मोबोर येथील आणखी एका कामगाराचा मृत्यू

बोटीवर बेशुध्द, इस्पितळात मृतावस्थेतच दाखल : शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण होणार स्पष्ट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th September, 11:58 pm
मोबोर येथील आणखी एका कामगाराचा मृत्यू

मडगाव : कुटबण व मोबोर येथील पाच कामगारांच्या मृत्यूची घटना यापूर्वी घडलेली होती. या परिसरात कॉलराची साथ पसरलेली असून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मोबोर येथील बोटीवरील कामगार संतुराम (२९) याला मृतावस्थेतच आणण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. कोलवा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केलेली असून वैद्यकीय अहवालानंतर संतुरामचा मृत्यू कॉलरामुळे की आणखी कशामुळे मृत्यू झाला ते स्पष्ट होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोलवा पोलिसांना दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली. त्यांनी इस्पितळात जाऊन चौकशी केल्यानंतर मोबोर येथील बोटीवर काम करणार्‍या संतुराम (२९, मूळ छत्तीसगड, सध्या रा. हॅमिल्टन फर्नांडिस यांच्याकडे) याचा मृत्यू झाल्याचे समजले.

बोटीवर कामाला असलेल्या संतुराम याला इतर कामगारांनी इस्पितळात आणले त्याचवेळी त्याचा मृत्यू झालेला होता, असे वैद्यकीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. कोलवा पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शवागारात ठेवण्यात आलेला आहे.

कुटबण व मोबोर परिसरात कॉलराची साथ पसरलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडूनही उपाययोजना केल्या जात आहेत. संतुराम याला बोटीवरील साथीदारांनीच बेशुध्दावस्थेत इस्पितळात आणले होते पण इस्पितळात दाखल केले त्यावेळी त्याचा मृत्यू झाला होता.

बोटमालकाने संतुराम याला हदयविकाराचा झटका आल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीनंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.