लैंगिक शोषण करणाऱ्या तेलगू कोरिओग्राफरला अटक

जानी मास्टर गजांआड : हडफडेत हैदराबाद पोलिसांची कारवाई

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
5 hours ago
लैंगिक शोषण करणाऱ्या तेलगू कोरिओग्राफरला अटक

म्हापसा : कनिष्ठ कोरिओग्राफरचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तेलगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर शेख जानी बाशा उर्फ जानी मास्टर याला गोव्यात हडफडे येथे अटक करण्यात आली. गुरूवार, दि. १९ रोजी हणजूण पोलिसांच्या सहाय्याने हैदराबाद पोलिसांनी ही कारवाई केली.

संशयितासोबत काम करणाऱ्या पीडित ज्युनियर कोरिओग्राफरने लैंगिक अत्याचाराचा आरोप करीत रायदुर्गम पोलीस स्थानकात दि. ११ सप्टेंबर रोजी तक्रार नोंदवली होती. त्यानंतर दि. १५ सप्टेंबर रोजी संशयित जानी मास्टरविरुद्ध शुन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून हे प्रकरण नरसिंगी पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आले होते. त्यानुसार दि. १६ सप्टेंबर रोजी संशयिताविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, बाल कायदा व पोक्सो अंतर्गत बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा नोंद केला होता. गुन्हा नोंद झाल्यानंतर जानी मास्टर हैदराबादमधून पसार झाला होता. संशयिताला पकडण्यासाठी व त्याचे मोबाईल लोकेशन तपासण्याकरिता पोलिसांनी खास पथके तयार केली होती.

बुधवारी रात्री संशयित हडफडे येथे वास्तव्यास असल्याची माहिती सायबराबाद पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर ही माहिती हणजूण पोलिसांना देण्यात आली. गुरूवारी पहाटेच्या सुमारास हडफडे भागात फेरफटका मारताना संशयिताला हणजूण पोलीस निरीक्षक सूरज गावस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पकडून ताब्यात घेत अटक केली. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. म्हापसा न्यायालयाकडून ट्रांझिट रिमांड घेत जानीला घेऊन हैदराबाद पोलीस रवाना झाले.

संशयित तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. पीडितेने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेलगू चित्रपटसृष्टीमध्ये तिला मिळणारी कामे बंद झाली. दि. १७ व २८ ऑगस्टला तिला निनावी फोनद्वारे सावध राहण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर तिने पोलिसांत धाव घेण्याचा निर्णय घेतला.

काम देण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार

पीडित १६ वर्षांची असताना एका टीव्ही शोममध्ये दिसल्यानंतर जानीच्या टीमकडून कामाची ऑफर तिला देण्यात आली. नंतर तिच्याकडे काम हवे असल्यास लैंगिक सुखाची मागणी करण्यात आली होती. मुंबईमधील एका हॉटेलमध्ये संशयिताने तिच्यावर प्रथम बळजबरी केली होती. कुणालाही सांगितल्यास किंवा तक्रार केल्यास काम मिळणार नाही, अशी धमकी तिला संशयिताने दिली होती. 

हेही वाचा