सणांमुळे टिकलेली नाती...

माणसांमुळे नाती निर्माण झाली पण आपल्या भारतीय संस्कृतीत सणांनी मात्र नात्यांमध्ये एक आपुलकीचा जिव्हाळा तयार केला. या जिव्हाळ्यामुळे सणामध्ये आणि नात्यांमध्ये गोडवा कायमचा टिकवण्याचे कार्य आपल्या पूर्वजांनी केले.

Story: सय अंगणाची |
2 hours ago
सणांमुळे टिकलेली नाती...

गणेश चतुर्थी असो की दसरा, वाड्यावरचे आल्हाददायक वातावरण मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपुलकी, प्रेम दर्शविणारे असायचे. एखाद्याच्या घरचा उत्सव सर्वांचाच असल्यासारखे वातावरण चौफेर असायचे. गणेश चतुर्थीच्या दिवसात आपल्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले नसले, तरी शेजारच्या घरातील गणपतीसाठी पाचही दिवस कामावर न जाणाऱ्या माझ्या आईला पाहताक्षणी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे खऱ्याअर्थाने आज सापडू लागली आहेत. 

कुटुंबातील माणसांपेक्षा दुप्पट माणसंं घराघरांमध्ये दिसायची. जिथे उच्च-नीच असे काहीच नसायचे. सण म्हटला, की प्रत्येकाच्या मनाचा पारदर्शीपणा सहज दिसून यायचा. एखादी व्यक्ती चुकली, की दुसरी समजून घेणारी होती. स्त्रिया तर सणावाराच्या दिवशी एखाद-दुसरीला काही बोलल्या तरी क्षणात एकमेकींची माफी मागायच्या. कुणाची वाट पाहत कामं ठेवणं हे चुकीचे होते. माझ्या बालपणातील या आनंददायी उत्सवांचे चित्रण सद्य स्थितीत व्यक्त न करण्याजोगेच. 

सणासुदीला जन्या काकांच्या वसऱ्यावर गप्पागोष्टीत रमलेली वयस्कर माणसांसोबतची युवापिढी आठवली की आज कोपऱ्या-कोपऱ्यामध्ये बसलेले आम्हीच आठवतो. कष्टासाठी झटणारा समाज, तरीही सणासुदीच्या दिवसांत गुण्यागोविंदाने वावरणाऱ्या माणसांच्या सोबतीने आम्ही लहानाचे मोठे झालो. कालांतराने एकत्रित कुटुंब पद्धतीही बंद होऊ लागली. आपलेपणा नाहीसा झाला. द्वेष, मत्सर‌ यामुळे नाती दुरावली. खोटंखोटं हसण्याचा आव आज सणांच्या वेळी नजरेस पडतो. सगळी कामे मागे सारून सणासुदीला एकत्रित वावरणाऱ्या कुटुंबातील माणसांना आज द्वेषात पाहिले की कितीतरी वर्षे मागे जाऊन हसत-खेळत काम करणाऱ्या, नाती‌ जपणाऱ्या माणसांची आठवण होते. सण राहिले बाजूलाच, सणांमुळे टिकलेल्या नात्यांत आज गैरसमजुतीच शुल्लक कारणांवरून दिसून येतात.  आज सरकारी नोकरीच्या विश्वात वाहत जाणारी आपली माणसं सण, नात्यांचे मोजमाप पैशांमध्ये करताना दिसत आहेत. अॅडजेस्टमेन्ट या शब्दाची व्याख्या दर एकट्याच्या मुखातून हमखास येत असते. एरवी सणासुदीला भरलेली घरं आज एकांतात बुडताना दिसत आहेत. पैशांनी सगळ्या सुख-सुविधांचा लाभ प्राप्त होतो परंतु आपलेपणा, जपणूक या गोष्टीच कधीच नाहीशा झालेल्या आहेत. 

पंधरा-सोळा वर्षे मागे वळून पाहिले, तर या तिरस्काराच्या भावनांची रुजवण कधी नजरेसही‌ पडली नाही. गणेश चतुर्थीला तर हसण्या-बोलण्यातून आनंदाने वावरणाऱ्या कुटुंबातील गर्दी तेथेच राहिली. सणांनी, संस्कृतीने नाती टिकवली. प्रकृतीनुसार बदल हा आहेच, परंतु भावनिक बदल हा त्रासदायक असतो आणि हाच बदल आज समारंभाच्या दिवसांत दिसून येतो. 

आमच्या बालवयात आमच्या वडिलधाऱ्यांनी टिकवलेला सणांमधील आनंद काळाच्या ओघात नाहीसा झालेला सर्वसामान्यांमध्ये दिसून येतो. एकत्रित कुटुंबे आज हाताच्या बोटावर मोजण्या इतपत राहिलेली आहेत. या सगळ्यांतून एकमेकांच्या अडीअडचणी समजून घेण्यापेक्षा गैरसमजूतींचे पांघरूण मात्र ओढवलेले दिसते. सण नावाचे राहिलेत हेच आता म्हणावेसे वाटते कारण ती मजा, आपुलकी पूर्वीसारखी राहिलेली नाही. 

ओनिता वरक 

पाल-ठाणे, सत्तरी