गणेश मूर्तींसाठी अनुदान घेणाऱ्यांचे प्रमाण घटले

विविध आव्हानांमुळे अनेकांची व्यवसायाकडे पाठ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
5 hours ago
गणेश मूर्तींसाठी अनुदान घेणाऱ्यांचे प्रमाण घटले

पणजी : गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे राज्यातील पारंपरिक गणेश मूर्तींसाठी अनुदान घेणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. पर्यायाने पारंपरिक पद्धतीने गणेश मूर्ती करणाऱ्यांची संख्या देखील कमी झाली आहे. हस्तकला मंडळाने दिलेल्या माहितीनुसार २०१२ साली राज्यातील ५२६ मूर्तिकारांनी गणेश मूर्तीसाठी मिळणाऱ्या सरकारी अनुदान योजनेचा लाभ घेतला होता. २०२३ मध्ये हीच संख्या ३८८ इतकी कमी झाली आहे.


एका मूर्तिकाराने दिलेल्या माहितीनुसार राज्यात दरवर्षी सुमारे ५० ते ५५ हजार पारंपरिक गणेश मूर्ती बनविल्या जातात. गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे पारंपरिक मूर्ती बनवण्याचा कल कमी होत आहे. सध्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा वाढलेला वापर, चिकण मातीचे वाढलेले दर, कामगारांची कमतरता, कुशल मनुष्यबळाचा अभाव, तरुण पिढीने स्वीकारलेले अन्य व्यवसाय अशा विविध कारणांमुळे पारंपरिक मूर्ती बनवण्याचे प्रमाण कमी झाले आहे.