‘इंडिया’ आघाडीत लाथाळ्या!

काँग्रेसचे पाटकर, आपचे पालेकर यांच्यात शाब्दिक युद्ध

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
‘इंडिया’ आघाडीत लाथाळ्या!

पणजी : मतदारसंघात संघटना मजबूत करण्यावरून काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या दोन्ही घटक पक्षांमध्ये तेढ निर्माण झाले आहे. काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या ४० मतदारसंघांत काँग्रेस मजबूत होईल, या विधानाचे खंडन करत आप गोवाचे संयोजक अमित पालेकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या स्क्रिप्टची कॉपी केल्याबद्दल पाटकर यांच्यावर टीका केली. या आरोपांना उत्तर देताना पाटकर म्हणाले, ४० मतदारसंघांत काँग्रेसला मजबूत करणे हे आपले कर्तव्य आहे. कोणाच्या पोटात दुखत असेल तर मी त्यासाठी काहीही करू शकत नाही.
इंडिया आघाडीत फूट पडत आहे का, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्व ४० मतदारसंघांत काँग्रेसला बळकट करणे हे माझे काम आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे गणित वेगळे असते, असेही पाटकर म्हणाले. पाटकरांच्या टीकेवर आक्षेप घेत आपचे पालेकर म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना इंडिया आघाडीची सर्वाधिक भीती वाटते आणि मला वाटले की पाटकरांनी चाळीसही मतदारसंघ मजबूत करण्यासाठी वापरलेली स्क्रिप्ट मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे, असा टोमणाही त्यांनी मारला.
लोकसभा निवडणुकीदरम्यान आम्ही व्हेंझी व्हिएगस यांना आमचा उमेदवार म्हणून घोषित केले होते. पण, लोकांनी इंडिया आघाडीची मागणी केली आणि आम्ही मोठ्या मनाने लोकसभा निवडणूक लढवण्याचा आमचा निर्णय रद्द करून काँग्रेसचे कॅ. विरियातो फर्नांडिस यांना पाठिंबा दिला. कॅ. विरियातो हे १५ हजारांच्या मताधिक्क्याने निवडून आले आणि उर्वरित मतदारसंघात काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून काम करून काँग्रेसला राज्यात सर्वाधिक मतांची आघाडी मिळवून दिली याकडे काँग्रेस दुर्लक्ष करू शकत नाही. मात्र, जेव्हा प्रदेशाध्यक्ष असे वक्तव्य करतात, तेव्हा त्यांनी त्याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही पालेकर यांनी केली.
पालेकर म्हणाले, मी राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष स्पष्ट करू इच्छितो की, ४०ही मतदारसंघात संघटना मजबूत करण्यासाठी मला दिलेली जबाबदारी मी पार पाडत आहे. प्रत्येकाला आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मजबूत करण्याचा अधिकार आहे. माझ्या विधानाला पालेकर मुख्यमंत्र्यांचीच स्क्रिप्ट आहे, असे का म्हणू पाहत आहेत, असा सवालही पाटकर यांनी केला.

पाटकर आपल्या वक्तव्यावर ठाम
लोकसभा निवडणुकीत आम्ही एकत्र आलो, पण आता निवडणुका नाहीत. संघटना मजबूत करण्यासाठी बूथस्तरावर काम करण्याची हीच वेळ आहे. पालेकर म्हणतात, त्याप्रमाणे ३० मतदारसंघांत काम करा आणि १० ठिकाणी दुर्लक्ष करा, असे होणार नाही. वरून जे सांगितले तेच मी करणार. मला गोंधळात टाकू नका. जेव्हा निवडणूक येईल तेव्हा पाहुया, असे म्हणून पाटकर आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले.


विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचीही २०२७ पर्यंत युती कायम राहावी, अशी इच्छा आहे तसेच राहुल गांधींनी केलेले वक्तव्यही काढून बघा. ते म्हणाले होते की, आगामी निवडणुकीत इंडिया आघाडी बरोबर असणार त्यामुळे पाटकरांनी केलेल्या वक्तव्याचा काहीही अर्थ नाही. गरज पडल्यास गोव्याच्या हितासाठी आम्ही तिसरी आघाडीही स्थापन करू शकतो. _अमित पालेकर, आप गोवाचे संयोजक