वेणी फणी

आपले केस सुंदर, काळे, दाट असावे असे सगळ्या स्त्रियांना वाटते. पण हल्लीच्या काळातील स्त्रियांचे केस ‘लांबसडक’ सोडाच, पण ‘लांब’ केस मिळणे कठीण. त्यात केसात फुले हल्लीच्या मुली तर अजिबात माळत नाहीत. मग त्या शहरातील असो, किंवा ग्रामीण भागातील.

Story: ललित |
4 hours ago
वेणी फणी

पाच दिवसांच्या गणपतीला मैत्रिणीकडे गेले होते. सकाळच्या वेळी देवाच्या अंगावरील फुले (निर्माल्य) गजरे, वेण्या सगळ्या स्त्रियांना वाटल्या जात होत्या. मीही छोटासा जाईचा गजरा माझ्या वेणीत खोवला. मैत्रिणीच्या सुनबाईने मात्र पिवळ्या, सोनेरी, नाजूक शेवंतीचे फाती मागितली आणि आपल्या केसात माळली सुद्धा. मी अचंबितपणे, पण आनंदाने तिच्याकडे बघत राहिले. 

माझ्या अचंबित होण्यामागची कारणेही तशी भरपूर होती. एक म्हणजे जेमतेम लग्नाला एक वर्ष झालेली ही नवी नवरी, आजच्या काळातील नोकरी करणारी तरुण स्वयंपूर्ण नारी. तरी केसांची दाट, लांबसडक वेणी, दोन्ही हातात भरभरून काचेच्या बांगड्या, काठापदराची साडी, पायात पैंजण, जोडवी सारा सारा सवाष्णीचा साजशृंगार लेवून ती चार-पाच दिवस भरल्या घरात गणेश चतुर्थीनिमित्त वावरत होती. सासू, चुलत सासू, जावा यांच्या हाताला हात लावून कामेही हातावेगळी करीत होती. 

या केसांच्या लांब दाट वेणीचे आणि माझे एक वेगळेच नाते आहे. माझे बालपण शिवाय लग्न होईपर्यंत सारे जीवन निसर्ग संपन्न खेड्यात सुकर झाले. माझ्या बालपणी, तरुणपणी सगळ्याच मुलींचे केस लांब असायचे. त्यातल्या त्यात काहींचे तर दाट आणि लांब सडक असायचे. सकाळी शाळेला जाताना घरातल्या लहान-मोठ्या मुलींच्या केसांची वेणीफणी करणे हे घरातील आई आजीचे दैनंदिन काम होते. सकाळी शाळेला जाताना दोन वेण्या अगदी डोक्याला खोबरेल तेल लावून अगदी चापून-चोपून घट्ट बांधल्या जायच्या. त्याही रंगीत रिबिनीने. या रिबीनींचा रंग मनोहारी म्हणजेच लाल, गुलाबी, निळा, पिवळा, जांभळा किंवा पाचवाही असायचा. 

एकदा सकाळी वेण्या बांधल्या, की त्या साहसा सुटत नसत. कितीही खेळा, धावा, पळा. अगदी मैत्रिणीने खेळताना, भांडताना ओढल्या, तरी  वेण्या मात्र जसच्या तशा रहायच्या. संध्याकाळी मग हातातली सगळी कामे हातावेगळी झाली, की निवांत वेळी आईला आमच्या वेणीफणीची आठवण यायची. डोक्याला खोबरेल तेलाची मालिश वगैरे करून जराश्या विस्कटलेल्या वेण्या आई परत रिबिनीने घट्ट बांधायची.  दुसऱ्या दिवशीपर्यंत सकाळपर्यंत या वेण्या जशाच्या तशा राहायच्या. चुकून जर कामात गुरफटून आईला  संध्याकाळी  आमच्या केसांची वेणीफणी करायला उशीर झाला, तर संध्याकाळ उलटून गेल्यावर आजी मग ओरडायची, “पोरींचे केस डोळ्यावर येतात बघ, पोरगी तिरशी होणार, आधी तिची वेणीफणी कर.” 

एखादा सणवार असला, तर मग यावर एखादा जाई, जुईचा गजरा, किंवा मोगऱ्याची वेणी, बकुळीचा गजरा, अबोलीची फाती दिमाखात मिरवायचे. शाळा संपून हायस्कूलात गेल्यावर मात्र वेण्यांच्या रिबीनींच्या रंगांत बदल झाला. त्याचे असे झाले, हायस्कूलमध्ये चार ‘हाऊज’ होते. लाल, निळा, पिवळा आणि हिरवा. त्याचप्रमाणे सगळ्या हायस्कूलातील विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करण्यात आले होते. मुलींच्या केसातील रिबीनींचा रंग हा ह्यांचप्रमाणे असावा ही शिस्त होती. त्यामुळे रिबिनींचा रंग फिक्स झाला. पाचवीत असताना रिबीनींचा रंग फिक्स झाला. तो अगदी दहावीपर्यंत तसाच राहिला. माझ्या लांब सडक दाट केसांना दहावीपर्यंत शिक्षण होईपर्यंत या दोन वेण्यांनी अखंड साथ दिली. 

मी दहावीनंतर कॉलेजमध्ये अकरावीला ऍडमिशन घेतले आणि या दोन वेण्यांची जागा एका वेणीने घेतली ती ही व्यवस्थित बांधलेली आणि अर्धे केस मोकळे सोडलेली अशी माझी वेणी होती. काही माझ्यासारख्या दोन वेण्या घालून येणाऱ्या मुली होत्या. शिवाय काही मुली छान  फॅशनेबल केसांचा ‘बप कट’ केलेल्या होत्या. एका मुलीच्या केसांचा तर ‘बॉयकट’ होता आणि तिचा पेहरावही तसाच मुलांसारखा होता. आम्ही तिला ‘टॉम बॉय’ म्हणायचो. आणखी एक मुलगी आमच्या वर्गात होती दिसायला नाजूक, सुंदर आणि सुस्वभावी सुध्दा होती. ती पण नेहमीच  कॉलेजला येताना ती आपले लांबसडक दाट केस मोकळे सोडायची. मी एके दिवशी तिला या दाट, लांब सडक, काळ्याभोर मोकळ्या सोडलेल्या केसांबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली, “एखादे मंगलकार्य, शुभकार्य असेल तर मी केसांची छान वेणी किंवा एखादी स्टाईल करते. तेही पार्लरमध्ये जाऊन.” दहावी पास होईपर्यंत आम्हाला ब्युटी पार्लर हे माहीतच नव्हते कारण आमच्या खेड्यात त्याकाळी ब्युटी पार्लर 

नव्हते. 

अगदी दहावी होईपर्यंत मला माझ्या लांबसडक दाट केसांच्या स्वत: वेण्या घालणे जमलेच नाही. सुट्टीत, आत्याकडे, मामा किंवा मावशीकडे गेले असता माझे केस माझ्या आतेबहिणी, मामेबहिणी विंचरायच्या, केसातील ‘ऊवाही' काढायच्या. मुलींनी फ्रॉक किंवा परकर पोलका किंवा बेलबोटम घालायचे आणि दोन वेण्या घालायच्या, स्त्रिया-आयाबायांनी साडी किंवा नऊवारी नेसायची आणि केसांचा अंबाडा आणि त्यावर फुलांची फाती माळायची असा स्त्रियांचा पेहराव असायचा. असा तो जमाना होता. त्याकाळी स्त्रिया सहसा केस मोकळे सोडत नसत. मग त्या मुली असो, किंवा आयाबाया. केस मोकळे सोडणे म्हणजे संस्कारी स्त्रीचे लक्ष नाही असे त्याकाळी मानले जायचे. मग संध्याकाळच्या निवांत वेळी एकमेकांचे केस विंचरणे, ऊवा काढणे, एकमेकांच्या डोक्याला खोबरेल तेलाने मालिश करणे व्हायचे. या निमित्ताने घरच्या पोरी, आयाबाया तसेच शेजारच्या पोरीही एकत्र यायच्या, एकमेकांशी हितगुज साधले जायचे, गप्पागोष्टी व्हायच्या, मनातील भावनांना, विचारांना आणि कधी कधी दुःखालाही वाट मोकळी व्हायची, नवरीमुलीचे केस दाट काळे लांब सडक असले पाहिजे ही कधीकधी त्या काळच्या नवऱ्या 

मुलांची मागणी असायची. लांबसडक दाट केसांवरून पोरींना पसंत केले जायचे असाच तो जमाना होता. 

आपले केस दाट काळे सुंदर असायला पाहिजे असे प्रत्येक स्त्रीला त्याकाळी वाटायचे कारण सुंदर केशसंभार स्त्रीच्या सौंदर्यात भर घालायचा. आजच्यासारखी पावलोपावली ब्युटी पार्लर, भरभरून सौंदर्यप्रसाधने, शाम्पू वगैरे त्याकाळी उपलब्ध नव्हती. आपल्या लांबसडक केसांची निगा राखायला तसा तिच्याकडे भरपूर वेळ असायचा, नाहीतर वेळ काढला जायचा. 

आजच्या काळातील स्त्री उच्चशिक्षित, स्वावलंबी, प्रगतशील नारी आहे. घर-संसार, मुलांचे योग्य संगोपन, तीची एखादी नोकरी, व्यवसाय सगळे सांभाळताना तिला वेळेचे नियोजन करावे लागते. घाई गडबडीत तिला कामावर पळावे लागते. त्यामुळे ती आपल्याला साजेसा, आपल्या पेहेरावाला शोभेसा एखादा चांगला हेअरकट पसंत करते. पार्लरमध्ये जाऊन विविध केसांच्या स्टाईल करते.  शक्यतो लहान केसच पसंत करते. त्यामुळे लांबसडक, दाट केस क्वचितच पाहायला मिळतात. रोजच्या वापरातील वेणी, अंबाडा ही जुनी हेअरस्टाईल झाली आहे, ‘आउटडेटेड’ झाली आहे. एखादी साडी नेसली तरी वेणी, अंबाडा कोणी घालत नाही. अशा साडी नेसून अंबाडा घालून फिरणाऱ्या महिलांना हल्ली ‘गावंढळ’ किंवा ‘काकूबाई’ असे संबोधले जाते. फक्त सिरीयलमध्ये आणि सिनेमांमध्ये मात्र हे सारे चालते. मंगल कार्यात, शुभकार्यात मात्र अंबाडा, सागर वेणी, खजूर वेणी, बन असे विविध केसांचे प्रकार, स्टाइल्स त्या-त्या पेहरावाला साजेश्या पाहायला मिळतात. तिच्या पेहरावाला साजेसा तिला सुंदर दिसण्यासाठी मेकअप आणि हेअरस्टाईल ती करते. आजकालच्या स्त्रियांमध्ये विविध हेअरस्टाईल बघायला मिळतात. तरीही  केसांच्या वेणीला  आणि अंबाड्याला शुभ परिधानांत एक वेगळेच महत्त्व आजही आहे.


- शर्मिला प्रभू 

मडगाव. मो. ९४२०५९६५३९