बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार ‘देवरा : भाग १’
ज्युनियर एनटीआरचा ‘देवरा : भाग १’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, चित्रपट अखेर आज २७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे.असे म्हटले जात आहे की ज्युनियर एनटीआरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून अनेक रेकॉर्ड बनवेल. अॅडव्हान्स बुकिंगवर नजर टाकल्यास ‘देवरा : भाग १’ रिलीजच्या पहिल्याच दिवशी जगभरात १०० कोटींचा टप्पा पार करेल. हा चित्रपट एकट्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून ६५-७० कोटी रुपये, तर कर्नाटकातून १० कोटी रुपये कमावणार आहे. हा चित्रपट तामिळनाडू, केरळ आणि उत्तर भारतातून ११-१२ कोटी रुपये कमवू शकतो. ‘देवरा’ व्यतिरिक्त अनेक मालिका आणि चित्रपट आज ओटेटी व चित्रपटगृहात झळकणार आहेत.
देवरा भाग १ (थिएटर्स)
ज्युनियर एनटीआर, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला, ॲक्शन थ्रिलर चित्रपट एका धाडसी व्यक्तीची कथा सांगतो. जो आपल्या लोकांना अज्ञात धोक्यांपासून वाचवण्याच्या मोहिमेवर निघतो आणि त्याचा भाऊ त्याच्याविरुद्ध कट रचतो. कोरटाला सिवा लिखित आणि दिग्दर्शित, हा चित्रपट तेलगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रदर्शित होणार आहे.
ग्योंगसेओंग क्रिएचर सीजन २ (नेटफ्लिक्स)
पहिल्या सीझनच्या यशानंतर, कोरियन मालिका ग्योंगसेंग क्रिएचरचा आगामी भाग आजच्या आधुनिक जगात घडणाऱ्या असाधारण घटनांवर आधारीत आहे. जँग ताई-सांग आणि यून चाय-ओके यांचे जीवन एका प्रसंगानंतर बदलून जाते. त्यानंतर घडणाऱ्या घटना तुम्हाला शेवटपर्यंत स्क्रीनवर चिकटवून ठेवतील.
लव्ह, सितारा (झी ५)
हा रोमँटिक चित्रपट एका यशस्वी इंटिरियर डिझायनरच्या जीवनावर आधारीत आहे. शोभिता धुलिपाला आणि राजीव सिद्धार्थ अभिनीत हा चित्रपट आधुनिक प्रेमाच्या गुंतागुंतीवर प्रकाश टाकतो.
ताझा खबर सीझन २ (डिस्ने+ हॉटस्टार)
नवीन ओटीटी रिलीजच्या यादीमध्ये, एक रोमांचक मालिका आहे. जी तुम्हाला तुमच्या आसनावर बांधून ठेवेल. ताझा खबरचा दुसरा सीझन वसंत गावडे उर्फ वास्यावर केंद्रित आहे, जो आपली ध्येये साध्य करण्यासाठी आपली शक्ती वापरतो. तथापि, जेव्हा युसूफ अख्तर नावाचा एक नवीन खलनायक कथेत प्रवेश करतो आणि परिस्थिती गुंतागुंतीची बनते. या मालिकेत भुवन बाम, जावेद जाफरी, श्रिया पिळगावकर आणि महेश मांजरेकर हे तगडे कलाकार आहेत.
बिन्नी अँड फॅमेली (थिएटर)
बिन्नी अँड फॅमिली हा लंडनमध्ये राहणाऱ्या एका बंडखोर किशोरवयीन मुलीवर आधारित चित्रपट आहे. जिचे दैनंदिन जीवन तिचे आजी-आजोबा भारतातून आल्यावर विस्कळीत होते. ती तिच्या पुराणमतवादी आजोबांशी असलेले मतभेद दूर करू शकेल का, हे आपल्या चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल. या चित्रपटात पंकज कपूर, हिमानी शिवपुरी, राजेश कुमार आणि अंजिनी धवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
वुई वेअर किंग्स (नेटफ्लिक्स)
नवीन ओटीटी रिलिजमध्ये प्रेमाच्या त्रिकोणामध्ये अडकलेल्या तिघांच्या जीवनावर आधारीत मालिका वुई वेअर किंग्सचा समावेश आहे. लेटिसिया लोपेझ मार्गाली यांनी निर्मित केलेली मालिका मेक्सिको सिटीमध्ये बनवी आहे. यात जोशुआ ओकामोटो, इंग्रिड अगुइला आणि एलियास टोस्कॅनो यांच्या भूमिका आहेत.
आयला अँड द मिरर्स (डिस्ने+ हॉटस्टार)
आयला आणि द मिरर्स एका तरुण, श्रीमंत आणि बिघडलेल्या मुलीचीवर आधारीत मालिका आहे. तिच्या पालकांच्या अपघाती मृत्यूनंतर स्मरणशक्ती कमी होते. तथापि, तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण लागते जेव्हा ती एका ठिकाणी पोहोचते जिथे ती इनेस आणि इतर तरुणांना भेटते जे नृत्य गट, द मिरर्स बनवतात.
हनिमून फोटोग्राफर (जिओसिनेमा)
शुक्रवारी ओटीटीवर झळकणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये हनीमून फोटोग्राफर नावाचा एक रहस्यमय क्राइम थ्रिलर चित्रपट देखील आहे. हा चित्रपट एका महिला व्यावसायिक छायाचित्रकाराच्या भोवती फिरतो, जी असाइनमेंटसाठी मालदीवला जाते, परंतु वराचा मृत्यू झाल्यावर ती संकटात सापडते. ती आपले निर्दोषत्व सिद्ध करू शकेल का, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल. या चित्रपटात आशा नेगी, राजीव सिद्धार्थ, अपेक्षा पोरवाल आणि साहिल सलाथिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत.