मुलांनाही मायग्रेन होतो का??

मुलांमध्ये मायग्रेन ही एक त्रासदायक आरोग्य समस्या नक्कीच आहे. पण लक्षणे लवकर ओळखून, योग्य वैद्यकीय सल्ला घेतल्यास, पालक ही स्थिती आटोक्यात आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.

Story: आरोग्य |
11th July, 10:56 pm
मुलांनाही मायग्रेन  होतो का??

काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम चाळताना डॅनियल फाऊंडेशन नावाची एक पेज समोर आली. अगदी सतराव्या वर्षी मायग्रेनच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या डॅनियल या मुलीच्या पालकांनी शाळेत शिकणाऱ्या मायग्रेनग्रस्त मुलांना शारीरिक व मानसिकरित्या मदत करण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम.

आता आपल्याला प्रश्न पडला असेल की, अरेच्चा लहान मुलांनाही मायग्रेन होतो का?? तर हो.. मायग्रेन फक्त प्रौढांनाच होतो असे नाही. हा त्रास लहान मुलांनादेखील होऊ शकतो. विशेषतः आपल्याला हे का होतंय याचे कारण न समजल्याने मुलांमध्ये ही स्थिती प्रौढांपेक्षा वाईट असू शकते. 

मायग्रेन म्हणजे काय?

मायग्रेन ही फक्त एक गंभीर डोकेदुखीची स्थिती नसून हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे, जो डोकेदुखी सोबत विविध लक्षणे निर्माण करतो. या लक्षणांमध्ये धडधडून डोके दुखणे, मळमळ आणि उलट्या, चक्कर येणे, नजरेसमोर ठिपके दिसणे किंवा चमकणारे दिवे दिसणे यासारख्या दृष्टीच्या समस्या, प्रकाश, आवाज व उग्र वासाची संवेदनशीलता ही लक्षणे दिसतात. मायग्रेन साधारणपणे सौम्य स्वरूपात सुरू होते आणि हळूहळू वाढत जाते. ही स्थिती सहसा ३० मिनिटांपासून ते अनेक तासांपर्यंत राहू शकते, तर काही जणांना अगदी अनेक दिवसांपर्यंत राहू शकते. याव्यतिरिक्त, कधीकधी काही कारण न उमगता मायग्रेनचा अटॅक वारंवार येऊ शकतो. मायग्रेन ही अनुवांशिक असते व सुमारे ६०% ते ७०% लोकांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला मायग्रेन झालेली असते.

मुलांमधील मायग्रेन

मुलांच्या मायग्रेनमध्ये सामान्यतः डोक्याच्या दोन्ही बाजूंना दुखते, तर प्रौढांमध्ये मायग्रेन सामान्यपणे एकतर्फी असते. तसेच मुलांचे मायग्रेनचे झटके प्रौढांच्या मायग्रेनपेक्षा कमी असतात. पण वयामुळे ते जास्त त्रासदायक तसेच शारीरिकरित्या अशक्त करणारे असू शकतात. यामुळे मुलांच्या शाळा, खेळ आणि रोजच्या इतर क्रियांवर परिणाम होऊ शकतो.

मायग्रेनचा त्रास अगदी लहान मुलांसोबत सर्व वयोगटातील मुलांना होऊ शकतो. सरासरी नुसार ७ वर्षांपेक्षा कमी वयाच्या २.५% मुलांना मायग्रेनचा त्रास होतो. १० वर्षांच्या वयापर्यंत, सुमारे ५% मुलांना मायग्रेनचा त्रास होतो. एकूण ५ ते १५ वयोगटातील सुमारे १०% मुलांना आणि २८% किशोरवयीन मुलांना मायग्रेनचा त्रास होतो. प्रौढांमध्ये मायग्रेन ९:१ या प्रमाणात महिलांमध्ये पुरूषांपेक्षा बऱ्याच जास्त प्रमाणात असते. पण मुलांमध्ये पौगंडावस्थेपूर्वी, मायग्रेन मुलां-मुलींमध्ये जवळजवळ सारख्याच प्रमाणात असते. तर पौगंडावस्थेपासून मायग्रेन मुलींमध्ये अधिक परिणाम करते. १७ वर्षांच्या वयापर्यंत ८% मुले व २३% मुलींना मायग्रेनचा त्रास होताना आढळतो.   

मुलांच्या मायग्रेनचे टप्पे कोणते आहेत?

  प्रोड्रोम: हा टप्पा डोकेदुखी सुरू होण्याआधी काही तास किंवा दिवसांपूर्वी येते. यात व्यक्तीला थकवा, चिडचिड, एकाग्रता कमी होणे, प्रकाश आणि आवाजाची संवेदनशीलता, तसेच काहीवेळा मळमळ आणि भूक न लागणे यासारखी लक्षणे दिसतात. प्रोड्रोम टप्पा मायग्रेन असलेल्या ६७% मुलांमध्ये दिसून येतो.

   ऑरा: हा टप्पा काही लोकांना डोकेदुखी सुरू होण्याआधी येतो, तर काहींना येत नाही. यात दृष्टीदोष (ठिपके किंवा चमकणाऱ्या रेषा दिसणे), बोलण्यात अडचण किंवा शरीराच्या एका भागात सुन्नपणा येणे यासारख्या लक्षणांचा समावेश असतो.

 डोकेदुखी: या मुख्य अवस्थेत डोक्याच्या एका बाजूला किंवा दोन्ही बाजूंना तीव्र, धडधडणारी डोकेदुखी होते. मळमळ, उलट्या, प्रकाश आणि आवाजाची संवेदनशीलता यासारखी लक्षणे असू शकतात.

  पोस्टड्रोम: हा टप्पा डोकेदुखी थांबल्यानंतर येतो. यात व्यक्तीला थकवा, अशक्तपणा, मानसिक गोंधळ किंवा मूड बदलणे यासारख्या लक्षणांचा अनुभव येऊ शकतो.

प्रत्येक व्यक्तीसाठी मायग्रेनला सुरू करणारे किंवा वाढवणारे ट्रिगर वेगवेगळे असतात. ताण, विशिष्ट आहार, झोपेचा अभाव, मासिक पाळी, हार्मोनल बदल, सामान्य खाण्याच्या पद्धतींमध्ये बदल, कॅफिन, हवामानातील बदल, प्रवास, नियमित दिनचर्येत बदल यासारखे ट्रिगर मायग्रेनला कारणीभूत ठरतात.

मुलांमध्ये मायग्रेन टाळता येईल का?

निरोगी जीवनशैली राखणे हा मायग्रेन टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तसेच दररोज रात्री पुरेशी झोप घेणे, जेवण न घेण्याचे टाळणे, नियमित व्यायाम करणे, भरपूर पाणी पिणे, ताणतणाव टाळणे, डोकेदुखीची डायरी ठेवणे, ज्ञात ट्रिगर्स टाळणे आवश्यक आहे. 

मुलाला मायग्रेन चालू असताना, मदत करण्यासाठी पालक खालील पावले उचलू शकतात.

  मुलाला कमी प्रकाशाच्या, शांत खोलीत कपाळावर थंड कपडा घालून आराम करण्यास प्रोत्साहित करा. 

  - मुलाला अशा वेळी दगदग न होऊ देता झोपायला किंवा आराम करायला सांगा.

  - डॉक्टरांनी दिलेली ओटीसी किंवा प्रिस्क्रिप्शन औषधे ऑरा चालू असतानाच मुलाला द्यायचा प्रयत्न करा.

- मुलाला भविष्यात मायग्रेनचे झटके टाळण्यासाठी,

  - शक्य असल्यास मायग्रेनच्या हल्ल्यांची कोणतीही ज्ञात कारणे टाळा.

 - नियमित झोप, क्रियाकलाप आणि शाळेचा दिनक्रम निश्चित करा.

 - मुलाला मानसिक आरोग्याच्या समस्या असल्यास मानसशास्त्रज्ञांना दाखवा, कारण चिंता आणि नैराश्यासारख्या परिस्थिती डोकेदुखी वाढवू शकतात.

 - व्हिडिओ गेम आणि उपकरणांवर वेळ मर्यादित करा.

  - त्यांना कधी विश्रांतीची आवश्यकता आहे आणि ते सामान्य दैनंदिन कामे कधी करू शकतात याकडे लक्ष द्या.

  - शाळेत असताना त्यांच्या शिक्षकांना मदतीची आवश्यकता असल्यास त्यांच्याशी बोला.

 - नियमित डोळ्यांच्या चाचण्या करा कारण दृष्टीच्या समस्यांमुळे डोकेदुखी होऊ शकते.

मुलांमध्ये मायग्रेन ही एक त्रासदायक आरोग्य समस्या नक्कीच आहे. पण लक्षणे लवकर ओळखून, योग्य वैद्यकीय सल्ला घेतल्यास, पालक ही स्थिती आटोक्यात आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. औषधोपचार आणि जीवनशैलीतील बदल यांचे योग्य संयोजन केल्यास मायग्रेन अटॅकची वारंवारता आणि तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते.


- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर