ती खोली

रोहन उठला आणि कसला आवाज येतोय हे पाहण्यासाठी त्याने लाइट ऑन केली, तर त्याला मानव गॅसच्या ओट्यावर दात चावत बसलेला दिसला. त्याचा हात डोक्यावर होता. “अरे वेड्या खाली ये!” रोहन ओरडला.

Story: साद अदृष्याची |
11th July, 10:25 pm
ती खोली

रोहन, हरीश, नितेश व मानव हे गोव्यातील पर्वरी येथे आयएमएममध्ये शिकणारे चार वर्गमित्र होते. गावखेड्यातून येणारे चौघेही मध्यमवर्गीय कुटुंबातले. हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करून परदेशात नोकरीला जाऊन उंच पक्ष्यांप्रमाणे झेप घेण्याचे स्वप्न चौघांच्याही डोळ्यात होते. कोर्स संपल्यावर सहा महिन्यांची ट्रेनिंग होती. चौघांनीही कळंगुट येथे ‘विस्तारा’ हॉटेलमध्ये मुलाखत दिल्यावर ट्रेनिंगसाठी त्यांना बोलावले होते.

ट्रेनिंगसाठी रोज ३०-४० किलोमीटर येणे शक्य नव्हते. त्यात रात्रीची शिफ्ट पण होती. त्यांनी हॉटेलच्या जवळच भाड्याने खोली घेण्याचे ठरवले. खूप शोधाशोध करून एक सहा हजार महिन्याचे भाडे असलेली एक खोली त्यांना सापडली. घरातून येताना प्रत्येकाने आपापले सामान आणले व नव्या पर्वाची सुरुवात झाली.

आज त्यांच्या ट्रेनिंगचा पहिलाच दिवस होता. दिवस चांगला गेला होता, त्यांनी आज जेवण बाहेर करायचे म्हणून बाहेरच जेवणाचा बेत केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ड्यूटी असल्याने त्यांनी लवकरच झोपायचे ठरवले. हरीश व नितेश पलंगावर पडताच झोपले. रोहन फोनवर गेम खेळू लागला. मानवला मात्र घरी फोन करायचा होता. मानव आपल्या आईबरोबर खडकी-वाळपई येथे राहत होता. मानव पाचवीत असताना त्याचे वडील गेले. आईनेच त्याला लहानाचे मोठे केले होते. मानवला त्यांच्या खोलीत नेटवर्क नव्हते म्हणून “हॅलो हॅलो” करतच तो बाहेर गेला व गच्चीत उभा राहून बोलू लागला. रोहनला झोप येऊ लागली. त्याने मानवला “ये रे झोप” म्हणत लाइट बंद केली व बाजूला पडला. मानव आला आणि दुसऱ्या बाजूला पडला.

बारा-एक वाजले असतील, मानव रोहनला म्हणाला, “माझ्या पायाला काहीतरी मऊ मऊ लागतेय रे.” रोहन म्हणाला, “गप्प झोप रे! आधीच नवीन जागेमुळे झोप येत नाहीये.” या सर्व मित्रांमध्ये रोहन हा सगळ्यात स्मार्ट होता, तर मानव अगदी साधाभोळा. हरीश व नितेश सुस्वभावी होते. आपल्या घरच्यांसाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्यांच्यात होती.

लाइट बंद केल्यामुळे खोलीत काळोख होता. एवढ्यात ढम्म असा मोठ्याने आवाज आला. रोहनला नुकताच कुठे डोळा लागला होता. पुन्हा असाच ढम्म आवाज त्याला आला. नितेश व हरीश गाढ झोपले होते. रोहन उठला आणि कसला आवाज येतोय हे पाहण्यासाठी त्याने लाइट ऑन केली, तर त्याला मानव गॅसच्या ओट्यावर दात चावत बसलेला दिसला. त्याचा हात डोक्यावर होता. “अरे वेड्या खाली ये!” रोहन ओरडला. पण मानव विचित्र ओरडू लागला. आवाजाने हरीश व नितेशही जागे झाले. आता मानव ओट्यावरून खाली आला आणि जमिनीवर लोळू लागला. कॉटवर चढला आणि नाचू लागला, स्वतःलाच ओरबाडू लागला.

त्याच्या मित्रांना हे सर्व काय चालले आहे हे कळेना. हे सर्व त्यांच्यासाठी विचित्र होते. त्यांनी मानवला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो काही त्यांना आवरेना. हरीशने घरमालकाची मदत घ्यावी म्हणून त्यांना फोन लावला पण तेही फोन उचलेना. मानवचे नाचणे वेड्यागत चालूच होते. तो त्यात स्वतःलाच जखमी करत होता. डोक्याला जखम होऊन रक्त वाहत होते. तिघांनीही मानवला घट्ट पकडले आणि मोठ्याने त्याला हाका मारत खोलीच्या बाहेर आणले. खोलीच्या बाहेर येताच मानव थोडा शांत झाला. त्याला आता चक्कर येऊ लागली. नितेशने आपल्याकडचे छोटे गणपतीचे लॉकेट मानवच्या हातात दिले पण तो ते झटकू लागला. हरीशने मानवच्या तोंडावर पाणी मारले आणि त्याला पाणी प्यायला दिले.

रोहनला आता हा सर्व प्रकार कळला होता. त्याने सर्वांना खोलीच्या बाहेर काढले आणि सर्वांना त्याने नामजप करायला सांगितले. ती रात्र त्यांनी खोलीच्या बाहेरच काढली. पहाटे हरीश व नितेशने खोलीतले सर्व सामान भरले. रोहन मानवसोबत होता. मानवला रात्री काय घडले ते काहीच आठवत नव्हते. सामान बाहेर काढून ते घरमालकाच्या व्हरांड्यात येऊन बसले. त्यांनी घरमालकाला घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी अॅडव्हान्स म्हणून दिलेले सगळे पैसे घरमालकांनी काहीच न बोलता परत केले.

रोहनने हॉटेलमध्ये फोन करून सर्व प्रकार सांगितला. त्यांना त्या दिवशी कामावर रजा मिळाली. रोहनने दुसरी खोली शोधली. आजूबाजूला चौकशी करताच त्यांना कळले की काही दिवसांपूर्वीच त्या खोलीत एका पर्यटकाने आत्महत्या केली होती. त्या खोलीतून रात्री विचित्र आवाज येत असत, पण पैशांच्या आशेने त्या घरमालकाने या मुलांना ती खोली भाड्याने दिली होती. पण ती रात्र, ती खोली आणि मानवला पछाडलेला अनुभव खूपच भयानक होती. दुसऱ्या दिवशी त्यांनी घर सोडले व झालेला प्रकार त्यांच्या आईला सांगितला. त्यांच्या आईने देव-डॉक्टर केले आणि चार दिवसांनी मानव पूर्वीप्रमाणे 

झाला. त्यांची दोस्ती मात्र पक्की झाली होती. त्यांनी त्या भुताच्या खोलीत एकमेकांना सांभाळले होते. पण ती खोली, ती रात्र मात्र कधीच न विसरण्यासारखी होती.



- श्रुती नाईक परब