सणाच्या दिवसांत अधिक तळलेले पदार्थ आणि खूप मिठाई खाल्ली गेल्याने शरीरावर परिणाम होऊ शकतो व ते आरोग्याला घातक ठरू शकते. मग यातील साठून राहिलेले शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी शरीर डिटॉक्स करण्याची गरज असते.
गणेश चतुर्थी गोवा आणि कोकणातील सगळ्यांचाच आवडता नी जवळचा सण. चतुर्थीत नाहीतर कधी? असा विचार करत आपण घरी, नातेवाईकांकडे गोड मिठाई, करंज्या-मोदक आणि प्रसादावर असा ताव मारतो की सांगू नका. अगदी घरातला डबा रिकामी होईपर्यंत, सकाळ संध्याकाळ चहासोबतसुद्धा करंज्या असतात.
सणांच्या या दिवसांत वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद आपण लुटावाच, पण आपले आरोग्य सांभाळून. नाहीतर सणाच्या दिवसांत अधिक तळलेले पदार्थ आणि खूप मिठाई खाल्ली गेल्याने शरीरावर परिणाम होऊ शकतो व ते आरोग्याला घातक ठरू शकते. मग यातील साठून राहिलेले शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी शरीर डिटॉक्स करण्याची गरज असते. कारण हे विषारी पदार्थ साठून राहिले तर त्याचा परिणाम कोलेस्ट्रॉल वाढण्यापासून ते ब्लड प्रेशर आणि डायबिटीस वाढण्यापर्यंत होताना दिसतो. तसेच झोप न येणे, सतत आळस येणे, तणाव वाढणे, वजन वाढणे, पचनप्रक्रिया बिघडणे यांसारख्या समस्यांचा समावेश असू शकतो. पण सणानंतर वेळीच शरीर डिटॉक्स केल्यास त्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो व परिणाम टाळले जाऊ शकतात. यामुळे सहजपणे करता येणारे शरीराला डिटॉक्स करण्याचे काही पदार्थ या भागात आपण जाणून घेऊयात.
लिंबू पाणी : लिंबू पाण्याचे रोज सेवन करावे. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे कार्य करते. याचे सेवन केल्याने अॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो. सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे लिंबू पाण्याचे सेवन करावे.
नारळाचे पाणी : सकाळी रिकाम्या पोटी नारळाचे पाणी पिल्याने ब्लोटिंगची समस्या कमी होते. तसेच अपचनाची समस्याही कमी होऊ शकते. नारळाचे पाणी पिण्याने शरीरामधील इलेक्ट्रोलाईट संतुलन योग्य राहाते. सकाळी उपाशीपोटी नारळ पाणी पिण्यासोबत त्यातील ताजी मलईदेखील खावी. यामुळे पोट थंड राहाते, पचनशक्ती वाढते व स्टॅमिनाही वाढतो.
ऊसाचा रस : भर उन्हात गोडसर ऊसाचा रस मन प्रसन्न करतो. पण फक्त उन्हाळ्यातच नाही तर १२ महिन्यात कधीही मधून मधून ऊसाचा रस पिणे शरीरासाठी चांगलेच. तसेच ऊसाचा रस पिण्यापेक्षा ऊसाचे तुकडे चावून चावून खाल्ल्याने त्याचा पचनशक्तीवर सक्रिय परिणाम होतो. ऊसाच्या रसात असणारे ग्लायकॉलिक अॅसिड त्वचा आतून अधिक हेल्दी बनवते आणि कोलाजीन टिश्यूजदेखील परत आणण्यात मदत करते, ज्यामुळे आपली त्वचेवर तेज रहाते, अॅक्ने व मुरूमांसारख्या त्वचेच्या समस्या त्रासदायक ठरत नाहीत.
गुलकंद : गुलाबाच्या पाकळ्या, साखर आणि अनेक वनस्पतींमध्ये औषधीय गुण असणारा गुलकंद हा आपल्या पोटाच्या समस्यांपासून आराम देणारा पारंपरिक पदार्थ आहे. सणादरम्यान अधिक खाल्ल्याने आणि कमी झोप झाल्याने अॅसिडिटी, पोट व आतड्यांशी संबंधित समस्या या अधिक उद्भवतात. या समस्यांसाठी गुलकंदाचे सेवन करता येते. यासाठी गुलकंदासह दूध मिसळून प्यावे, शरीर डिटॉक्स होण्यास फायदा होतो.
गूळ आणि तूप : शरीर डिटॉक्स करण्यासाठी अजून एक उत्तम उपाय म्हणजे गूळ आणि तूप. दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणानंर १ चमचा तूप आणि गूळ खाण्याने त्याचा पचनक्रिया उत्तम करण्यास आणि पोटाच्या समस्या दूर करण्यास उपयोग होतो. तसेच शरीरामध्ये साचलेले विषारी पदार्थ बाहेर पडण्यासाठीही याचा उपयोग होतो.
दही : दह्यातील चांगले बॅक्टेरिया आतडे स्वस्थ व निरोगी राखण्याचे काम करतात. दह्याचे सेवन केल्याने ब्लोटिंग आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
फळे : फळांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्स हे मुबलक प्रमाणात असतात. तसेच त्यामध्ये अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्मही असतात. तुम्ही सॅलॅड किंवा ज्यूसच्या स्वरूपात फळांचे सेवन करू शकता. अन्यथा ती स्वच्छ धुवून कच्चीही खाऊ शकता. फळं खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.
ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. ते शरीराचे फ्री- रेडिकल्सपासून होणारे नुकसान रोखतात व संरक्षण करतात.
असे अनेक प्रकारचे पदार्थ शरीराला डिटॉक्सिफाय करतात पण आपल्या शरीराला योग्य असलेल्या व आपल्या शरीराचे चयापचय सुधारणाऱ्या गोष्टींचा आपण आहारात सामावेश करावा.
डॉ. श्वेता राऊत मुळगावकर