बदल हा प्रकृतीचा नियम आहे त्यानुसार सगळ्याच गोष्टी बदलत जातात. हेच बदल आयुष्य जगण्याची ताकद, खचलेल्या प्रवासात एका नवीन ऊर्जेचे स्रोत निर्माण करू लागतात. उच्च माध्यमिक विद्यालयात असताना केरोसीनच्या चिमणीची साथ सुटली कारण केरोसीन भेटणे कठीण झाले. तद्नंतर तेलाच्या वातीची देवघरातील समई प्रकाश देण्याचं काम करू लागली. एक पंचारती देव्हाऱ्यात तर समई घरात आणि गोठ्यात. कौलारू घरात राहत असताना खोली वगैरे प्रकार मुळात नव्हताच. त्यामुळे आई समई गोठ्यात घेऊन गेली की अंधारमय घरातील देव्हाऱ्यात तेवणारी वात संपूर्ण अंधार दूर करायची.
केरोसीनच्या चिमणीच्या उजेडात वावरणारे आम्ही या कापसाच्या वातीच्या उजेडात सुरूवातीला चाचपडायचो. घरातील एखादी वस्तू शोधताना सहज दिवा घेऊन शोधणे शक्य नसायचे. कारण तेल अंगावर गळण्याची शक्यता असायची म्हणून हातभर अंतरावर दिवा ठेवून शोधाशोध सुरू व्हायची. अभ्यास करताना तर तेवत्या वातीचा प्रकाश केरोसीनच्या चिमणीपेक्षा कमीच वाटायचा नेहमी.
कौलारु घरातच कुड्याच्या काठ्यांपासून तयार केलेला कुड. वरती बांबूपासून तयार केलेली तडकी ज्याला मणपी म्हटलं जायचे त्याच्यावर देवाचा पुड ठेवला जायचा. माझ्या जन्मानंतर बाबांनी काढलेल्या लॉटरी कुपनवर भेटलेली ती तपकिरी रंगाची खुर्ची घेऊन मी देव्हाऱ्याच्या समोर अभ्यास करायला बसायचे. मधोमध पेटणारी वात आणि समोरासमोर मी आणि देवदेवतांचे फोटो. ते रंगीत फोटो पाहिल्यावर देवांचं आयुष्य किती सुखी असेल ना अशा विचारांनी मी वहीवर नुसते पेन ठेवून त्या तेवत्या वातीच्या प्रकाशात एकटक पाहत बसायचे. त्या वातीसारखा निरागसपणा माझ्यात जाणवायचा. कित्येकवेळा आई तर डोक्यावरून हात फिरवत म्हणायची 'लेका चित्तोस क्य अभ्यास कर'. दादापेक्षा आई-बाबांच्या जास्त अपेक्षा माझ्याकडूनच असायच्या. त्यामुळेच माझ्यासाठी एक नवीन समई घरात आली. तो दिवस आणि त्या दिवसाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मला माझं असं काहीतरी त्यादिवशी भेटलेलं. त्यादिवसापासून समईतील वातीने एका नव्या प्रवासाची ज्योत माझ्यामध्ये प्रज्वलित केली.
एका समईभोवती कितीतरी कुटुंबातील माणसांच्या गप्पा-गोष्टी रंगायच्या. देव्हाऱ्यात तर सूर्योदय होईपर्यंत वात मिणमिणत असायची. अकरावीपासून पदव्युत्तर, बी.एड.चं शिक्षण पूर्ण होईपर्यंत या समईने आपल्यातील निरागसपणा माझ्यात रुजवला. तेवणाऱ्या तिच्या प्रकाशात पुस्तकरुपी कितीतरी माणसांची, समाजाची पारख करता आली. तासनतास पुस्तकं वाचताना कधी डोळ्यांवरती ताण आला नाही. न कधी लिहिता -वाचताना झोप. समईच्या प्रकाशात वरवंट्यावर वाटप करतानाचे ते क्षण हल्लीच मिक्सरमध्ये वाटप वाटताना सहज कोपऱ्यात पडलेल्या वरवंट्याला पाहताक्षणी आठवू लागतात. आजही माझं टेबल देव्हाऱ्याच्या बाजूला आहे ज्यावर पुस्तकांचा भडिमार असतो. समईतील वात नुसती पेटत असते देव्हाऱ्यात माझ्यावर तर विजेचा लखलखाट झालेला आहे. ज्यात जपलेले छंद कंटाळवाणे वाटू लागतात. आजही दिव्याच्या प्रकाशात पुस्तके वाचताना एक वेगळाच आनंद वाटतो.
बल्बच्या उजेडात कितीतरी जीवांचं सतावणं नकोसं वाटतं. मग सगळे झोपी गेल्यानंतर लाईट बंद करून पुन्हा माझा भूतकाळाचा प्रवास एका नव्या उन्मेषाने त्या पेटत्या वातीच्या प्रकाशात पुस्तक वाचताना माझ्या जिवंत आठवणी जगू लागते. ज्या वातीने, मला अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी सकारात्मक विचारांची ज्योत माझ्यामध्ये रुजवून संघर्ष करायला शिकवले ती वात आज नुसती पेटत आहे देव्हाऱ्यात. कदाचित मला मिळालेल्या विजेच्या झगमगाटात त्या समईतील वातीची नजर जणू माझ्या जगण्याला न्याहाळत आहे. आज सात-आठ घरात पेटणाऱ्या बल्बच्या उजेडात त्या मिणमिणत्या वातीच्या समईचे उपकार मला कधीही न विसरता यावे यासाठी कदाचित वीज गेल्यावर पुन्हा घरात आणखी एक दिवा पेटतो त्यावेळी लक्षात येते.
दिव्यांवरती जागवलेल्या रात्रींनी मला सुख, आनंद प्राप्त करून शांततेची झोप दिली कठीण काळातही. परंतु आज सुख-सुविधांच्या प्रकाशात नकारात्मक विचारांच्या जाणfवा रुजू लागतात. त्यावेळी नकळत टेबलच्या बाजूला असलेल्या देव्हाऱ्यातील समईकडे नजर वळते आणि नुसते डोळे पाणावतात.
प्रश्न-उत्तरे असे काही मनी नसताना देखील...
अंधारमय जगण्यातील
ती तेवती वात....
सकारात्मक विचारांच्या
निरागसपणाची साथ......
आता ती नुसती थरथरते
नकारात्मक विचारांच्या साथीला
कदाचित माझे आणि तिचे ते नाते
मातीमोल होईल या भीतीने.....
ओनिता रामा वरक, पाल-ठाणे, सत्तरी.