आशा: मेंदूची एक चलाख गुंतवणूक?

आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली 'आशा' ही केवळ एक भावना आहे की मानसिक आधार देणारी एक चलाख यंत्रणा? ती आपल्याला संकटातून वाचवते की निष्क्रियतेच्या भ्रमात अडकवते? आशा आणि कृतिशीलता यांचा संबंध उलगडून दाखवणारा हा लेख.

Story: मनी मानसी |
11th July, 11:15 pm
आशा: मेंदूची एक चलाख गुंतवणूक?

“बघू या, काहीतरी मार्ग निघेलच!” हा शब्दप्रयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनात किती सहजतेने वापरतो, नाही का? कधी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही, अडचणी येतात, संकटं गाठतात, तेव्हा असेच काही शब्द ओठांवर येतात आणि विशेष म्हणजे, आपल्या कळत-नकळत अशा साध्याभोळ्या वाटणाऱ्या शब्दांत एक खोलवर आशेचा भाव दडलेला असतो. ती भावना आपल्याला सांगते की परिस्थिती कितीही कठीण असली, तरी काहीतरी मार्ग नक्कीच सापडेल.

असं म्हणतात की एखादं मूल आईच्या उदरात असतानाच, जगात येण्यापूर्वीच त्याला पहिल्यांदा ‘hope’ म्हणजेच आशेचा धागा मिळतो. आईच्या हृदयाच्या ठोक्यांसोबत ते जीवनाचे पहिले संकेत घेतं आणि त्यातूनच त्याच्या चेतना तयार होतात. यातूनच कळतं की आशा ही फक्त एक भावनिक प्रतिक्रिया नसून, ती मानवी अस्तित्वाची पहिली पालवी आहे, जिच्यावर संपूर्ण मानसिक विकास उभारला जातो. त्यामुळेच, माणूस जन्मतःच आशेच्या बळावर जगायला शिकतो, संकटातून सावरण्याचं धाडस शिकतो.

म्हणूनच, अनेकदा आपण म्हणतो  “आशेवरच तर जग चाललंय!” कारण संकट, अपयश, अडथळे हे आयुष्याचा भाग आहेत, पण त्यातून पुढे जाण्याची ऊर्जा देणारी शक्ती म्हणजेच आशा. जिथे प्रयत्न अपुरे पडतात, तिथे “काहीतरी होईल” हा विचारच पुढे चालण्याची ताकद देतो. अशा अर्थाने पाहिलं तर आशा ही केवळ भावना नसून ती आपली मानसिक, शारीरिक व सामाजिक उभारणी करणारी अदृश्य प्रेरणा ठरते.

पण... थोडा वेळ थांबूया आणि गांभीर्याने विचार करूया – हीच आशा खरोखरच प्रत्येक वेळी आपल्या मनाला सावरणारी ठरते का? की कधी तीच आपल्याला भ्रमात अडकवते? उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती सतत म्हणते, “माझं सगळं ठीक होईल एक दिवस!”, पण त्या “एक दिवसासाठी” काहीच करत नाही. दिवस, महिने, कधी वर्षंही सरतात, पण तो व्यक्ती अजूनही त्या बदलाची वाट बघतो, निष्क्रिय राहतो. अशा वेळी आशा उपयोगी न ठरता उलट त्याला कृतीपासून रोखून ठेवते.

अशा परिस्थितीत आशा जणू एक आरामदायक भ्रम बनते – असं वाटतं की फक्त आशा बाळगली की सगळं आपोआप बदलणार आहे. हे मानसिक समाधान तात्पुरतं असतं, पण दीर्घकाळात ते व्यक्तीला जबाबदारीपासून दूर नेतं, स्वतः प्रयत्न करण्याची प्रेरणा कुंठित करतं. परिणामी, हीच आशा आत्मफसवणुकीत बदलते आणि हळूहळू निराशेचं बीज पेरते.

म्हणूनच आशेचं खरं स्वरूप समजून घेणं आवश्यक आहे. ती आपल्याला संकटात सावरणारी, प्रेरणा देणारी ठरू शकते, परंतु कृतीची जोड न दिल्यास तीच आशा आपल्याला निष्क्रियतेच्या दलदलीत अडकवू शकते. एखाद्या विद्यार्थ्याचं उदाहरण घ्या – परीक्षेच्या आधी “मी पास होणारच!” म्हणत राहणं आशावादी विचार वाटू शकतो. पण जर त्यानं अभ्यास केला नाही, मेहनत घेतली नाही, तर ही आशा फक्त गोड स्वप्न उरते.

यामुळे प्रश्न उभा राहतो – आपली आशा आपल्याला पुढे नेते की मागे ओढते? तिचा उपयोग आपण सकारात्मक कृतीकडे नेण्यासाठी करतो का, की फक्त परिस्थितीवर सोपवून निष्क्रिय राहतो? कारण आशेचा खराखुरा फायदा तोच, जो तिच्या बळावर प्रयत्न करतो, संकटात कृती करत राहतो. अशानेच “मी यातून बाहेर पडेन!” या विचाराला खरा अर्थ मिळतो.

म्हणूनच, आशा ही आपल्या भावनिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे, पण तिचं खरं सौंदर्य तेव्हाच दिसतं, जेव्हा तिला कृतीची साथ दिली जाते. फक्त विचार करून नव्हे, तर त्या विचारावर पावलं उचलूनच आशेचा खरा उपयोग साधता येतो.


- मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक

डिचोली - गोवा, ७८२१९३४८९४