माडेल येथील जखमी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

इमारतीवरुन पडून झाला होता जखमी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
माडेल येथील जखमी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

मडगाव : माडेल येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या भिंतींना प्लास्टर करण्याचे काम करत असताना रमेश केरीमट्टीहल्ली हा कामगार उंचावरुन पडला. जखमी रमेशवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. फातोर्डा पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यू म्हणून प्रकरण नोंद करण्यात आले आहे.

माडेल फातोर्डा येथील एका इमारतीचे बांधकाम सुरू असून त्याठिकाणी रमेश केरीमट्टीहल्ली (मूळ रा. हावेरी, कर्नाटक) हा भिंतींना प्लास्टर करण्याचे काम करत होता. उंचावरील भिंतीला प्लास्टर करत असताना गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता रमेश याचा तोल गेला व तो खाली पडला. यात रमेश याला गंभीर दुखापत झाली. त्याला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार करुन पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता त्याचा मृत्यू झाला. फातोर्डा पोलिसांकडून याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. 

हेही वाचा