आईची जय

मृणाल कुलकर्णी आणि विराजस कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेल्या ह्या नऊ मिनिटांच्या लघुपटाचा विषय खरेतर वेगळा आहे. मुलगा स्वतंत्र होताना आईच्या संमिश्र भावना आणि मुलाची त्यावरची प्रतिक्रिया हा ह्या लघुपटाचा विषय आहे.

Story: आवडलेलं |
21st September, 05:47 am
आईची जय

भावनिक लोक दुबळे असतात. आपल्या भावनांवर आपला ताबा असायलाच हवा.” परवा एके ठिकाणी एका चर्चेत भावनिक होण्यावर चर्चा चालली होती, त्यावेळी एकजण आपले मत हिरीरीने मांडत होते. भावनिक होणे म्हणजे हळवे होणे, रागावणे, रडणे किंवा चिडणे असा अर्थ मी त्यातून घेतला आणि लक्षात आले की खरेच, आपल्याला लहानपणापासून हेच शिकवले जाते! अकारण रडणे, उदास होणे वगैरे तर आपल्या ‘भरल्या’ घरांमध्ये निषिद्धच. 

बाईचा सगळ्यांसमोर तिच्या रागावर ताबा हवा, तर पुरुषाचा त्याच्या हळवेपणावर. अगदी लहान मुलांनासुद्धा, ‘मुलींसारखा उगाच काय रडतोस?’ असे आपण सहज बोलून जातो. अर्थात, आपण हे मुद्दामहून करत नाही. वर्षानुवर्षे चाललेल्या आपल्या भावनिक प्रवासाचा हा परिणाम आहे. आपल्या नकळत घडणाऱ्या ह्या गोष्टींचा मुलामुलींच्या भावनिक वाढीसाठी घातक असू शकतो असा विचार लगेच मनात आला. 

याबद्दल अधिक विचार करायला लावला ते ‘आईची जय’ ह्या लघुपटाने. मृणाल कुलकर्णी आणि विराजस कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेल्या ह्या नऊ मिनिटांच्या लघुपटाचा विषय खरेतर वेगळा आहे. मुलगा स्वतंत्र होताना आईच्या संमिश्र भावना आणि मुलाची त्यावरची प्रतिक्रिया हा ह्या लघुपटाचा विषय आहे. पण, हा लघुपट एकदा बघूनसुद्धा हातातून काहीतरी निसटत आहे असे सारखे वाटत राहिले. दुसऱ्यांदा बघितल्यावर सुटलेली गोष्ट नेमकी हातात धरता आली.

मुलगा आता स्वतंत्र राहायला जाणार, दुसऱ्या शहरात स्थलांतरित होणार ह्यामुळे आई हळवी झाली आहे. भूतकाळातील काही घटना आठवून तिला अपराधीदेखील वाटत आहे. मुलगाही कदाचित वेगवेगळ्या भावनांना सामोरा जात असेल, मात्र त्याने ह्या भावनांवर मात करण्यासाठी एक आधार घेतला आहे - रागाचा. मनात विचार आला, की आपणही किती वेळा असा रागाचा आधार घेऊन हळव्या प्रसंगातून बाहेर पडायचा प्रयत्न केला आहे? मनावर फारसा ताण न देताही असे कित्येक प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. 

एका भावनेला, विशेषतः हळव्या प्रसंगातून येणाऱ्या भावनांना, झाकण्यासाठी चिडचिडीचे अस्त्र अगदी उपयुक्त असते का? आपण दुबळे नाही हे दाखवण्यासाठीची ही धडपड बऱ्याचदा आपल्याला जास्त दुबळे करत असेल का? भावनांना तोंड देणे ही अतिशय अवघड गोष्ट साधणे शक्य झाले तर? परिस्थितीनुसार येणाऱ्या भावनांना ओळखून त्याप्रमाणे रागावणे, रुसणे, रडणे, हुरहुरणे, अस्वस्थ होणे किंवा चिडणेही इतर कशाचा आधार न घेता आधी आपण स्वतः स्वीकारले तर? काही वेळापुरते ह्या भावनांच्या आहारी जाण्याची मोकळीक आपण स्वतःला दिली तर? 

ह्यावर भावना बाहेर पडणे महत्त्वाचे, मार्ग कोणताही असो असा युक्तिवाद कदाचित होऊ शकतो. पण भावना योग्य वाटे बाहेर पडल्यावर येणारा मोकळेपणा पाऊस पडून गेल्यानंतरच्या स्वच्छ उन्हासारखा समाधान देणारा असू शकतो हा विचार ह्या लघुपटाच्या निमित्ताने केला. एखादी कलाकृती प्रत्येक माणसासाठी सारखी असेलच असे नाही. अलीकडेच ऐकलेल्या चर्चेचा परिणाम माझ्या विचारांच्या दिशेवर झालाच. त्यामुळे ह्या लघुपटातील इतर अनेक कंगोरे मी टिपलेच नसल्याचीही शक्यता आहे. तसेच भावना हाताळण्याची प्रत्येकाची पद्धत कदाचित वेगळी असेलही... शेवटी कसेही असे ना, एक भावना झाकण्यासाठी दुसऱ्या भावनेचा आधार न घेता आपापले आभाळ निरभ्र ठेवणे महत्त्वाचे!

मुग्धा मणेरीकर, फोंडा