एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय?

भारतातील बर्‍याच महिलांमध्ये एंडोमेट्रिओसिस ही आरोग्य समस्या आढळते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, सध्या आपल्या देशातील सुमारे कोटी ४.२ महिला एंडोमेट्रिओसिसने ग्रस्त आहेत.

Story: आरोग्य |
3 hours ago
एंडोमेट्रिओसिस  म्हणजे काय?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार, जगभरातील १०% म्हणजेच प्रजनन वयाच्या सुमारे १९ कोटी महिलांना याचा सामना करावा लागतो आणि ३० ते ४५ वर्षे वयोगटातील महिलांमध्ये सर्वाधिक आढळते. तर एंडोमेट्रिओसिस म्हणजे नेमके काय... हे आज आपण समजून घेऊ.

एंडोमेट्रियम म्हणजे मासिक पाळीच्या काळात शरीराबाहेर टाकले जाणारे गर्भाशयाचं अस्तर. प्रत्येक महिलेचे दर महिन्याला गर्भशयातील अस्तर वाढते. स्त्रीबीज फलित झाल्यास ते गर्भाशयाच्या अस्तराला चिकटून तिथे गर्भधारणा होऊ शकते. तसेच जर गर्भधारणा नाही झाली तर त्या महिलेला मासिक पाळी येते आणि ते अस्तर शरीरातून रक्तस्रावाच्या स्वरूपात बाहेर पडते. पण एखाद्या महिलेला एंडोमेट्रिओसिस असल्यास, हे 

एंडोमेट्रियम अंडाशयाभोवती आढळते व यामध्ये रक्त बाहेर येण्याऐवजी ट्यूबमध्येच जमा होते, ज्यामुळे गर्भधारणेमध्ये अडचण येऊ शकते व हा आजार महिलांमध्ये वंध्यत्वाचे मुख्य कारण असू शकते.

एंडोमेट्रिओसिसची लक्षणे काय?

एंडोमेट्रिओसिसच्या लक्षणांपैकी प्रमुख म्हणजे ओटीपोटात वेदना. या वेदना नाभीच्या खाली ओटीपोटात आणि कंबरमध्ये जाणवू शकतात. सहसा या वेदना मासिक पाळी, ओव्हुलेशन किंवा इंटरकोर्स दरम्यान होतात. या सौम्य किंवा तीव्र असू शकतात व महिलेला सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. बहुतेक वेळेस हा आजार तिच्या शरीरात वाढत आहे हे महिलेला कळतही नाही. जास्त रक्तस्त्राव, पोटात असह्य वेदना, ओटीपोटात दुखणे या कारणांमुळे एखादी महिला डॉक्टरकडे जाते, तेव्हा तपासणीनंतर ही स्थिती आढळून येते.

एंडोमेट्रिऑसिस आणि गर्भधारणा

एंडोमेट्रिऑसिसमुळे गर्भधारणेत येणाऱ्या अडथळ्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. फेलोपियन ट्यूबमधून अंडाशयातील स्त्रीबीज गर्भाशयात प्रवास करत असतात. पण फॅलोपियन ट्यूबच्या अवतीभोवती एंडोमेट्रियमचे अस्तर वाढल्याने, स्त्रीबीज गर्भाशयात जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो.

एंडोमेट्रिऑसिसमुळे शरीरात मोठ्या प्रमाणात दाह निर्माण होतो व शरीरात उत्पन्न झालेल्या प्रतिरोधक पेशी स्त्रीबीज आणि पुरुष शुक्राणूला हानी पोहोचवतात व स्त्रीबीज आणि पुरुष शुक्राणू नष्ट करू शकतात. याकारणाने शुक्राणू आणि स्त्रीबीजाचं फलन होत नाही व गर्भधारणा होत नाही. 

एंडोमेट्रिओसिस रोखले जाऊ शकते का?

जगातील इतर जीवनशैली रोगांप्रमाणे, एंडोमेट्रिओसिस देखील आपण किती निरोगी खातो, किती व्यायाम करतो, आपण कसे विचार करतो आणि कसे वाटते याच्याशी थेट संबंधित आहे. गर्भधारणेची शक्यता वाढविण्यासाठी, गर्भधारणा निरोगी आणि गर्भाची वाढ चांगल्याप्रकारे होण्यासाठी सदृढ आणि व्याधीमुक्त जीवनशैली अवलंबणे आवश्यक आहे. यासाठी कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन कमी करणे, फळं-भाज्या, धान्य आणि पातळ प्रथिनयुक्त आहाराचा समावेश करणे, नियमित मध्यम स्वरुपाचा व्यायाम करणे, संतुलित वजन राखणे गरजचे आहे.

एंडोमेट्रिऑसिसवर उपाय काय?

एंडोमेट्रिऑसिसमुळे गर्भधारणेस समस्या येत असेल तर  प्रजननतज्ज्ञांकडे उपचार घेऊ शकतो. एंडोमेट्रिऑसिस संबंधित समस्यांच्या उपचारांमध्ये खालील प्रक्रियांचा समावेश होतो.

स्त्रीबीजांचे गोठण : एंडोमेट्रिऑसिस गर्भाशयाच्या राखीव भागांवर परिणाम करतो. म्हणूनच, जर नंतर एखादीला गर्भवती होण्याची इच्छा असेल तर डॉक्टर अंडी गोठवण्याची शिफारस करतात.

सुपरव्यूलेशन आणि इंट्रायूटरिन इनसेमिशन : फॅलोपियन ट्यूबमध्ये सौम्य एंडोमेट्रिओसिस असल्यास व जोडीदाराकडे दर्जेदार शुक्राणू असल्यास, हा उत्तम मार्ग आहे. या प्रक्रियेमध्ये स्त्रीला स्त्रीबीज तयार करण्यासाठी काही विशिष्ट औषधं दिली जातात. स्त्रीबीज परिपक्व झाल्यावर पुरुषांच्या शुक्रजंतूंची शक्ती वाढवून ते गर्भाशयाच्या वरच्या भागात सोडले जातात. यामुळे शुक्रजंतू आणि स्त्रीबीज यांचे मिलन होऊन फलन होण्याची शक्यता वाढते.

इन विट्रो फर्टिलायझेशन : या प्रक्रियेमध्ये स्त्रीबीज आणि पुरूष शुक्राणूंचे मिलन प्रयोगशाळेत करून, ते गर्भाशयाच्या आत रोपण करतात.

लॅपरोस्कोपी : गर्भाशयात वाढलेल्या एंडोमेट्रियमच्या अवांछित पेशी लॅपरोस्कोपी शस्त्रक्रियेद्वारे काढल्या जातात. यामुळे गर्भधारणेच्या संधी वाढतात. 

डॉ. श्वेता राऊत मुळगावकर