संशयित बिदेश हसुटीकरची सशर्त जामिनावर सुटका

पर्वरीतील रेहबर खान खून प्रकरण

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
20th September, 09:42 am
संशयित बिदेश हसुटीकरची सशर्त जामिनावर सुटका

म्हापसा : सावळे, पिळर्ण येथे ऑडिट भवनजवळ रेहबर खुर्शिद अली खान (२२, मूळ उत्तर प्रदेश) याच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी बिदेश रादेश हसुटीकर (२४, रा. डांगी कॉलनी, म्हापसा) याची पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केली.

यापूर्वी या प्रकरणातील संशयित आरोपी संदेश श्याम नाईक (रा. फट्टावाडो नेरुल व मूळ गवळीवाडा, काकोडा) तसेच नीलेश आत्माराम तुपकर (सर्वेवाडा, गिरी) यांना जामीन मिळाला होता.

न्यायाधीश बॉस्को जी. एफ. रॉबर्ट्स यांनी संशयित बिदेश याचा जामीन अर्ज २५ हजारांची हमी रक्कम व तितक्याच रकमेच्या हमीदाराच्या हमीवर मंजूर केला. न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर न जाणे, प्रत्येक सुनावणीवेळी हजेरी लावणे, साक्षीपुराव्यात हस्तक्षेप न करणे, साक्षीदारांना धमकावण्याचा प्रयत्न न करणे, मोबाईल क्रमांक आणि वास्तव्याचा पत्ता न्यायालय आणि पोलीस स्थानकात सादर करणे, जामिनावर असताना कोणताही गुन्हा न करणे अशा अटी न्यायालयाने लागू केल्या आहेत.

न्यायालयात संशयिताच्या वतीने अॅड. विनायक पोरोब व अॅड. हर्षा कारेकर यांनी युक्तिवाद केला, तर सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता कोलेमॉन रॉड्रिग्ज यांनी युक्तिवाद केला.

दरम्यान, हा खुनाचा प्रकार १६ एप्रिल २०२४ रोजी उत्तररात्री घडला होता. सावळे पिळर्ण, पर्वरी येथील ऑडिट भवनजवळ रेहबरचा मृतदेह पोलिसांना गस्तीवेळी आढळला होता. त्याचा मृत्यू मान मोडल्याने तसेच पाठीच्या कण्याला जबर इजा होऊन आणि रक्तस्रावामुळे झाल्याचे शवचिकित्सा अहवालातून निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी संशयित विकास यादव (रा. कांदोळी), खतेश तुकाराम कांदोळकर, सुमन हेमंत बरिक, सचिन चंद्रिका सहानी, तनय सुब्राय कांदोळकर, सचिन नागेंद्र सिंग (सर्व रा. कांदोळी), आनंद सहदेव चिकलगेकर (मयडे व मूळ वाळपई), संतोष उमेश गावस (म्हापसा), संदेश नाईक (नेरुल, मूळ काकोडा), नीलेश आत्माराम तुपकर (गिरी) व बिदेश हसुटीकर (डांगी कॉलनी, म्हापसा) या ११ जणांना अटक केली होती. 


हेही वाचा