बालपणीच्या पावसाच्या आठवणींनी मन अगदी भरून आले. बाहेर तो बरसत होता आणि माझ्या मनात आठवणींच्या पाऊस सरी...
‘पाऊस आठवणीतला
आजीच्या मायेच्या कुशीतला, अंगणातल्या पागोळ्यातील साठवणीतला
माडांच्या अंगावरच्या जलमोत्यातला
कुशावतीच्या दुथडी भरून वाहणाऱ्या जलाशयातला
पाऊस आठवणीतला
मनाच्या कडेकपारीतील साठवणीतला...’
अचानक तो आला, अगदी ध्यानीमनी नसताना. सगळ्यांना वाटले, हा तर काही दिवसांचाच पाहुणा आहे. एक-दोन दिवसांत निघून जाईल, जसा गडबडीत आला तसाच. पण गंमत म्हणजे तो काही जायचे नावच घेईना. त्याच्या आगमनाने मला खूप आनंद झाला, मी मनोमन सुखावले. आणि आमच्या परसबागेत आंब्याच्या हिरव्याकंच पर्णात बसून कुहू कुहू करणारा तोही सुखावला. मी वरवर तसे दाखवले नाही बरं का! कारण कुणीही त्याच्या स्वागतासाठी तयार नव्हते. बालगोपाल ते थोरामोठ्यांपर्यंत कुणाचीही तयारी नव्हतीच. सगळेच म्हणत सुटले, "तो यावर्षी इतक्या लवकर का म्हणून आला?" मी मनात म्हटले, "का नाही तो लवकर येऊ शकत?" असो, पण गंमत म्हणजे यावर्षी तो वाजतगाजत नाही आला. ढगांचे ढोल-ताशे नाहीत, वीजबाईचे नृत्य नाही, नभमंडळीत झगमगाट, चमचमाट नाही. पण संथ पावलांनी तो आला आणि मुक्या प्राण्यांच्या तनामनात आनंद सुखाच्या पर्जन्यधारा पेरत तो स्थिरावला.
ग्रीष्माच्या वैशाख वणव्याने भाजून निघालेली सृष्टी त्याची डोळ्यांत प्राण आणून वाट पाहत होती, आणि मीसुद्धा त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. खरंच, मनाला सुखावणारे असे त्याचे आगमन झाले. आता तुम्हाला कळलेच असणार, मी कोणाबद्दल बोलतेय; अहो, या वर्षीच्या आमच्या पर्जन्यरायाच्या आगमनाबद्दल... नकळत मन बालपणात शिरले. बालपणीच्या पावसाच्या आठवणींनी मन भरून आले. बाहेर तो बरसत होता आणि माझ्या मनात आठवणींच्या पाऊससरी... बालपणीच्या, तरुणपणीच्यासुद्धा. सुंदर पर्जन्यधारांच्या सानिध्यातील माहेरच्या आठवणींना उजाळा देत देत मन त्यातच रमले. वळिवाच्या सरी, मृगाच्या पाऊससरी मला खूप आवडायच्या. आम्ही त्याला ‘मृगाचा पाऊस’ म्हणतो. वैशाख वणव्याने पोळलेल्या तप्त मातीत मिसळणारे ते टपोरे मोती आणि ते एकरूप होताना पसरणारा तो मनभावन मातीचा ‘मृद्गंध’... आहाहा! बालपणी घरातल्या जाणत्यांचा डोळा चुकवून पहिल्या पावसात भिजायला आणि लांब श्वास घेत तो मृद्गंध मनात भरून घेण्यासाठी अंगणात पळायचो. त्यावर घरच्यांचा ओरडा ठरलेलाच असायचा. कारण काही दिवसांतच शाळा सुरू होणार होत्या. पहिल्या पावसात भिजून सर्दी-पडसे झाले तर शाळा बुडण्याची शक्यता होती. पण गंमत म्हणजे, धुवाधार पावसात शाळा बुडवायला जीवावर यायचे. शाळेत जाताना जर तो धारांनी कोसळला, तर रेनकोट, छत्री घेऊन सांभाळत पायी जायचे आणि, "शाळा सुटल्यावर तो मुसळधार बरसू दे," असा धावा करायचा; कारण छत्री असूनही सवंगड्यांसोबत चिंब भिजण्याची मजा काही औरच होती.
नजर जाईल तिकडे हिरवा पाचूचा रंग; अगदी सुकलेल्या गवतातही हिरवीकंच झाडे कशी बरी उगवतात? अगदी रस्त्याच्या कडेलासुद्धा... शेताच्या कुंपणावर, बांधावर भरभरून दाटीवाटीने हसणारी. कधी कधी दिवस-रात्र उसंत न घेता बरसणारा तो कुशावतीमाईला पूर आणायचा. वाड्यावरून शाळेत जाताना तिच्यावरचा पूल लागला की वाटेवर शेता-बांधात हे पाणीच पाणी भरायचे.
आमच्या गावची कुशावतीमाय, संपूर्ण गावाला रुचकर जल पाजणारी ती. तिचा जलाशय जुलै महिना संपेपर्यंत काठोकाठ भरायचा. कधी कधी दुथडी भरूनही व्हायचा. आमच्या नारळी-पोफळीच्या कुळागरात तिचे पाणी घुसायचे. एरवी तिचे दर्शन घ्यायला पायऱ्या उतरून काठाकाठाने जावे लागायचे. तीही संथ गतीने वाहायची. तिच्या दोन्ही तीरावर आया-बायांची भांडीकुंडी, मुलांची अंघोळ-पांघोळ, मौजमजा चालूच असायची; पण ती मात्र शांतपणे कौतुकाने पाहायची. तिच्या त्या रुचकर, निळ्या, शांत, स्वच्छ पाण्यात मोकळेपणाने शिरताना कधीच भय वाटत नव्हते. पण हळूहळू जसा पाऊसधारांनी ओतायचा, तसे तिच्यातले पाणी ओसंडून वाहायचे, त्यावेळी मात्र मनात भीती दाटायची. खळखळ आवाज करत धावणाऱ्या त्या सरितेचे ते अक्राळविक्राळ रूप पाहिले की उरात धडकी भरायची. तिचे ते पाणी अगदी दुधाच्या चहासारखे वाटायचे आणि तिच्या प्रवाहाबरोबर पळणाऱ्या नारळाच्या पेंढ्या, ओल्या-सुक्या झाडांच्या फांद्या आणि बरेच काहीतरी... घरातील बुजुर्ग सांगायचे, "चुकूनही कुळांगरात जाऊ नका." पण घरच्यांची नजर चुकवून दुरून माडाच्या आडोशाला उभी राहून मी तिला पाहायचे. मी इतकी घाबरले की स्वप्नातही तिचे ते अक्राळविक्राळ रूप दिसायचे. श्रावण महिना प्रारंभ होताना, "पाऊस ओसरू दे," असा देवाला धावा घरातल्या बुजुर्गांसोबत मीसुद्धा करायचे. त्याला कारणे अनेक होती.
श्रावणात सण, उत्सव, व्रतवैकल्ये, पूजा या साऱ्यांचा आनंद लुटायचा तर होताच; पण त्याला अजून एक कारण होते. माझ्या सख्ख्या मैत्रिणीचे एकत्र कुटुंबाचे घर कुशावतीच्या पैलतीराजवळ होते. आषाढात दुथडी भरून वाहणाऱ्या कुशावतीमाईचे पाणी अगदी तिच्या घराजवळ यायचे. अजून पाऊस पडला आणि तिच्या घरात पाणी घुसले तर? या चिंतेने माझा जीव कासावीस व्हायचा. पण तसे कधीच झाले नाही. श्रावण मासाला प्रारंभ होताच पर्जन्याचाही जोर कमी व्हायचा आणि कुशावतीचे पाणी हळूहळू ओसरू लागायचे. अशा अगणित आठवणी त्या पर्जन्यासोबतच्या बालपणीच्या... तरुणपणीच्या, अगदी लग्न होऊन सासरी जाईपर्यंतच्या आणि लग्नानंतरच्याही: माझ्या आषाढ फुलांच्या; भर पावसातही माझ्या आषाढ फुलांच्या निमित्ताने मला सासुरवाशिणीला भेटून माझा कौतुक सोहळा साजरा करणाऱ्या माझ्या शेजार-पाजाऱ्यांच्या; पहिल्या-वहिल्या माहेरपणाला आई-काकीसोबत आयतार पूजनाच्या. अशा अगणित आठवणींचा ठेवा आजही मी मनाच्या तळाशी जपून ठेवलेला आहे.
- शर्मिला प्रभू
आगाळी - फातोर्डा मडगाव 9420596539