हल्लीच्या पिढीचे काही कळेनासेच झाले आहे. कुणी म्हणतं मला लग्नच करायचं नाही, कुणी म्हणतं आम्ही एकटेच चांगले आहोत. असा विचार त्यांच्या मनात येण्याचे कारण म्हणजे आजकाल दिसून येणारी घटस्फोटाची उदाहरणे. उद्या पुढे जाऊन जर असं घडणार असेल तर नकोच त्या वाटेने जायला असा साधा सोप्पा विचार करून ते त्या गोष्टी पासून दूर पळायला पाहतात.
खरं तर तारुण्यात पदार्पण करताना विरुद्ध लिंगी व्यक्तींचं आकर्षण वाटणं ही नैसर्गिक गोष्ट. आपल्याला जोडीदार जीवनसाथी असावा असं वाटण्याचं हे वय. मित्र मैत्रिणी एकमेकात असा जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करतात कधी तो सफल होतो कधी नाही होत. हल्ली पालक मुलांना आपले जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य देताना दिसतात पण त्यामुळे कदाचित ती जबाबदारी त्यांना पेलवत नसावी. पूर्वी आईवडील ठरवत त्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न करून मोकळं व्हायचं असं व्हायचं. शास्त्रीय दृष्टिकोनातून मुला मुलींची शारीरिक मागणी असणाऱ्या वयात लग्नं होत होती. योग्य वयात पार्टनरची गरज असते ती पूर्ण होत होती. पण आता आजूबाजूची प्रकरणे बघता आपला निर्णय चुकणार तर नाही न अशी भीती वाटत असल्याने मुले लग्नाची टाळाटाळ करताना दिसतात. आगीतून फुफाट्यात पडण्यासारखं वाटतं. पण आपण जगतो कशाला? तर आनंद मिळवण्यासाठी, आणि तो झालेला आनंद कुणाशी तरी शेअर करावासा वाटणं साहजिकच आहे, आपला आनंद आपली दु:खे अनुभव सांगण्यासाठी कुणी तरी सोबत असावं लागतं. भौतिक गरज जरी पूर्ण झाल्या तरी मानसिक गरजा पूर्ण करायला जोडीदाराची गरज असते. आईवडील, मित्र-मैत्रिणी यांच्याशी आपण ठराविक गोष्टीच शेअर करतो. प्रत्येक गोष्ट शेअर करू शकत नाही. एक व्यक्ति अशी असावी लागते जिच्यासोबत दिवस रात्र कधीही तुम्ही आपलं मन मोकळं करू शकता, ती म्हणजे जोडीदार किंवा जीवनसाथी. आपल्या आयुष्यात घडणारी, घडलेली गोष्ट ऐकून घेणारी एकच व्यक्ती असते ती म्हणजे आपला जोडीदार. बॉस ओरडला, प्रमोशन मिळाले, कुठे नवीन काम मिळाले, पगार वाढला अशा गोष्टी सांगताना तुमचा पार्टनर तुम्हाला सपोर्ट करतो. वाईट गोष्टीतही आणि चांगले घडल्यावरही. तुमचे जीवन दुसऱ्याच्या जीवनाशी जोडले जाते. तो एक स्ट्रॉंग असा भावनिक आधार असतो.
सिंगल राहणं किंवा एकट्याने जीवन व्यतीत करणं हे काही काळासाठी सुखदायी वाटत असतं, पण हळू हळू त्या एकटेपणाचा कंटाळा येऊ लागतो. तोचतोचपणा जाणवू लागतो. कारण माणूस हा माणसाच्या सहवासासाठी भुकेला असतो. घर सोडून हॉस्टेलला राहायला गेलेल्या पोराला ते स्वातंत्र्य सुरवातीला अगदी खूप सुखाचे वाटत असते. आईवडिलांच्या बंधनातून मुक्त झाल्यासारखे वाटत असते. पण जेव्हा तो एकटा राहू लागतो तेव्हा ते एकटेपण त्याला खायला उठते. दिवाळीला माहेरी गेलेली बायको नवरा अगदी चार दिवस त्याचं स्वातंत्र्य मस्त इन्जॉय करतो पण लवकरच त्याला बायकोला कधी घेऊन येतो असं होतं कारण त्याची जीवनसाथी दूर गेल्याने आनंदाचे क्षण शेअर करता येत नाहीत, घरात गैरसोय होत असते. तिची साथ सोबत हवीशी वाटते. अशा वेळी भरपूर मित्र किंवा नातेवाईक आजूबाजूला असले तरी त्या व्यक्तीशिवाय त्याला अपूर्ण वाटत असतं. एकमेकांशिवाय ते अपुरे असतात. जोडीदाराबरोबर तुम्ही तुमचे प्रत्येक विचार आणि भावना शेयर करू शकता. जे इतर कुणा सोबत नाही करू शकत. आयुष्याचा खरा आनंद लुटण्यासाठी जोडीदाराची गरज असते. असं म्हणतात शादिका लड्डू जो खाये वो पछाताये जो ना खाये वो भी पछताये, त्याची जर चवच चाखली नाही तर चांगलं की वाईट ही कसं ठरवता येणार?
स्त्री पुरुष एकत्र आयुष्याच्या प्रवासात बरोबर जायचं ठरवतात, पण त्यांना विवाहाचं बंधन नको असतं. रिलेशनशिपमध्ये रहायचा त्यांचा विचार हा काही काळा पुरता जरी यशस्वी ठरत असला तरी लांब पल्ल्याच्या जीवन प्रवासात तो उपयुक्त ठरेलच असं नाही. एकमेकाना घट्ट बांधून ठेवणारी संस्काराची वीण त्यांच्यात तयार होतेच असं नाही. हे नातं कधीही मोडू शकतं अशी भीती मात्र दोघांच्याही मनात दडलेली असते. त्यात शाश्वती नसते. आयुष्याच्या टप्प्यात भेटलेला हा जोडीदार मात्र एकमेकांसाठी पूरक असला पाहिजे. एकमेकात फिट बसणाऱ्या नटबोल्ट सारखं त्यांचं एकमेकां बरोबर नातं असलं पाहिजे. यांत्रिक भाषेत पाइप फिटिंगमध्ये मेल आणि फिमेल अशी नावे ठेवलेली दिसतात तसे एकमेकांसाठी फिट होणारे असावेत. इथे फक्त आकाराचा प्रश्न नाही तर मन, विचारसरणी, राहणीमान या सर्वांचा ताळमेळ जुळायला हवा. म्हणजे ‘मेड फॉर ईच आदर’ असे असले पाहिजेत. नाहीतर दोन मने जुळली नाही तिथे जोडीमधे फुट पडायला वेळ लागत नाही. फक्त तरुणपणातच नव्हे, तर आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर जोडीदाराची गरज भासत असते. जोडीदार हा वैवाहिक जीवनात महत्वाचा असतो. सप्तपदी चालताना घेतलेली वचने, मी कायम तुझ्यासोबत असेन ही गोष्ट नात्याला बळकटी देते. हाती हात असणे गरजेचे असते. तरुणपणी ती मैत्रिणीसारखी साथ देते, कुटुंबात आईवडील किंवा इतर कुणाशी काही वादविवाद असतील तर ती यावर सोल्यूशन देऊ शकते. आपल्या कुटुंबाला धरून ठेवणारी नात्यांची जाणीव करून देणारी ती व्यक्ती म्हणजे जोडीदार असते. आजारी असताना काळजी घेणारी, अडचणीतून मार्ग दाखवणारी आपली इमोशनल गरज ओळखून वागणारी ती व्यक्ती तुमची जवळची पार्टनर असते. तुम्हाला अधिक चांगले बनवण्यात त्याचाच हात असतो. प्रत्येकात चांगले आणि वाईट गुण असतात त्यातल्या वाईट गुणांचा नायनाट करून चांगल्या गुणांचा विकास करायचं काम तुमचा जोडीदार करू शकतो. एकमेकांना काय आवडतं काय नाही आवडत हे एखाद्या जोडीदारा शिवाय जास्त चांगलं कोण जाणून घेईल कारण ती व्यक्ती चोवीस तास तुमच्या सोबत असते. तुमचं परीक्षण आणि निरीक्षण दोन्ही तिला अवगत असतं. असं गुड रिलेशनशिप असेल तर जीवन बदलून जायला वेळ नाही लागत. आपल्या पुढे आपले उभे आयुष्य पडलेले असते तेव्हा अगदी शेवटपर्यंत साथ देणारी कुणीतरी व्यक्ति जीवनसाथी असावी अशी मनाची धारणा असते. कुठल्याही परिस्थितीवर मात करताना कुणाचा तरी भारी भक्कम सपोर्ट असावा असं वाटत असतं ही अपेक्षा पूर्ण होते ती योग्य जोडीदार लाभल्यावर. हक्काचा जोडीदार म्हणून लग्न झाल्यावर नवरा बायकोत एक भावबंध जोडला जातो. त्याची मग सवय होऊन जाते. मुले बाळे होतात, आर्थिक स्थैर्य मिळते, संसार पूर्णत्वाला आल्यावर पुढे अगदी मुले मोठी झाली त्यांच्या त्यांच्या मार्गाला लागली, तेव्हाही आधार असतो तो एकमेकांच्या जोडीदाराचा. नवरा बायकोतले नाते शेवटपर्यन्त जीवन सुसह्य करत असते. म्हणून जोडीदाराशिवाय जगणे कठीण आहे. ‘या कातरवेळी पाहिजेस तू जवळी’ असं वाटत असतं.
प्रतिभा कारंजकर, फोंडा