स्थितीस विस्मृती म्हणतात. 

आपल्या मेंदूत बुद्धिमत्तेसाठी उपयुक्त अशी माहिती साठवली जात असते. एका विशिष्ट भागात स्मृतिचे संकलन केले जाते. स्मृति म्हणजे अनुभवांची, जाणिवांची साठवण. व्यक्तीला आलेले जीवनातले अनुभव मिळालेली माहिती, ज्ञान या सारख्या गोष्टी मनात साठवून ठेवण्याची आणि भविष्यात त्या आठवून परत त्याचा अनुभव घेण्याची किंवा वापर करण्याची क्षमता म्हणजे स्मृती. 

स्मृति ही कधी अल्पकालिक असते, तर कधी दीर्घ कालिक असते. हे सर्व कार्य मेंदूचे असते. त्यासाठी माणसाने मेंदूचे महत्त्व ओळखून त्याला प्रगत करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. सुरुवातीला साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टीत विसारळुपणा आला की सावध व्हायला हवे.  आपले मन, बुद्धी आणि शरीर निरंतर कार्यरत राहणे गरजेचे आहे. माणसाची ओळख म्हणजे त्याच्या मेंदूची कर्तबगारी असते. त्याची वाढ व्यवस्थित होण्यासाठी वेळेवर इलाज होणे गरजेचे असते. 

शरिर फिट राहण्यासाठी जसे आपण प्रयत्न करत असतो; व्यायाम, पोषक आहार याची जोड देतो, तसे मेंदूच्या बाबतीत विचार करत नाही. मेंदूच्या पेशी बलवान राहिल्या पाहिजेत म्हणून उपाय योजना सुरू ठेवली पाहिजे. शरीराच्या आजारपणा इतके आपण मनाच्या आजाराला महत्त्व देत नाही, तिकडे दुर्लक्ष करतो तेच खरे महत्त्वाचे असते. मेंदूचे कार्य व्यवस्थित चालले तर तुमची माणूस म्हणून प्रगती होईल. मेंदूची पूर्ण वाढ होईपर्यंत त्याला पोषक आहार पुरवणे, मेंदूला जास्त ताण पडेल असे न करणे, मेंदूला विश्रांती मिळावी म्हणून पुरेशी झोप घेणे, मेंदू सतत अॅक्टिव्ह राहील, यादृष्टीने मनाला विचार करायला लावणारे काही गेम खेळणे, कोडी सोडवणे, सुडोकू सोडवणे, मेंदूला काहीतरी खाद्य पुरवणे जेणे करून तो सतत क्रियाशील राहील त्यामुळे विस्मरणाचा प्रसंग ओढवणार नाही. 

काही गोष्टी आता मोबाइलच्या वापरामुळे आपण लक्षात ठेवत नाही पण पूर्वी दहा आकडी फोन नंबर पण आपले पाठ असायचे, काहीही लक्षात ठेवण्यासाठी आपण मोबाइलवर अलार्म लावतो तो आपल्याला आठवण करून देतो त्यामुळे लक्षात ठेवायची क्रिया हल्ली कमी कमी होत चालली आहे. एखादी महत्त्वाची गोष्ट करायची तारीख असो की कुणाचा वाढदिवस याची आठवण मोबाईल करून देतो त्यामुळे लक्षात ठेवायचे आपले श्रम कमी झाले आहेत यातून पुढे विस्मरणाचा प्रसंग आपल्यावर येऊ नये म्हणून वेळेत खबरदारी घ्यायला हवी. वेळेवर मेंदूचे महत्त्व ओळखून मानवाने त्याला प्रगत करणे आवश्यक आहे. सर्व प्रथम मेंदूची काळजी नंतर शारीर सामर्थ्य, नंतर पोट भरण्यासाठी काम करणे, सर्वात शेवटी आपला बँक बॅलन्स वाढवणे अशा क्रमाने जीवनाकडे पाहायला हवं. 

शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर मेंदूची रचना लक्षात घ्यावी लागेल. डावा आणि उजवा असे मेंदूचे दोन भाग असतात. डावा भाग उजव्या बाजूचे नियंत्रण करतो, उजवा डाव्या बाजूचे. मध्ये या दोन्ही भागांना जोडणारा असंख्य पेशींचा जाडसर भाग असतो प्रत्येक घटना नोंदवून ठेवायला दोन्ही भागांना कार्यरत राहावं लागतं. वाढत्या वयानुसार मेंदूवर असलेल्या घड्या किंवा वळ्या यांचे प्रमाण कमी होत जाते, तसेच मेंदूवर असलेले आवरणही पातळ होत  जाते. त्यामुळे मेंदूतील पेशी हळूहळू कमकुवत होत जातात. त्यातून निर्माण होणारी रसायने इतकी दर्जेदार नसतात, त्यामुळे मेंदूमार्फत दिलेल्या संदेशकार्यात बरेच अडथळे येतात. त्याचा परिणाम रोजच्या कामात दिसतो. म्हणजे आता मगाशी घडलेली छोटी घटना आठवत नाही पण पूर्वीची जुनी आठवण कायम असते. अशा विसराळुपणावर मात करण्यासाठी वेळेत उपचार झाले तर पुढचे प्रसंग घडणार नाहीत. 

स्मृति आणि विस्मृती हे दोन्हीही देवाने दिलेले वरदान आहेत. खूप प्रमाणापेक्षा जास्त स्मृति साचल्या गेल्या तरी वेड लागायची पाळी येईल त्याचा निचरा होण्यासाठी विस्मृती ही आवश्यक असते, आपल्या पारमार्थिक जीवनात अनेक कटू प्रसंग येतात, संकटे येतात, जवळची माणसे सोडून जातात, अपघात, अपयश असे वाईट प्रसंग सतत हृदयाशी धरून बसल्याने त्रासच होणार असतो; पण काल हे त्यावरचे औषध आहे असं म्हणतात. या वाईट आठवणी विस्मृतीत गेल्या की त्याची कालांतराने तीव्रता कमी होत जाते. आपण त्याकडे त्रयस्त नजरेने पाहू लागतो. मनाच्या विविध अवस्थतून आपल्याला स्मृति आणि विस्मृती ह्या तारून नेत असतात. 


प्रतिभा कारंजकर 

फोंडा