वर्षाकाठी एकदा तरी अळंबी खायलाच पाहिजे असा गोवेकरांचा हट्ट असतो. शाकाहाऱ्यांनाही अळंबी खूप आवडतात. हल्लीच्या काळात होणारी जंगलतोड, प्रदूषणाचा पर्यावरणावर होणारा परिणाम यामुळे अळंबी पैदास खूप कमी होत चालली आहे.
चतुर्थीच्या दिवशी तिने वेळात वेळ काढून मला फोन केला. सहज बोलता बोलता म्हणाली “मागच्या दिवसात तू मला पाठवलेली अळंबी खूप मस्त होती. माझ्या सासूबाई खूप खुश झाल्या.” रविनाची सासू मी पाठवलेली अळंबी खाऊन खुश झाली हे ऐकून मला समाधान झाले. तसं पाहिल्यास प्रतिवर्षी रविनाच मला अळंबी पाठवायची पण मागील दोन वर्षापासून तिलाच बिचारीला खायला अळंबी मिळत नव्हती. मग ती मला कशी पाठवणार? वर्षातून एकदा तरी किमान नैसर्गिकरित्या उगवणारी अळंबी खायला मिळाली तरी गोमंतकीय खुश असतात. ही अळंबी आणि गोमंतकीय यांचे एक वेगळेच नाते आहे. जसे पावसात उगवणाऱ्या भाज्या आणि गोमंतकीयांचे नाते आहे, तसे! पावसात तेरे, तायखुळा, सिलोन भाजी, लुतेभाजी, किल्ल अशा अनेक प्रकारच्या भाज्या उगवतात आणि त्या खाऊन गोमंतकी तृप्त होतात. त्याचप्रमाणे पावसात उगवणारी वनस्पती किंवा भाजी म्हणजे ‘अळंबी’.
आषाढ सुरू झाला, की गोमंतकीय अगदी डोळयात प्राण आणून अळंबीची वाट पाहत असतात. श्रावणात जेव्हा गोमंतकीय शाकाहारी असतात, तेव्हा या माशांची जागा अळंबीची रूचकर व्यंजने पटकावतात आणि माशांपेक्षा आपण किती स्वादिष्ट, रूचकर आणि महान आहोत हे गोमंतकीय खवय्यांना पटवून देतात. पावसात उगवणाऱ्या इतर गोमंतकीय भाज्या तशा सहज उपलब्ध असतात, पण अळंबी मात्र इतक्या सहजपणे उपलब्ध नसतात आणि उपलब्ध असली तरी एकदम चढ्या भावात विकली जातात.
आषाढ महिन्यात कोसळणाऱ्या पाऊसधारा बरसू लागल्या आणि ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला, की ही अळंबी फुलतात. आषाढात शिरशिरून जाणारा पाऊस बघितला की माझी आजी म्हणायची, “अळम्यांचो पावस पडटा, आता अळमी फुलतली” आणि खरंच त्या रात्री अळंबी उगवायची. ठराविक जागी म्हणजे जसे एखादे वारूळ, माळरान, शेताभाटातील जागा किंवा कुळागर अशा जागी भरभरून पांढऱ्या रंगाची नाजूक मुलायम बटणं उगवायची आणि बघताबघता दुपारपर्यंत त्यांच्या इवल्याइवल्याशा छान छत्र्या व्हायच्या आणि रात्रीपर्यंत जर ती काढली नाही, तर त्या कळ्या कोमेजून जायच्या. अशी ही नाजूक पण चवीला जबरदस्त अळंबी पावसाळ्यात निसर्गाने बहाल केलेली किमयागार वनस्पती.
आषाढ संपता संपता अशा अळंब्याची गोवेकर आतुरतेने वाट पाहतात. लहानापासून ते बुजुर्गांपर्यंत सर्वांना आवडणारी ही नैसर्गिक अळंबी वर्षातून एकदा तरी चाखायलाच पाहिजे असे गोमंतकीयांचे ठाम मत. त्यामुळे अळंबीचा पाऊस सुरू झाला, की ही अळंबी कुठे उगवतात का यावर गोमंतकीयांचे एकदम बारीक लक्ष असते. अळंबी जितकी रुचकर तितकीच खूप नाजूक त्यामुळे ही अळंबी वारुळावरून खुडण्यापूर्वी झाडांच्या बारीक फांद्या घेऊन हळुवार त्या वारुळाभोवती फिरवतात. या कृतीमागची शुद्ध भावना म्हणजे, “वारुळात एखादा सरपटणारा प्राणी किंवा नागोबा असला तर माणसाच्या येण्याची चाहूल लागताच त्याने तेथून पलायन करावे” असे माझे बाबा सांगायचे.
मातीत उगवणारी अळंबी नैसर्गिक वनस्पती किंवा भाजी असली तरी उपवासाच्या दिवशी किंवा देवाच्या महाप्रसादात याचा वापर वर्ज्य असतो. शिवाय नागपंचमीला अळंबी तोडू नये आणि खाऊ नये अशी धारणा आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीला अळंबी खाणे वर्ज आहे. खायला जरी अळंबी रुचकर असली, तरी तोडून आणल्यावर साफ करायला खूप वेळ वाया जातो कारण ती एकदम ओल्या मातीने माखलेली असतात. मीठ मसाला लावून तव्यावर भाजलेली अळंबी तळलेल्या सुरमईपेक्षाही रुचकर असतात. मला अजूनही आठवते, ज्यावेळी मला पहिल्यांदा मातृत्वाची चाहूल लागली होती व त्या आषाढात मी माहेरी आईकडे गेली होती, त्यादिवशी बाबांना आमच्या बागायतीत भरपूर अळंबी मिळाली. परडीत घातलेल्या त्या अळंबीच्या अशा पांढऱ्याशुभ्र कळ्या पाहून माझ्या जिभेला पाणी सुटले. गरोदरपणात अळंबी खाऊ नये अशी धारण आहे आणि आजही ती धारणा पाळली जाते त्यामुळे माझ्या आईला काय करावे ते समजेना. शेवटी तिने अळंबीची भाजी अगदी जेमतेम दोन चमचे मला खायला दिली आणि कदाचित मला त्रास होऊ शकतो या विवंचनेने, चिंतेने ती दोन-तीन दिवस अस्वस्थ होती. पण मला काहीच त्रास झाला नाही.
आता ही झाली एक प्रकारची नैसर्गिकरित्या उगवणारी वनस्पती, म्हणजे अळंबी. याशिवाय आणखी एक प्रकारची अळंबी पावसाळ्यात उगवतात त्याला ‘फुगे’ असे म्हणतात. एका ठिकाणी एकाच वेळी पाच ते सहा फुगे उगवतात. अळंबीसारखे हे फुगे बारीक बारीक कळ्यांनी भरभरून उगवत नाहीत. हे फुगे छत्रीच्या आकाराचे पण अळंबीपेक्षाही जरा मोठे, शिवाय रंगाने काळपट असतात. मात्र अळंबी इतके फुगे रुचकर नसतात. त्याचीही पातळ भाजी चवीला छान लागते.
हल्लीच्या काळात होणारी जंगलतोड, प्रदूषणाचा पर्यावरणावर होणारा परिणाम यामुळे अळंबी पैदास खूप कमी होत चालली आहे. शिवाय पावसात उगवणारी अळंबी म्हणजे जैविक वनसंपदा. मागिल दोन वर्षात अळंबीच्या मोसमात ती बाजारात विक्रीसाठी मुकबल प्रमाणात उपलब्ध नाही. वर्षाकाठी एकदा तरी अळंबी खायलाच पाहिजे असा गोवेकरांचा हट्ट असतो. शाकाहाऱ्यांनाही अळंबी खूप आवडतात. खूप प्रयत्न करूनही जेव्हा पावसाळ्यात ही नैसर्गिक अळंबी गोमंतकीयांना खायला मिळत नाही, तेव्हा ते आपली दुधावरची तहान ताकावर भागवतात. म्हणजेच बाजारात उपलब्ध कृत्रिम अळंबी खातात आणि म्हणतात, “यंदा अळंबी खाल्लीच नाहीत रे!”