गोव्याला सांस्कृतिक वारसा फार मोठ्या प्रमाणात लाभला आहे आणि हा सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम काही व्यक्ती आपापल्या परीने करत आहेत.
गोव्याला सांस्कृतिक वारसा फार मोठ्या प्रमाणात लाभला आहे आणि हा सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम काही व्यक्ती आपापल्या परीने करत आहेत. कुणबी साडी ही गोव्याची खास ओळख आहे. या कुणबी साडीची परंपरा मोठी असून कुणबी साडी आणि गोवा हे समीकरण झाले आहे.
कुणबी साडी जेव्हा विणकर विणतो, तेव्हा त्या विणलेल्या साडीपासून काही कपडे बनवतात, तर काही इतर फॅशनचे कपडे शिवून वापरतात. ही साडी विणत असलेल्या कारागिरांना याचा किती मोबदला मिळतो, या संकल्पनेतून कोणी पुढे जाऊ शकतो का? हा विचार फार कमी केला जातो.
जय फाउंडेशन, गोवा या २०१८ साली स्थापन झालेल्या गैर सरकारी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा असलेल्या श्रद्धा श्रीनिवास खलप या गोव्यातील विविध सामाजिक उपक्रमामध्ये गुंतलेल्या असून, गोव्याचा सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कुणबी साडीला गोव्यात तसेच गोव्याबाहेरही नवीन ओळख करून देण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. श्रद्धा या ए.आय.एस.एस.एम.एस. पुणे, पुणे विद्यापीठातील हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये पदवीधारक असून लंडन येथील पाककला आणि स्वयंपाकघर व्यवस्थापनामध्ये त्यांनी पदव्युत्तर डिप्लोमा केला आहे. फूड स्टायलिंग आणि फूड फोटोग्राफी कार्यशाळा आयोजित करणार्या स्पेशलाइज्ड हॉस्पिटलीटी एज्युकेशन सोसायटी (FAB) फूड आर्ट ब्युटीकच्या त्या संस्थापक उपाध्यक्षा आहेत. हिस्ट्री १८ आणि एपिक चॅनेलसाठी विविध खाद्यपदार्थ संबंधित टीव्ही मालिकामध्ये त्या योगदान देत आहेत.
चेन्नई येथील ‘कला क्षेत्रम’ या आंतरराष्ट्रीय नृत्य शाळेतील कलाकारांसाठी त्यांनी खास प्रकारच्या कुणबी साड्या गोव्यातील कलाकारांकडून विणून घेतल्या आहेत. या नवीन प्रकारच्या कुणबी साड्या जेव्हा हे कलाकार वापरतात तेव्हा गोव्याची पारंपरिक ही कुणबी साडी गोव्याबाहेरील कलाकारांच्या अंगावर शोभून दिसतानाच गोव्याची परंपराही गोव्याबाहेर जपल्याचे समाधान श्रद्धा यांना लाभते.
विकास परिषद महाविद्यालय, सप्तकोटेश्वर मांद्रे येथे १२ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शाखेमध्ये फॅशन डिझायनिंगमध्ये हस्तकला फॅब्रिक कसे करायचे याचे शिक्षण देण्यासाठी त्या प्रयत्नशील असून यासाठी त्यांनी सरकारद्वारे या शिक्षणाला चालना दिली. या द्वारे दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या विभागात हातमाग कसा चालवायचा, हातमागावर साडी कशी विणायची याचे या विभागातील विद्यार्थ्यांना खास प्रशिक्षण देण्यात येते. गोव्यातील हे पहिलेच महाविद्यालय आहे, जिथे हे हातमागावरील प्रशिक्षण विद्यार्थ्यांना प्राप्त होत आहे.
जय फाउंडेशन या संस्थेद्वारा श्रद्धा खलप जुनी स्टेशनरी, वापरलेले परंतु चांगल्या स्थितीतील कपडे, धान्य, जुने फर्निचर आदी एकत्रित करून या सर्व वस्तू त्या ग्रामीण भागातील ज्या शाळेतील मुलांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होत नाहीत, अशा मुलांना वितरीत करतात. केवळ गोव्यातच नव्हे, तर दोडामार्ग, कुडाळ येथील शाळांमध्येही त्या या सर्व वस्तू वितरीत करतात. याच संस्थेद्वारे त्या ज्या वृद्ध व्यक्तींची मुले त्यांच्यासोबत नाहीत, किंवा ज्यांची मुले कामानिमित्ताने बाहेरगावी आहेत, अशा वृद्धांच्या वैद्यकीय सेवा, औषधे पुरविणे इत्यादी सेवेसाठी मनुष्यबळ पुरवून त्यांच्या गरजा पूर्ण करतात. अशा वृद्ध व्यक्तींची मुले त्यांच्या संपर्कात असतात व त्यांच्या सूचनेनुसार हे सर्व कार्य केले जाते. कोविड काळात त्यांनी ही सेवा पुरविण्यास सुरुवात केली होती. ती आजतागायत सुरू आहे. गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेशी त्या संलग्न असून गोव्यातील किल्ले किंवा गड यांची साफसफाई करण्याकरता पुढाकार घेणे व या संस्थेलाही साफसफाई करण्यासाठी योग्य ती मदत पुरविणे या साठीही श्रद्धा प्रयत्नशील आहेत.
कविता आमोणकर