भीतीचा बागुलबुवा

भीतीची भावना ही मनाशी निगडित असते. भीती ही माहीत नाही असा कुणी माणूस सापडणे कठीण आहे. अगदी लहान बाळाला भीती माहीत नसते, पण आई-बाबा सांगतात याला हात लावू नको बाऊ होईल, आगीपासून दूर रहा भाजेल आणि खरंच तसं झाल्यावर त्या वस्तुची भीती त्याच्या मनात बसते.

Story: मनातलं |
4 hours ago
भीतीचा बागुलबुवा

छोटाआशु बेडरूममध्ये जायला घाबरत होता. “आज्जी तू बरोबर चल न...” म्हणून मागे लागला होता. “अरे तू तर शूर आहेस ना? घाबरत नाहीस कशाला... मग काय झालं?” “मला अंधाराची भीती वाटते. तू लाइट लाऊन दे ,मग मी जातो बेडरूममध्ये.” 

आशुसारखीच कधीकधी मोठ्या माणसांनाही काळोखाची भीती वाटत असते. माणूस असो, की कोणताही प्राणी. त्याला मनातून भीतीची भावना असतेच. खरं तर ही एक संरक्षक भावना आहे. एखाद्या गोष्टीपासून आपल्याला धोका आहे ही भावना मनात निर्माण होणे म्हणजे भीती वाटणे. कधी कधी ती काल्पनिकही असू शकते. पण आपलं मन आपल्याला सावध करत असतं. ही एक मूलभूत भावना आहे. आपल्याला संकटापासून वाचवण्यासाठी सजग करणारी ही धोक्याची सूचना असते. पण कधी कधी आपलं मन प्रत्यक्षापेक्षा जरा जास्तच घाबरतं.  मनाला उगाच अनाठायी भीती वाटू लागते, जी प्रमाणापेक्षा जास्त असते. त्याचे मग आपल्या शरीरावर पण परिणाम दिसू लागतात कुणाचे हातपाय थरथरू लागतात, कुणी भिऊन एकदम बसकण मारतात, कुणाला घाम फुटतो, हृदयाची धडधड वाढते, घसा कोरडा पडतो, गर्भगळीत होतो. असे अनेक परिणाम दिसून येतात. 

प्राथमिक जीवनात अज्ञाताची भीती असते. ज्या गोष्टीपासून त्रास होतो ती करणे टाळणे किंवा त्या वाटेला न जाणे अशी भीती मनात ठामपणे रुजते. लहानपणापासून आपण आपल्या मनात काही गोष्टींची उगाच भीती बाळगत असतो. लहानपणी ऐकलेला बागुलबुवा कधी समोर येतच नाही. त्याच्याशी सामना करायची किंवा त्याला भेटायची कधी वेळच येत नाही. असेच आपण अंधार, सावल्या, भुते, पोलीस  यांची भीती मनात गोठवत जातो. कधी कुणी छातीठोकपणे तुम्हाला सांगत नाही की मी भूत पाहिलं किंवा त्याचा सामना केला, त्यामुळे ती भीती तशीच मनात ठाण मांडून बसते. आपण सतत कसल्या न कसल्या भीतीच्या सावटाखाली जगत असतो. सतत वाटणारी चिंता, काल्पनिक अनामिक भीती मन ग्रासून टाकते, त्यातून काही मानसिक आजार सुद्धा 

होतात. 

कधी कधी नात्यांमधील माणसांचे स्वभाव भीती निर्माण करतात. तर काहींना इंटरव्ह्यू द्यायची, भाषण द्यायची, परीक्षेची, विमान प्रवासाची, उंचीची अशा गोष्टींची भीती वाटत असते. त्याला ‘फोबिया’ म्हणतात. म्हणजे ही भीतीच्या पुढची स्टेप असते. काही जण पुढचा विचार करत भीतीला आमंत्रण देत असतात. भीतीचे प्रसंग मनाशीच कल्पून त्याच्या भीतीत ते उगाच गर्भगळीत होत  असतात. अशी भीती तुम्हाला अकार्यक्षम बनवत असते. अशा वेळी संयमित विचारांनी भितीवर ताबा मिळवता आला पाहिजे. भीतीचा सामना करता आला पाहिजे. त्यासाठी ज्ञानाची मदत घेतली पाहिजे. अंधारात दोरीला साप समजून घाबरणाऱ्या माणसाला उजेड पडल्यावर ती दोरी दिसते, तेव्हा सापाची भीती पळून जाते. ही किमया प्रकाशाने घडवलेली असते. ज्ञानाच्या प्रकाशात भीती नाहीशी होते. 

कधी कधी अपयशाची भीती मनात दडलेली असते. तर कधी कुणाला आपल्याला सगळे लोक सोडून जातील आणि आपण एकटे पडू अशी भीती वाटत असते. अशा वेळी चार लोकांत मिळून मिसळून राहिलं तर ती भीती नाहीशी होते. जास्त विचार करणारी माणसे अशा भीतीला बळी पडतात. भविष्यात काय दडलंय हे माहीत नसल्यानेच भविष्याची भीती माणसाच्या मनात घर करून राहते. म्हणून विचार करताना सकारात्मकदृष्ट्या विचार करत, जे काही मिळेल ते स्वीकारायची तयारी ठेवत पुढचे जीवन आक्रमीत राहिलं पाहिजे. आपल्या मनात भीतीची भावना निर्माण करणारे घटक म्हणजे आपले डोळे, नाक, तोंड, स्पर्श, भावना. पायावर काहीतरी वळवळत गेलं की साप तर नाही ना या भीतीने एकदम घाम फुटतो. किंवा काही जळल्याचा वास आला तर आग तर नाही ना लागली? ही भीती मनात उभी राहते. अंधारात भूताच्या नुसत्या कल्पनेने माणूस पळत सुटतो. मुळात मनाच्या कोपऱ्यात ही भीतीची भावना दडलेली असते. ती बाहेर यायचा अवकाश आपल्या शरीराचा ताबा 

घेते. 

आजकालच्या यांत्रिकीकरणात आणि सोशल मिडियाच्या जाळ्यात अडकून पडलेल्या माणसाच्या मनात सतत स्वत:विषयी एक अदृश्य अशी असुरक्षितता भरून राहिलेली दिसते. ती वेगवेगळ्या कारणांनी असू शकते. एखाद्याचा स्वभाव भित्रा असतो तेव्हा तो सतत भीतीपोटी स्वता:ची काळजी करत माझं कसं होणार ही चिंता करतो. एकटे पडत चालल्याची भावना मनाला ग्रासू लागते. याची परिणती आत्महत्या करण्यात सुद्धा होताना दिसते. सध्या  कुठलीही स्पर्धा निकोप राहिली नाही. स्पर्धेत टिकण्यासाठी काहीही करायची तयारी आणि यश नाही मिळालं तर अपराधाच्या भावनेतून  सोन्यासारखा जीव गमावणं हे दिसून येतं. स्वत:चे अस्तित्व दाखवून देण्यासाठी धडपड करून यश नाही आलं, तर पुढच्या वेळी जास्त चांगले प्रयत्न करून मी यश मिळविनच हा सकारात्मक मनात विचार रूजला पाहिजे. हेही दिवस जातील, चांगले दिवस येतील ही मनोधारणा जपली गेली 

पाहिजे. 

टीव्हीवरचे कार्यक्रम त्यात होणारे कौतुक यातून लहान मुलांच्या मनाची ही अशीच धारणा होऊ लागली आहे की आपण मागे पडू, मग घरचे, टीचर यांची बोलणी खावी लागतील. त्यांच्या कोवळ्या मनावर सुद्धा हे भीतीचे सावट सतत रहाते की आपण बाहेर फेकले जाऊ. जे त्याना पुढच्या आयुष्यात निराशेच्या गर्तेत नेऊ शकते. स्वत:विषयी आत्मविश्वास नसणं, असुरक्षित वाटणं यामुळे नकरात्मकता आणि डिप्रेशन वाढत जातं. अशावेळी त्या व्यक्तीच्या जवळच्या लोकांनी त्याच्याशी बोलून त्याची मानसिक परिस्थिति समजून घेतली पाहिजे, मानसिक आधार दिला पाहिजे. तू एकटा नाही आम्ही आहोत तुझ्या बरोबर ही जाणीव करून दिली पाहिजे. ही भावना त्याला बळ देऊन जाते. 

जास्तच वाटलं तर डिप्रेशन वरची ट्रीटमेंट मानसोपचारतज्ञाकडे जाऊन घेण्यात कमी पणा वाटून घेता कामा नये. कलाकार, व्यावसायिक, अशा रोगाला बळी पडतात. आजूबाजूला घडणाऱ्या घातक घटनांनी घाबरून न जाता आपण सारासार विचार करून आत्मविश्वासाने आपापल्या पद्धतीने कृती केली पाहिजे आणि त्याचा परिणाम आपल्या मनावर होऊ द्यायचा नाही.  भीती तर अजिबात बाळगायची नाही.भीतीची भीती मनात बाळगण्यापेक्षा तिचा सामना करताना उपाय आपोआप सुचत जातात.     


- प्रतिभा कारंजकर 

फोंडा