जमिनींच्या रूपांतरण प्रकरणांना काँग्रेसच्या काळात सुरूवात : आम

व्हेंझी व्हिएगास यांची काँग्रेस पक्षावर आगपाखड

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
जमिनींच्या रूपांतरण प्रकरणांना काँग्रेसच्या काळात सुरूवात : आम

पणजी : गोव्यातील जमीन रूपांतरण घोटाळ्याला माजी सत्ताधारी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी केला असून आता विद्यमान सरकार त्याचा फायदा घेत आहे. आमची काँग्रेसशी युती आहे हे खरे पण तुम्ही जी घोषणा दिली ती आमची घोषणा नाही. काँग्रेसला आमच्याशी युती तोडण्यास मोकळी असल्याचे वेन्झी व्हिएगस म्हणाले.

आम आदमी पक्षाने बुधवारी दुपारी नगररचना विभागाचे मुख्य नगररचनाकार राजेश नाईक यांना निवेदन दिले. शिष्टमंडळाने जमीन रूपांतरण कलम १७(२) आणि ३९(अ) रद्द करून नवीन प्रादेशिक योजना लागू करण्याची मागणी केली. निवेदन सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना वेन्झी व्हिएगस यांनी जमीन रूपांतरणाच्या मुद्द्यावरून मित्रपक्ष काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

१०-१५ वर्षांपूर्वीचे सरकार पळवाटा शोधून शेतीभाती आणि डोंगर नष्ट करत होते. सध्याचे सरकार या कायद्यांमध्ये सुधारणा करून गोव्याला अधोगतीकडे नेत आहे. रेईश मागूश सारख्या विषयावरील कागदपत्रे पाहिल्यास, २०१०-११ मध्ये ही प्रक्रिया सुरू झाली आणि आता डोंगर कापण्यास सुरुवात झाली असल्याचे वेन्झी यांनी सांगितले.

२०१० पूर्वी राजपत्र अधिसूचना, जमिनीचे रूपांतरण, तसेच बागायती विकून त्याचे दस्तऐवजीकरण यासारख्या सर्व कागदपत्र प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या. आता या सरकारने त्यांची अंमलबजावणी केली आहे आणि डोंगर नष्ट करण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप वेन्झी यांनी केला.

२००७ ते २०११ या काळात राज्यात काँग्रेसचे सरकार होते ही गोष्ट लपवण्यासारखी नाही. काँग्रेसशी आमची युती आहे हे मला मान्य आहे. पण केवळ युती झाली म्हणजे आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या गैरकृत्यात सहभागी आहोत असा होत नाही. काँग्रेसला आमच्याशी असलेली युती तोडावी असे वाटत असेल तर त्यांना युती तोडण्यास मोकळीक असल्याचे वेन्झी यांनी यावेळी सांगितले.