महिलांनी आर्थिक बाबतीत जागरूक होणे, शिकणे आणि निर्णयक्षम होणे ही काळाची गरज आहे. आर्थिक साक्षरता ही महिलांच्या सशक्तीकरणाचा खरा मार्ग आहे.
आजच्या आधुनिक युगात महिला शिक्षण, करिअर, व्यवसाय आणि समाजकार्य अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमठवत आहेत. पण अजूनही आर्थिक व्यवहार आणि निर्णय प्रक्रियेमध्ये अनेक महिला मागे पडलेल्या दिसतात. महिलांची आर्थिक साक्षरता ही केवळ
वैयक्तिक आत्मनिर्भरतेपुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक बाब आहे.
आर्थिक साक्षरता म्हणजे उत्पन्न, खर्च, बचत, गुंतवणूक, कर्ज आणि विमा यासारख्या आर्थिक बाबतीत योग्य ज्ञान आणि निर्णय घेण्याची क्षमता. महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर असतील, तर त्या स्वतःच्या आर्थिक गरजा ओळखून त्यानुसार योग्य नियोजन करू शकतात. आर्थिक साक्षरता महिलांना आत्मविश्वास देते, आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद देते आणि त्यांना भविष्यातील आर्थिक सुरक्षा पुरवते.
घरगुती बजेट बनवणे, नियमित बचत करणे, मुलांच्या शिक्षणासाठी आणि निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी गुंतवणूक करणे या सर्व बाबतीत महिलांचा सहभाग अत्यावश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला केवळ स्वतःपुरती मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण कुटुंबाची आर्थिक घडी सांभाळते. महिलांनी बँकिंग व्यवहार, डिजिटल पेमेंट, गुंतवणुकीची साधने, विमा पॉलिसी आणि सरकारी योजनांची माहिती घेणे गरजेचे आहे. तसेच, छोट्या व्यवसायांच्या माध्यमातून उद्योजकता वाढवण्यासाठीही आर्थिक ज्ञान आवश्यक असते.
अनेकदा महिलांना सामाजिक रचना, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा संधी अभावी आर्थिक बाबतीत मागे राहावे लागते. मात्र, आजच्या काळात सरकार, स्वयंसेवी संस्था आणि शैक्षणिक संस्था महिलांसाठी विविध आर्थिक साक्षरता कार्यक्रम राबवत आहेत. त्यांचा लाभ घेऊन महिलांनी स्वतःला सक्षम करणे हे अत्यावश्यक आहे.
एक आर्थिकदृष्ट्या साक्षर महिला म्हणजे एका संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ. तिच्या हातात असलेले आर्थिक ज्ञान केवळ तिला नव्हे, तर तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सुरक्षित आणि सक्षम आयुष्य देऊ शकते. म्हणूनच महिलांनी आर्थिक बाबतीत जागरूक होणे, शिकणे आणि निर्णयक्षम होणे ही काळाची गरज आहे. आर्थिक साक्षरता ही महिलांच्या सशक्तीकरणाचा खरा मार्ग आहे.
- तृप्ती दत्तदीप गवस
सहाय्यक प्राध्यापिका