‘रेन्ट अ कॅब’ ने ठोकरल्याने दुचाकीस्वार दाम्पत्य जखमी

वेर्ला येथे घडला अपघात : मुलगी सुदैवाने बचावली

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
8 hours ago
‘रेन्ट अ कॅब’ ने ठोकरल्याने दुचाकीस्वार दाम्पत्य जखमी

म्हापसा : वेर्ला येथे २ वर्षांच्या मुलीला डोस देऊन घरी परतणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला ‘रेन्ट अ कॅब’च्या जीपने विरोधी दिशेने जाऊन ठोकर दिली. या अपघातात ब्रिटोवाडा येथील हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. तर, या अपघातातून ती लहान मुलगी कोणतीही दुखापत न होता सुदैवाने बचावली.

हा अपघात शुक्रवारी सकाळी ९.३० च्या सुमारास वेर्ला-काणका पंचायत घराजवळ घडला. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी जीपचालक मनीष दर्ग (उत्तरप्रदेश) या पर्यटकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. तर जखमींमध्ये भावेश राजन सावंत व गीता भावेश सावंत यांचा समावेश आहे.

जखमी पती पत्नी आपल्या लहान मुलीला वेर्ला-काणका पंचायत घराजवळील उपआरोग्य केंद्रात डोस देण्यासाठी आले होते. डोस देऊन ते ब्रिटोवाडा- पर्रा येथे आपल्या घरी जीए ०३ एजे ७७८६ क्रमांकाच्या स्कुटरवरून जाण्यास निघाले. तेव्हाच काणका ते हणजूणच्या दिशेने जाणाऱ्या जीए ०३ एएच ५०८५ क्रमांकाच्या रेन्ट अ कॅब जीप गाडीने या दुचाकीला विरूध्द दिशेने येऊन ठोकर दिली.

या अपघातात सावंत दाम्पत्य गंभीर जखमी झाले. मात्र त्यांच्या दोन वर्षी़य मुलीला कोणतेही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ता पर्यंत जखमींना रूग्णवाहिकेतून म्हापसा इस्पितळात दाखल केले होते. तिथून त्यांना गोमेकॉत हलविण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताचा पंचनामा पोलीस हवालदार नंदू कुडासकर यांनी केली.

दरम्यान संशयित आरोपी मनीष दर्ग हे आपल्या पत्नीसह गोव्यात पर्यटनासाठी आले होते व हणजूण मधील एका व्हिलामध्ये ते उतरले होते. पणजीहून व्हिलाच्या दिशेने जाताना वाटेत हा अपघात घडला. पोलिसांनी संशयिताची मद्यप्राशन चाचणी केली असून सदर अहवाल आल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. 

हेही वाचा